Devendra Fadnavis : ‘मी त्यांना बिनडोकच म्हणीन’, मोदींच्या परदेश दौऱ्यासंदर्भातील प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांचं थेट उत्तर
"जवळपास 25 लाख कुटुंबाना उद्या 10 हजार कोटी रुपये पंतप्रधान आवास आयोजनातंर्गत देण्यात येणार आहेत. हे खूप आधी प्लानिंग केलेलं होतं. पण यापुढे असे मोठे शासकीय कार्यक्रम होणार नाहीत" असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

“माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे काही निर्देश दिलेले आहेत, ते देश हितासाठी आहेत. आम्ही आपपाल्यापरीने जे जे करणं शक्य आहे, ते सर्व प्रयत्न करत आहोत. जेव्हा नेते मंडळी अशा प्रकारे कृती करतात तेव्हा ते लोकांपर्यंत पोहोचतं. म्हणून मी स्वत: मोटरसायकलने आलो” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. “आम्ही आता सर्वांचा वाहन ताफा कमी केलेला आहे. परदेश प्रवास सगळ्यांचा रद्द केलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारे इंधन बचत करुन परकीय चलन बचत कशी करता येईल हा प्रयत्न आहे” असं फडणवीस म्हणाले. “उद्या शासकीय कार्यक्रम आहे साताऱ्याला. त्याचं नियोजन झालेलं असल्यामुळे त्यावर पैसा खर्च केलेला असल्यामुळे आम्ही तो कार्यक्रम रद्द केलेला नाही. पण पुढचे सहामहिने आम्ही शासनाच्यावतीने असे मोठे कार्यक्रम आयोजित करणार नाही” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं.
विरोधी पक्ष पंतप्रधानांच्या आवाहनांवर टीका करतोय त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “विरोधी पक्षाला प्रगल्भता यावी लागेल. जगातले सगळे देश यापेक्षा कठोर निर्णय घेत आहेत. आपल्याला पंतप्रधानांनी थोडासा त्याग करायला सांगितला आहे. कठोर निर्णय घेतलेले नाहीत. त्यावर इतका गदारोळ उभा करणं योग्य नाही” “इंदिराजी असताना सुद्धा हे झालेलं. नरसिंहराव सरकार असताना सुद्धा अशा उपायोजना केलेल्या. चिंदबरम यांनी 2012 साली अशा उपायोजना केलेल्या. त्यामुळे अशा प्रकारचं दुटप्पी वागणं योग्य नाही. आंतरराष्ट्रीय परिस्थिती तयार झाल्यावर देशहितासाठी आम्ही थोडं जुळवून घ्यायला तयार नसू तर मला असं वाटतं की विरोधी पक्षाकडे प्रगल्भता नाही” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
यापेक्षा जास्त मूर्खपणाचं लक्षण असू शकत नाही
15 तारखेपासून पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. त्यावर टीका करणाऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. “मला वाटतं यापेक्षा जास्त मूर्खपणाचं लक्षण असू शकत नाही. देशाच्या पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं, देशाचे पंतप्रधान परदेश दौऱ्यावर जातात, तेव्हा स्ट्रॅटजिक अलायन्सेस होतात. देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा होतो” असं फडणवीस म्हणाले.
मी अशी टीका करणाऱ्यांना बिनडोकच म्हणीन
“पंतप्रधानांनी विदेशी प्रवास करु नका हे जे सांगितलय ते अनावश्यक, टाळता येण्यासारखं असेल त्या बाबतीत आहे. आपला एखादा व्यापारी परदेशात मोठी डील करत असेल, तर ती डील रद्द करावी असा त्याचा अर्थ होत नाही. म्हणून मी अशी टीका करणाऱ्यांना बिनडोकच म्हणीन. दुर्देवाने मला हा शब्द वापरावा लागतोय. पण जे अशी टीका करतायत ते बिनडोकच आहेत” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
