स्वबळावर लढण्यासाठी मनगटात ताकद लागते, घरात बसून लढता येत नाही – एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना सणसणीत टोला
उद्धव ठाकरे यांनी अंधेरी येथील मेळाव्यात स्वतंत्रपणे महापालिका निवडणुका लढवण्याचा इशारा दिला. त्यांनी सर्व पक्ष पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली असून एकट्याने लढण्याचे संकेत दिले. एकनाथ शिंदे यांनी मात्र यावर टीका केली असून स्वबळावर निवडणूक जिंकण्यासाठी मनगटात ताकद असावी लागते असे म्हणत मैदानात काम करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. यामुळे येणाऱ्या काळात राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे.

लोकसभा, विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम थांबला असला तरी आता महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकीचे वार वाहू लागले आहेत. आगामी महापालिकी निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी कसून तयारी सुरू केली असून आता उद्धव ठाकरे यांनीही महापालिकेच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. काल अंधेरीत पार पडलेल्या मेळाव्यात त्यांनी जोरदार भाषण केले. या भाषणावेळी त्यांनी स्वतंत्र निवडणुका लढण्याचे संकेत दिले आहेत. महापालिकेमध्ये एकट लढा असं पदाधिकाऱ्यांचं मत असल्याचंही ठाकरे म्हणाले. योग्य वेळी निर्णय घेऊन अमित शाहांना ताकद दाखवणार असल्याचा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला. मात्र त्यांच्या या विधानानंतर शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी मात्र टीकास्त्र सोडलं आहे. स्वबळावर लढण्यासाठी मनगटात ताकद लागते असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार टोला लगावला. त्यामुळे येत्या काळात आरोप-प्रत्यारोप, प्रत्युत्तराचे हे राजकारण आणखी पेटण्याची शक्यता दिसत आहे.
जास्त नादी लागू नका, जेवढे अंगावर याल…
निवडणुका लागल्या नाहीत, मात्र जर तुमची तयारी पूर्ण झाली तर आपण नक्कीच कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार निर्णय घेऊ, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडली. काही दिवसातच महापालिकेच्या निवडणुका जाहीर होतील. मी सगळ्यांशी बोलत आहे, मुंबईसह नाशिक, नगर सगळ्यांशी बोलून झाले आहे. सगळ्यांचं मत एकटं लढा असं आहे. पण, अजून निवडणूक जाहीर झालेली नाही. आधी तुमची जिद्द आणि तयारी बघू द्या. ज्यादिवशी तुमची तयारी झाली ही खात्री पटेल. त्या दिवशी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही. वेळ येईल तेव्हा एकटा लढल्याशिवाय राहणार नाही. अमित शाहांना सांगतो जास्त नादी लागू नका. जेवढे अंगावर याल तेवढे वळ घेऊन दिल्लीला जाल”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले होते.
स्वबळावर लढण्यासाठी मनगटात ताकद लागते – शिंदेंचा टोला
आम्ही स्वबळावर निवडणूक लढवणार असं ते ( ठाकरे) म्हणाले. पण स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी मनगटात ताकद लागते. आणि लढून जिंकण्यासाठी देखील या भुजांमध्ये ताकद असावी लागते. घरात बसून लढता येत नाही असं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. तुम लढो, हम कपड़ा संभालता है, असं बोलून निवडणुका जिंकता येत नाही, आणि कार्यकर्त्यांची मनंही जिंकता येत नाही. त्यासाठी कार्यकर्त्यांबरोबर रस्त्यावर उतरून, फिल्डवर येऊन काम कराव लागतं. त्याच्या सुखदु:खात समरस व्हावं लागतं,असा सणसणीत टोला एकनाथ शिंदेंनी लगावला.