रात्रीचाच मोठा गेम… श्रीमंतांना डिझेलची खैरात… शेतकरी मात्र रांगेत… टीव्ही9 चे हिंगोली जिल्ह्यातील Midnight Coverage
हिंगोली जिल्ह्यात डिझेल टंचाईमुळे शेतकरी त्रस्त आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी कॅनमध्ये डिझेल देण्यास मनाई केली असली तरी, मध्यरात्री श्रीमंतांना बॅरलने डिझेल दिले जात असल्याचे TV9 च्या कॅमेऱ्यात कैद झाले. डिझेलअभावी शेतीची कामे थांबली आहेत, शेतकरी रांगेत उभे आहेत, तर काळाबाजार सुरूच आहे.
हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्तां यांनी कॅनमध्ये डिझेल देण्यास सक्त मनाई केली आहे. तसे आदेशच पेट्रोल पंप चलकांना दिले आहेत. त्यामुळे दिवसभर शेतकरी ट्रॅक्टर घेऊन ज्या पंपावर डिझेल उपलब्ध आहे तिथे तास न् तास रांगेत उभे राहत आहेत. अनेक ठिकाणी डिझेल उपलब्ध नसल्याचे बोर्ड ही लागले आहे. डिझेल घेण्यासाठी वादही होत आहेत. मात्र वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील नायरा पेट्रोल पंपावर रात्री 12 वाजता जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत 200 लिटरच्या बॅरलमध्ये हजारों रुपयांच शकडो लिटर डिझेल दिले जात आल्याची धक्कादायक बाब tv9 मराठीच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. वसमत तालुक्यातील नायरा पेट्रोल पंपातून आमच्या प्रतिनिधीने मध्यरात्री या घटनेचा आढावा घेतला आहे.
चौधरी पेट्रोल पंप… वेळ मध्यरात्री 2 वाजून 45 मिनिटं
हिंगोली शहरातील खटकळी बायपास परिसरात असलेला चौधरी पेट्रोल पंपावर दिवसभर डिझेल नव्हते. मात्र मध्यरात्री 2 वाजून 45 मिनिटांनी पेट्रोल पंप चालकांनी बोरिंग मशीन, 200 लिटरच्या बॅरलसह विविध वाहनात डिझेल भरून घेतले. गडगंज श्रीमंत असलेल्या व्यक्तिंना हजारों रुपयांचे शकडो लिटर डिझेल भरून दिले जात आहे. कॅनमध्ये डिझेल न देण्याचा आदेश असून सुद्धा चौधरी पेट्रोल पंपावर 200 लिटरचे बॅरल भरून मध्यरात्री डिझेल दिले जात होते.
पोलीस पेट्रोल पंप… मध्यरात्री 2 वाजून 24 मिनिटं
चौधरी पेट्रोल पंपावर 200 लिटरचे बॅरल भरून दिले जात होते. मात्र तेथून काही किलोमीटरवर असलेला हिंगोली शहरातील पोलीस पेट्रोल पंप बंद असतानाही या बंद पेट्रोल पंपाबाहेर रात्री 2 वाजून 24 मिनिटांनी शेतकऱ्यांनी डिझेल भरण्यासाठी ट्रॅक्टर नंबरला लावले होते. अनेक शेतकरी जागा मिळेल तिथे झोपले होते. सकाळी 8 वाजता डिझेल मिळेल, असं शेतकऱ्यांना पेट्रोल पंपवाल्यांकडून सांगण्यात आले होते. तरीही शेतकरी रात्री 10 वाजल्यापासून रांगेत होते.
डिझेल मिळत नसल्याने शेतात अंतर मशागतीचे कामे सुरू आहेत. डिझेल मिळत नसल्याने अंतर मशागत थांबली आहे. आम्हाला 1 हजार किंवा 2 हजार रुपयांचे डिझेल दिले जात आहे. ताशी तीन लिटर ट्रॅक्टरला डिझेल लागते. एक एकर नागरटी करायची असेल तर 9 लिटर डिझेल लागते. 15 दिवस झाले डिझेल मिळत नाही. कॅनमध्ये डिझल मिळत नसल्याने आमचं नुकसान होत आहे. अशी परिस्थिती राहिली तर आम्हाला ट्रॅक्टर विकावे लागतील, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनि दिली आहे.
लासीनातील वर्मा पेट्रोल पंप… मध्यरात्री 3 वाजता
पेट्रोल पंप बंद असताना कळमनुरी तालुक्यातील लासीना येथील वर्मा पेट्रोल पंपावर वाहनधारकांना डिझेल घेण्यासाठी पंपामध्येच रात्र काढली. पंपा बाहेर वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या. त्यात सर्वाधिक शेती उपयोगी यंत्र असलेले ट्रॅक्टर होते. आम्हाला डिझेल मिळाले नाही तर आम्ही शेती पेरणी कशी करायची? शेतकऱ्यांनी उपाशी मरायचे काय..? अशी वाईट वेळ का आली? शासनाने विचार करायला पाहिजे. दिवसभर काम करून रात्री डिझेलसाठी लाइन लावावी लागत असल्याच शेतकरी सांगत आहेत.