दुधापेक्षा दुधाची साय घट्ट असते, नातू अमितच्या लाँचिंगवर आजी कुंदा ठाकरेंची प्रतिक्रिया

मनसेच्या महाअधिवेशनात राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरेची मनसेच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे.

दुधापेक्षा दुधाची साय घट्ट असते, नातू अमितच्या लाँचिंगवर आजी कुंदा ठाकरेंची प्रतिक्रिया

मुंबई : “दुधापेक्षा दुधाची साय घट्ट असते. अमित पुढे खूप चांगलं काम करणार आहे, तो खूप मोठा व्हावा”, अशी आशा अमित ठाकरे यांच्या आजी कुंदा ठाकरे यांनी व्यक्त केली (Kunda Thackeray On Amit Thackeray Launching). मनसेच्या महाअधिवेशनात राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांची मनसेच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. नेतेपदी निवड झाल्यानंतर अमित यांच्या आई शर्मिला ठाकरे, आजी कुंदा ठाकरे आणि पत्नी मिताली ठाकरे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बातचीत केली (Kunda Thackeray On Amit Thackeray Launching).

“अमित फक्त एक अहवाल वाचेल, अशी माहिती आम्हाला दिली होती. अमित आज पहिल्यांदाच मंचावर जाणार होता. त्यामुळे त्याला ऐकण्याची उत्सुकता होती. मात्र, जेव्हा त्याची नेतेपदी निवड झाल्याची घोषणा झाली तेव्हा मला अत्यंत आनंद झाला. ती गोष्ट आमच्यासाठी जॅकपॉटच ठरली”, असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या. तर “अमित चांगलं काम करेल, असा विश्वास आहे”, असं मत अमित यांच्या पत्नी मिताली ठाकरेंनी व्यक्त केलं.

“मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांची आणि नेत्यांचे आभार मानते. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून अमित काम करत होता. पण आता सगळ्यांनी मिळून अमितची नेतेपदी निवड केली. त्याची नेतेपदी निवड होईल याची मला अपेक्षा नव्हती. अमित फक्त एक अहवाल वाचणार असं मला सांगितलं होतं. त्यामुळे आम्ही सकाळपासून आलो होतो. पण आज त्याची नेतेपदी निवड झाली आहे. त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे”, असे शर्मिला ठाकरे यांनी सांगितलं.

“गेल्या दोन-तीन वर्षात अमित काही आंदोलनांमध्ये सहभागी झाला. तो जसं काम करत आहे तसंच त्याने सुरु ठेवावं. नेतेपद असतं किंवा नसतं, मात्र तुम्ही जितकं लोकांची कामं करता तितकं तुम्ही लोकांशी जोडले जातात. आज महाराष्ट्रात अनेक जटील प्रश्न आहेत. विद्यार्थी, तरुण, रेल्वे असे अनेक प्रश्न आहेत. लोकांची कामे करा लोक तुमच्या मागे येतील”, असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

दरम्यान, घरात आता दोन नेते असतील, याकडे तुम्ही कसे पाहता? असा प्रश्न विचारला असता, “माझ्यासाठी ते नेते नाहीत. राज ठाकरे हे माझे पती आणि अमित मुलगा आहे. त्यांच्याकडे त्याच नजरेने मी पाहणार आहे. त्यात काहीच फरक पडणार नाही. आमच्या घरात शिरताना आम्ही राजकारण बाहेर ठेवतो आणि मग घरात येतो”, असे शर्मिला ठाकरे यांनी सांगितलं.