लाडकी बहीण योजना बंद केली तर… सरकारमधील बड्या नेत्याचे मोठे विधान
राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचे भविष्य अनिश्चित आहे. अर्थसंकल्पात तरतुदी नसल्याने आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांच्या विधानामुळे योजना बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्य सरकारने सुरु केलेली लाडकी बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेत आहे. महाराष्ट्र सरकारने नुकतंच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. यामुळे लाडक्या बहिणी नाराज झाल्या आहेत. त्यातच आता महायुतीतील बड्या नेत्याने एक मोठे विधान केले आहे. लाडकी बहीण योजना बंद केली तर दुसऱ्या योजना सुरु करता येतील, असे विधान शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केले आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना बंद होणार का, अशी चर्चा रंगली आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुतीने लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊ असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र लाडक्या बहिणांना अजूनही 2100 रुपये मिळालेले नाहीत. गेल्या काही महिन्यांपासून सरकारकडून 1500 रुपये महिलांच्या खात्यात जमा केले जात आहेत. अर्थमंत्री अजित पवार यांनी काल बजेट सादर केले. मात्र या बजेटमध्ये लाडक्या बहिणींसाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना कुठलीही वाढ मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. तसेच यंदा लाडकी बहिण योजनेसाठी केलेल्या आर्थिक तरतुदीमध्ये कपात झाल्याचं पाहायला मिळत आहे.
अंथरूण पाहून पाय पसरावे लागतात
त्यातच आता लाडकी बहीण योजनेबद्दल शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी एक मोठे विधान केले आहे. “बजेट डोळ्यासमोर ठेवून योजना राबवाव्या लागतात. लाडकी बहीण योजना बंद केली तर दुसऱ्या योजना सुरू करता येतील. अंथरूण पाहून पाय पसरावे लागतात”, असे विधान रामदास कदम यांनी केले. त्यांच्या या विधानमुळे आता चर्चांना उधाण आले आहे. तसेच सत्ताधारी पक्षातील नेत्याने केलेल्या विधानामुळे लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत.
उद्धव ठाकरेंचा टीका करण्याचा धंदा सुरू राहू दे
“उद्धव ठाकरेंना आता टीका करण्याचेच काम आहे. ते भविष्यात कधीच सत्तेत येणार नाहीत. त्यांना केलेल्या कर्माची फळं भोगावी लागतील. अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना किती निधी दिला हे ते सांगू शकत नाहीत. उध्दव ठाकरेंना ग्रामपंचायतीचा अभ्यास नाही, ते बजेट काय सांगणार? बजेट पक्षाचे नसते. उद्धव ठाकरेंचा टीका करण्याचा धंदा सुरू राहू दे”, असेही रामदास कदम यांनी म्हटले.
