Devendra Fadnavis : जयंत पाटील यांच्या मनात दुसरं काही…काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
Devendra Fadnavis : "मी राहुल गांधींच्या प्रत्येक प्रश्नाला पुराव्यासह उत्तर दिलं आहे. खरं म्हणजे राहुल गांधींसोबत डिबेट करण्यासाठी माझी गरज नाही. आमचा कार्यकर्ताही पुरेसा आहे. पण त्यांना डिबेट हवी असेल, तर मी तयार आहे"

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या निवडणूक निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारीसह लेखाद्वारे उत्तर दिलं. त्यावर आज देवेंद्र फडणवीस बोलले. “मी राहुल गांधींच्या प्रत्येक प्रश्नाला पुराव्यासह उत्तर दिलं आहे. खरं म्हणजे राहुल गांधींसोबत डिबेट करण्यासाठी माझी गरज नाही. आमचा कार्यकर्ताही पुरेसा आहे. पण त्यांना डिबेट हवी असेल, तर मी तयार आहे” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
पत्रकारांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्यासंबंधी प्रश्न विचारला. दोन्ही राष्ट्रवादीचा वर्धापनदिन सोहळा पार पडतोय. शरद पवार म्हणाले की, फूट पडली. पण त्याकडे लक्ष देऊ नका, जोमाने कामाला लागा. त्यांनी एकप्रकारे दोन्ही पवार एकत्र येतील या चर्चेला पूर्णविराम दिला का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “ते एकत्रित येणार की नाही? हे मी सांगू शकत नाही. त्यांच्या मनात शिरुन ते जाणून घेऊन तुमच्यापुढे ठेवण्याची माझ्याकडे शक्ती नाही”
‘जयंत पाटील यांच्या मनात मला शिरावं लागेल’
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज पक्षाच्या वर्धापनदिन कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, शरद पवारांनी मला सर्व जबाबदाऱ्यातून मुक्त करावं, त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “जयंत पाटील यांच्या मनात मला शिरावं लागेल. सगळ्या जबाबदाऱ्यातून मुक्त करा म्हणाले, ते जबाबदारीतून मुक्त करणार हे माहित असल्यामुळे म्हणाले की, त्यांच्या मनात दुसरं काही आहे, हे समजून घ्यावं लागेल”