
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. येत्या दोन डिसेंबर रोजी राज्यात नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी आहे. दरम्यान यावेळी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुती विरोधात महाविकास आघाडी अशी थेट लढत नसल्याचं पहायला मिळतं आहे. अनेक ठिकाणी महायुतीमधील घटक पक्षच एकमेकांविरोधात उभे राहिल्याचं पहायला मिळत आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये देखील हीच स्थिती आहे. त्यामुळे प्रचारात आपल्या मित्र पक्षांवर जोरदार हल्लाबोल सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता बीडमधून मोठी बातमी समोर आली आहे.
बीडच्या गेवराई नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रचाराचे अवघे काही तास शिल्लक राहिले असतानाच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे सहकारी बळीराम खटके आणि ओबीसी समाज बांधवांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाला जाहीर पाठिंबा दिला आहे. गेवराई नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेवराईमध्ये बैठक घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
गेवराई नगरपरिषदेमध्ये मागील पंधरा वर्षांपासून माजी आमदार लक्ष्मण पवार यांची एक हाती सत्ता आहे. आणि हीच सत्ता उलटून टाकण्यासाठी आमदार विजयसिंह पंडित यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अशातच राष्ट्रवादी शरद पवार गटाने देखील नगराध्यक्ष पदासह 14 ठिकाणी आपले उमेदवार दिले आहेत. याच दरम्यान ओबीसी समाजाने आपली भूमिका स्पष्ट करून विजय सिंह पंडित आणि लक्ष्मण पवारांची कोंडी केली आहे. ओबीसी समाजाच्या या भूमिकेमुळे गेवराई नगर परिषद निवडणुकीचं चित्र बदललेलं असेल, असा विश्वास यावेळी बळीराम खटके यांनी व्यक्त केला आहे.
भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गटाला फटका
दरम्यान या निवडणुकीमध्ये आता ओबीसी समाजानं राष्ट्रवादी शरद पवार गटाला पाठिंबा जाहीर केल्यामुळे गेवराई नगर परिषदेत राष्ट्रवादी शरद पवार गटाची ताकद लाढली आहे. या नगर परिषदेत तिरंगी लढत होणार आहे, यामध्ये एनसीपी अजित पवार गट, भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गट आमने-सामने आहेत, मात्र आता ओबीसी समाजानं राष्ट्रवादी शरद पवार गटाला पाठिंबा दिल्यानं हा भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.