
कल्याण–डोंबिवलीत भाजप आणि शिवसेनेने युतीची घोषणा केली आहे. मात्र आता ही युती झाल्याने शिवसेनेत राजीनामा आणि नाराजीचं सत्र सुरू झालं आहे. माजी नगरसेवक व माजी सभागृह नेते कैलास लखा शिंदे यांनी पक्षाकडे थेट स्वतःची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे, तर दुसरीकडे कल्याण ग्रामीणतील उपशहर प्रमुख मनोज गणपत चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. माजी नगरसेवक व माजी सभागृह नेता कैलास लखा शिंदे यांनी पक्ष नेतृत्वाकडे पत्र लिहून थेट पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. आपल्या पत्रात त्यांनी सध्याच्या राजकारणावर घणाघाती टीका करत ‘आज निष्ठेला किंमत नाही, आर्थिक क्षमता हाच निकष झाला आहे’ असा गंभीर आरोप केला आहे.
कैलास शिंदे यांनी सांगितले की, ‘निवडणूक आयोगाने चार प्रभागांचा पॅनल तयार केल्यामुळे नोकरी करणाऱ्या किंवा सर्वसामान्य आर्थिक परिस्थितीतील व्यक्तीला निवडणूक लढवणे अशक्य झाले आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे तेच निवडणूक लढवू शकतात, ही निवडणूक फक्त पैसेवाल्यांसाठी आहे असा थेट आरोप त्यांनी केला. त्यांच्या प्रभागात सुमारे ५२ हजार मतदार असून चार प्रभागांचा एकत्रित पॅनल लढवणे आर्थिकदृष्ट्या अशक्य असल्याचेही ते म्हणाले.
वीस वर्ष शिवसेनेत काम केल्यानंतरही ऐनवेळी युती झाल्याने कार्यकर्त्यांवर घरी बसण्याची वेळ येते, हे अन्यायकारक असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. पक्ष सोडण्यामागे जागावाटप हे कारण नसून, आपण राजकारणातून पूर्णपणे बाहेर पडू इच्छितो आणि म्हणूनच पक्षाकडे स्वतःची हकालपट्टी करण्याची मागणी केली असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय, काही भाजप नगरसेवकांच्या वर्तनावरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांच्या वागणुकीमुळे परिसरात हिंदू–मुस्लिम तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याचा आरोप करत, अशा लोकांचे काम मी कधीच करणार नाही असे ठाम मत त्यांनी मांडले आहे.
दुसरीकडे, कल्याण ग्रामीणमधील शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख व परिवहन समितीचे माजी सभापती मनोज गणपत चौधरी यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी म्हटले की, 2018 पासून आपण इच्छुक उमेदवार होतो आणि पक्षाकडून संधी व योग्य सन्मान दिला जाईल, असे आश्वासनही देण्यात आले होते. मात्र युती झाल्यानंतर आपल्याला डावलले जाईल, अशी शंका वाटल्याने आपण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्याकडे राजीनामा सादर केला आहे.
मनोज चौधरी यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘सध्या कुठल्याही दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. मात्र युतीनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आपण निराश झाल्याचे त्यांनी मान्य केले. सलग होत असलेले हे राजीनामे आणि उघडपणे करण्यात आलेले आरोप यामुळे कल्याण–डोंबिवलीत शिंदे गटातील अंतर्गत अस्वस्थता चव्हाट्यावर आली असून, महापालिका निवडणुकीआधी राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत.