Maharashtra News LIVE: ही लढाई सोपी नाही, परंतू माझ्या मागे बारामतीकरांची सोबत आहे – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

Maharashtra News LIVE Updates : मुंबईत दोन दिवस पाणीबाणी असून काही भागातील पाणीपुरवठा 18 तास बंद राहणार आहे. पाच विभागांना याचा फटका बसणार आहे. हे विभाग कोणते, ते जाणून घ्या..

Maharashtra News LIVE:  ही लढाई सोपी नाही, परंतू माझ्या मागे बारामतीकरांची सोबत आहे - उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
लाइव्ह ब्लॉग
Image Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: May 18, 2026 | 11:14 PM

मुंबईच्या दक्षिण आणि मध्य भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिकेने शिवडी इथं महत्त्वाचे तांत्रिक काम हाती घेतलं आहे. शिवडी इथल्या हाजी बंदर मार्गावर 1500 मिमी व्यासाचे दोन नवे ‘बटरफ्लाय व्हॉल्व’ बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे बुधवारी सकाळी 10 वाजल्यापासून गुरुवारी पहाटे चारपर्यंत म्हणजे जवळपास 18 तास मुंबईतील ए, बी, सी, ई आणि एफ-दक्षिण या पाच विभागांतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर दुसरीकडे भोंदू खरातच्या कोट्यवधींच्या प्रॉपर्टीवर ईडीकडून तात्पुरती टाच येण्याची शक्यता आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून कारवाईला वेग आला आहे. ईडीकडून संबंधित मालमत्तांची तपशीलवार छाननी सुरू आहे. संशयित व्यवहारांमुळे कोट्यवधींची संपत्ती अडचणीत आली आहे. बोगस गुंतवणूक, फसवणूक आणि मनी लाँड्रिंगबाबत अद्याप तपास सुरू आहे. यासह राज्यातील इतर घडामोडी, देश-विदेश, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 21 Apr 2026 05:54 PM (IST)

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणा दरम्यान, अजितदादा प्रेमींनी झळकावले बॅनर

    बारामती विधानसभेच्या पोट निवडणूकीच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर, उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची आज बारामतीमध्ये सांगता सभा पार पडत आहे. या सभेला मुख्यमंत्र्यांसह महायुतीतील अनेक नेत्यांनी उपस्थिती लावली आहे. यावेळी  ”मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कधी होणार ?…दादांचं स्वप्न सुनेत्रा वहिनी पूर्ण करणार का?” अशा आशयाचे बॅनर झळकवल्याची घटना घडली.

  • 21 Apr 2026 05:30 PM (IST)

    दादांचा पश्चात वहिनी आता मतांचा नवा रेकॉर्ड करतील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    बारामतीतला एकेक व्यक्ती २३ तारखेला मतदानाला जातील, दादा मतांचा नवा रेकॉर्ड करत होते, आता दादांचा पश्चात वहिनी आता मतांचा नवा रेकॉर्ड करतील असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगता सभेत केले आहे.

  • 21 Apr 2026 05:08 PM (IST)

    ही लढाई सोपी नाही, परंतू माझ्या मागे बारामतीकरांची सोबत आहे – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

    ही लढाई सोपी नाही, परंतू माझ्या मागे बारामतीकरांची सोबत आहे, माझ्यावर विश्वास ठेवा मी तुमचा विश्वास कधीच कमी होणार नाही असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती पोट निवडणूकीच्या सांगता सभेत बोलताना सांगितले.

  • 21 Apr 2026 03:58 PM (IST)

    कृषी केंद्र चालक 27 एप्रिल पासून बेमुदत संपावर

    शेतीचा हंगाम तोंडावर येत असतानाच आता कृषी केंद्र चालक 27 एप्रिल पासून बेमुदत संपावर जाणार आहेत. HTBT बियाणे अवैध पद्धतीने विक्री होत आहेत, ती एकतर थांबवावी नाहीतर त्याला विक्रीची परवानगी देण्यात यावी. लिंकिंगची समस्या वारंवार येते त्यावर तोडगा काढण्यात यावा. कृषी केंद्र चालकांवर वारंवार छोट्या छोट्या कारणांनी एफ आय आर दाखल केले जातात ते बंद करण्यात यावे.  यासह आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी कृषी केंद्र चालक बेमुदत संपावर जाणार आहेत.

  • 21 Apr 2026 03:55 PM (IST)

    सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे यांची प्रचार सभा

    बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान

    पोटनिवडणुकीसाठी प्रचार सभेचं आयोजन

    प्रचार सभेला सुप्रिया सुळे यांची देखील उपस्थिती

    सुनेत्रा पवार यांना महाविकास आघाडीने देखील दिला पाठिंबा

    सुनेत्रा पवार यांना मतदान करण्याचं सुप्रिया सुळे यांच्याकडून मतदारांना आवाहान

  • 21 Apr 2026 03:37 PM (IST)

    जळगाव जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पदभार स्वीकारला

    जळगाव जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पदभार स्वीकारला आहे. यावेळी  मावळते पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी नूतन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचा गुलाबपुष्प देत सत्कार केला आहे. जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांची पुणे येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागात बदली झाली आहे. त्यामुळे  डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या जागी आता धुळे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

  • 21 Apr 2026 03:15 PM (IST)

    एआयच्या माध्यमातून आयटीच्या मुलांना बेकायदेशीर मार्गाने प्रमाणपत्र देणाऱ्या कंपनीवर पोलिसांचा छापा

    एआयच्या माध्यमातून आयटीच्या मुलांना बेकायदेशीर मार्गाने प्रमाणपत्र देणाऱ्या कंपनीवर पोलिसांचा छापा

    सोलापुरात एआयच्या माध्यमातून आयटी कंपन्यामधील मुलांना बेकायदेशीर प्रमाणपत्र देणाऱ्या कंपनीवर सोलापूर शहर पोलिसांची मोठी कारवाई

    कंपनीचा सूत्रधार अशपाक अत्तारसह आठ जणांवर गुन्हा दाखल

    सोलापुरात अशपाक अत्तार सासऱ्याच्या घराला ऑफिस बनवून रिमोट शेअरद्वारे चालवत होता रॅकेट

    एआय तंत्रज्ञानाचा गैरवापर करत लाखो रुपये उकळल्याचा अंदाज

    सध्या सर्व आरोपींची कसून चौकशी सुरू

  • 21 Apr 2026 02:59 PM (IST)

    आयटी कंपन्यामधील मुलांना बेकायदेशीर प्रमाणपत्र देणाऱ्यांवर कारवाई

    सोलापुरात एआयच्या माध्यमातून आयटी कंपन्यामधील मुलांना बेकायदेशीर प्रमाणपत्र देणाऱ्या कंपनीवर सोलापूर शहर पोलिसांची मोठी कारवाई करण्यात आली आहे. कंपनीचा सूत्रधार अशपाक अत्तारसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 21 Apr 2026 02:45 PM (IST)

    नागपुर शहरात मध्यरात्री मेट्रो स्टेशनखाली मारहाण

    नागपुर शहरात मध्यरात्री टेका नाका परिसरात मेट्रो स्टेशनखालील बार परिसरात मारहाणची घटना घडली आहे. यात एकाला ताब्यात घेतलं असून इतर आरोपीचा शोध सुरू आहे. शेख अखिल शेख जलील, मो. आसिफ शेख बशीर, भिलगाव, अशी दोन जखमीचे नाव आहे.

  • 21 Apr 2026 02:30 PM (IST)

    भाजप नगरसेवकावर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप

    मिरा रोडमध्ये भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्यावर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. ​तक्रारदार ४० वर्षीय सामाजिक कार्यकर्ती असून, २०२२ पासून शोषण होत असल्याचा तिचा आरोप आहे.

  • 21 Apr 2026 02:15 PM (IST)

    अमरावतीच्या परतवाडामधील मुख्य आरोपींची कोठडी संपली

    अमरावतीच्या परतवाडा मधील तरुणींच लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी मुख्य आरोपी अयान अहमद, हुजेर खानसह काही आरोपींची आज सात दिवसांची पोलीस कोठडी संपली आहे. चौघांना काही वेळातच परतवाडा पोलीस अचलपूरच्या न्यायालयात हजर करणार आहेत

  • 21 Apr 2026 01:55 PM (IST)

    भारताची कच्च्या तेलाची समस्या 2030पर्यंत संपण्याची शक्यता

    भारताची कच्च्या तेलाची समस्या 2030पर्यंत संपण्याची शक्यता…. तेलवाहू जहाजांचा विमा काढणाऱ्या कंपन्यांची संख्या वाढवणार… जहाजांचा विमा काढणाऱ्या अधिक कंपन्याना मंजुरी देणार… होर्मुझमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताकडून रशियातून येणारं तेल सुरक्षित करण्याचा प्रयत्न…

  • 21 Apr 2026 01:45 PM (IST)

    जप्त केलेलं आमचं जहाज अमेरिकेनं सोडावं, इराणची मागणी

    अमेरिकेच्या नौदलाकडून इराणी तुस्का नावाचं जहाज जप्त… अमेरिकेने जप्त केलेलं आमचं जहाज सोडावं, इराणची मागणी… चीनहून इराणकडे केमिकल घेऊन जहाज येत होतं… या केमिकलचा उपयोग क्षेपणास्त्रे तयार करण्यासाठी होतो अमेरिकेचा दावा…

  • 21 Apr 2026 01:36 PM (IST)

    यवतमाळ मुलींच्या तस्करी प्रकरणी दुसरी ऑडिओ क्लिप समोर

    यवतमाळ मुलींच्या तस्करी प्रकरणी दुसरी ऑडिओ क्लिप समोर. भाजप जिल्हाध्यक्षांनी पोलिसांकडे ऑडिओ क्लिप दिली. तपासात सहकार्य न करणाऱ्या मुलीची दुसरी ऑडिओ क्लिप समोर. मुलीची चौकशी करण्याची भाजपची मागणी

  • 21 Apr 2026 01:20 PM (IST)

    विरोधक सिरिअल लायर, दिवसातून 5 वेळा खोटं बोलतात- फडणवीस

    विरोधक सिरिअल लायर, दिवसातून 5 वेळा खोटं बोलतात. महिला आरक्षण विधेयकावरून फडणवीसांचा हल्लाबोल. 2023लाच बिल पास झालं, अडीच वर्षांपासून अंमलबजावणी का नाही?, सुळेंचा सवाल तर विधेयक लागू कधी करायचं, याचं संविधान संशोधन आलं होतं, फडणवीसांचं उत्तर

  • 21 Apr 2026 01:00 PM (IST)

    स्थानिक स्वराज्य संस्थेची पटसंख्या वाढली पाहिजे- मंत्री दादा भुसे

    नवीन शैक्षणिक वर्षे १५ जून पासून सुरू होते. त्यापार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थेची पटसंख्या वाढली पाहिजे. जिल्हा परिषद, मनपा यांची आढावा बैठक घेतोय, असे मंत्री दादा भुसे म्हणाले. वेगवेगळ्या अडचणी असतात त्याचा आढावा घेतोय. चांगल्या सूचना पण आल्या आहेत. पुढील वर्ग वाढवण्याची मागणी सुद्धा आहे. जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने प्रयत्न असेल. शाळेची संख्या आणि पटसंख्या वाढली पाहिजे. स्पर्धेच्या युगात टीकण्यासाठी जे करावे लागेल ते करू. शाळेच्या कॅम्पसमध्ये शाळेच्या व्यतिरिक्त कुठलेही कामकाज असणार नाही. अवैध स्वरूपाचे काहीही असणार नाही, असे भुसे म्हणाले.

  • 21 Apr 2026 12:50 PM (IST)

    उधळलेला बैल विहिरीत; अग्निशमन दलाने वाचवला जीव

    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज महानगर परिसरातील कमळापूर रोडवरील भुजंग वस्ती येथे उधळलेला बैल विहिरीत पडल्याची घटना घडली होती. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.अग्निशमन जवानांनी दोरांच्या सहाय्याने बचावकार्य राबवत, दोन तासांच्या प्रयत्नांनंतर बैलाला सुखरूप बाहेर काढले

  • 21 Apr 2026 12:40 PM (IST)

    बारामतीत सांगता सभेची जय्यत तयारी पूर्ण

    बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या सांगता सभेची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. या सभेसाठी महायुतीतील प्रमुख नेते उपस्थित राहणार असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच सभास्थळी दाखल होणार आहेत. याच मंचावर खासदार सुप्रिया सुळे यांचीही उपस्थिती राहणार असून, त्यांच्या नावाची खुर्ची मंचावर लावण्यात आली आहे. त्यांच्या शेजारी छगन भुजबळआणि प्रफुल्ल पटेल यांची आसनव्यवस्था करण्यात आली आहे.या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि सुप्रिया सुळे आपल्या भाषणातून बारामतीकरांना नेमका काय संदेश देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • 21 Apr 2026 12:30 PM (IST)

    बारामतीत व्यापारी नाराज

    बारामती शहरात होणाऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सभा स्थळाजवळील सर्व दुकाने तात्पुरती बंद ठेवण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.सुरक्षेच्या कारणास्तव आणि गर्दी नियंत्रणासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने सभास्थळाच्या परिसरातील दुकानदारांना ठराविक वेळेत आपली दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

  • 21 Apr 2026 12:20 PM (IST)

    आदिलच्या या शौर्यामुळे अनेक पर्यटकांचे प्राण वाचले

    गेल्या वर्षी पहलगाम येथील बैसरन व्हॅलीत झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात अनेक पर्यटकांचा जीव वाचवण्यासाठी धाडसाने पुढे सरसावलेला आदिल सय्यद शहा दहशतवाद्यांच्या गोळीबारात शहीद झाला होता. त्याच्या भाऊ नौशाद शाह यांने आदिलच्या आठवणींना उजाळा दिला आहे. संकटाच्या त्या क्षणी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आदिल शहा यांनी पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. रायफलही रोखली होती. पण दहशतवाद्यांनी त्याला गोळ्या झाडल्या. आदिलच्या या शौर्यामुळे अनेक पर्यटकांचे प्राण वाचू शकले, अशी माहिती भावाने दिली आहे. आदिल शहा हे व्यवसायाने पोनी चालक होते आणि ते पर्यटकांना घोड्यावरून परिसरात फिरवण्याचे काम करत होते.

  • 21 Apr 2026 12:10 PM (IST)

    नाशिक महापालिकेत बैठकीचे आयोजन

    दादा भुसे यांच्या उपस्थितीत नाशिक महापालिकेत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे सर्व नगरसेवक बैठकीला उपस्थित असतील. मनपा शिक्षण विभागाचे अधिकारी देखील बैठकीला उपस्थित असतील. नगरसेवकांच्या अडचणींना अधिकाऱ्यांनी थेट उत्तर द्यावं यासाठी बैठक घेण्यात आलं. बैठकीला उपमहापौर विकास शिंदे देखील उपस्थित आहेत.

  • 21 Apr 2026 12:00 PM (IST)

    पहलगाम हल्ला, आदील हुसेन शहाच्या कुटुंबियांना शिवसेनेकडून पक्के घर

    पहलगाम दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या पोनी चालक आदील हुसेन शहा यांच्या कुटुंबीयांना शिवसेनेकडून नवीन पक्के घर बांधून देण्यात आलंय. या घराची सध्या परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. सुमारे १० ते १२ लाख रुपये खर्चून बांधलेले हे एकमजली घर मजबूत सिमेंट-काँक्रीटचे असून त्यामध्ये प्रशस्त हॉल, स्वयंपाकघर, दोन बेडरूम आणि स्वच्छतागृहाची सुविधा देण्यात आली आहे. पूर्वी आदील यांचे कुटुंब माती आणि लाकडाच्या जुन्या घरात राहत होते. आदील यांचे वडील इक्बाल शहा यांनी भावनिक प्रतिक्रिया देताना सांगितले, “पर्यटकांनी पुन्हा येथे यावे, घाबरू नका. आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत.आमच्या मुलाने देशासाठी बलिदान दिले, त्यामुळे आम्हाला अभिमान आहे.” त्यांनी शिवसेनेचे आभार मानत हे घर त्यांच्या कुटुंबासाठी मोठा आधार असल्याचे नमूद केले.

  • 21 Apr 2026 11:49 AM (IST)

    जळगावच्या सराफ बाजारात आज सोन्याच्या दरात किरकोळ वाढ, चांदीचे दर जैसे थे

    जळगावच्या सराफ बाजारात आज सोन्याच्या दरात किरकोळ वाढ झाली असून चांदीचे दर जैसे थे आहेत.  सोन्याच्या दरात 700 रुपयांची तर चांदीच्या दरात कुठलीही वाढ नाही, चांदीचे दर स्थिर आहेत. आता सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 57 हजार 281 रुपयांवर पोहोचले आहेत तर चांदीची किंंमत  जीएसटीसह 2 लाख 62 हजार 650 रुपये इतकी आहे.

    अमेरिका व इराण यांच्या युद्धविरामाच्या आठवड्याचा आज शेवटचा दिवस असून या युद्धासाठी होणाऱ्या बैठकीत युद्ध विरामाची घोषणा झाल्यास सोन्या-चांदीचे दरात मोठी भाव वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

  • 21 Apr 2026 11:28 AM (IST)

    नाशिक – वृक्षतोड आणि गोदावरी काँक्रीटीकरण विरोधात पर्यावरण प्रेमींचा मोर्चा

    नाशिक –  वृक्षतोड आणि गोदावरी काँक्रीटीकरण विरोधात  पर्यावरण प्रेमींचा मोर्चा, मनसेचाही पाठिंबा.  शहरात सुरू असलेली वृक्षतोड तातडीने थांबवण्याची मागणी करण्यात येत असून तसेच गोदावरीच्या काँक्रीटीकरणाला देखील पर्यावरण प्रेमींनी विरोध दर्शवला आहे.  घोषणाबाजी करत मोर्चा महापालिकेच्या प्रवेशद्वारावर पोहोचला.

  • 21 Apr 2026 11:20 AM (IST)

    भोंदू अशोक खरात प्रकरणात समता पतसंस्थेवर पोलिसांची मेहेरबानी..?

    शिर्डी / अहिल्यानगर  –  भोंदू अशोक खरात प्रकरणात समता पतसंस्थेवर पोलिसांची मेहेरबानी..? अनुयायांच्या नावावर बनावट खाती उघडून कोट्यवधींचा व्यवहार उघड.  45 खातेदारांची चौकशी ; खाते उघडलेच नाही , स्वाक्षरी आमची नाही असा खातेदारांनी जबाब दिला आहे.
    समता पतसंस्थेच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी संस्थेवर ठोस कारवाई नाही; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

  • 21 Apr 2026 11:09 AM (IST)

    मिरा-भाईंदरमध्ये भाजप नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने मोठी खळबळ

    मिरा-भाईंदरमध्ये भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.   लग्नाचे आमिष दाखवून जुलै 2022 पासून पीडितेवर वारंवार अत्याचार केल्याचा आणि तिला धमकावल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
    मिरा रोड पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६९ आणि ३५१(२) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

  • 21 Apr 2026 10:57 AM (IST)

    सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची सांगता सभा, पार्थ पवारकडून बारामतीतील सभेचे नियोजन

    उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची सांगता सभा आज बारामतीमध्ये पार पडणार आहे. या सभेचे नियोजन खासदार पार्थ पवार यांनी केले असून त्यांनी सभास्थळी माईक, साऊंड सिस्टीम तसेच उपस्थित पाहुण्यांसाठी करण्यात येणाऱ्या बसण्याच्या व्यवस्थेची स्वतः पाहणी केली.

  • 21 Apr 2026 10:47 AM (IST)

    सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज अलर्ट, हलक्या स्वरुपाचा पाऊस कोसळणार

    सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून गडगडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्या अनुषंगाने काही भागात गडगडाट सुरू झाला आहे. तर सह्याद्री पट्ट्यात काळोख दाटून आला आहे. हवामानातही अचानक बदल झाला असून वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला आहे. हवामान विभागाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट देण्यात आला आहे.

  • 21 Apr 2026 10:37 AM (IST)

    मध्य रेल्वेचा खोळंबा, कल्याण-डोंबिवली स्थानकांवर प्रवाशांची तुंबळ गर्दी, गाड्या उशिराने

    मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाल्याने मुंबईकरांच्या प्रवासाचे वेळापत्रक कोलमडले आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्थानकांवर प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. तांत्रिक कारणांमुळे लोकल गाड्या साधारण १० ते १२ मिनिटे उशिराने धावत असल्याने रेल्वे स्थानकांवरील फलाटांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत होती. कामावर जाण्याच्या घाईत असलेल्या चाकरमान्यांना या विलंबाचा मोठा फटका बसला असून, कल्याण-डोंबिवलीसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर प्रवाशांचे हाल होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

  • 21 Apr 2026 10:27 AM (IST)

    बीडमध्ये शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच; गेल्या 5 वर्षात 1190 शेतकऱ्यांनी संपवले जीवन

    बीड जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येची गंभीर परिस्थिती समोर आली असून गेल्या पाच वर्षांत तब्बल १,१९० शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. विशेषतः २०२६ सालातील पहिल्या ८९ दिवसांतच ४१ शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याने खळबळ उडाली आहे. सततची नापिकी, कधी अतिवृष्टीचा फटका, तर कधी बाजारभावातील मोठी घसरण आणि डोक्यावर वाढत असलेला कर्जाचा डोंगर या विळख्यात बळीराजा अडकला आहे. शासनाकडून विविध योजना जाहीर केल्या जात असल्या तरी, प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या आयुष्यातील हा फास कधी सुटणार? असा संतप्त प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

  • 21 Apr 2026 10:17 AM (IST)

    गोरेगाव ड्रग्ज प्रकरण: मीरा रोडवरून ड्रग्ज तस्कराच्या पत्नीला अटक

    गोरेगाव येथील ड्रग्ज रॅकेटप्रकरणी वनराई पोलिसांनी मोठी कारवाई करत एका कुख्यात ड्रग्ज तस्कराच्या पत्नीला, जिया जेकबला मीरा रोड परिसरातून ताब्यात घेतले आहे. यापूर्वी अटक करण्यात आलेल्या ड्रग्ज पेडलर्सनी संबंधित तस्कराकडूनच ‘एक्स्टसी’ (Ecstasy) ड्रग्ज घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. विशेष म्हणजे, आरोपी पेडलर्स आणि ड्रग्ज तस्कर यांच्यातील आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे थेट जिया जेकबच्या बँक खात्यापर्यंत पोहोचले आहेत. बँक स्टेटमेंटच्या तपासणीत पेडलर्सनी तिच्या खात्यावर मोठ्या प्रमाणावर पैसे जमा केल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली असून, सध्या या प्रकरणातील मुख्य तस्कराचा शोध आणि जियाची कसून चौकशी सुरू आहे.

  • 21 Apr 2026 10:07 AM (IST)

    देवेंद्र फडणवीस किती खोटं बोलणार, संजयर राऊतांचा सवाल

    महिला आरक्षणांचं कोणतंही विधेयक पाडलं नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किती खोटं बोलणार आहात. भाजपच्या एका गटाला पंतप्रधान नरेंद्र मोदींना घालवायचे वेध लागलेत, भाजपची कोणती लेव्हल आहे ते सांगावे. देवेंद्र फडणवीसांनी विधेयक नीट वाचावे, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला.

  • 21 Apr 2026 09:50 AM (IST)

    जळगावच्या चोपडा येथे जुन्या वादातून तरुणाची हत्या

    जळगावच्या चोपडा येथे जुन्या वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. प्रदीप राजेंद्र माळी असे हत्या झालेल्या मयत 35 वर्षीय तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चेतन कानडे या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. मयताच्या खिशात असलेल्या लग्न पत्रिकेवरून तसेच हातावरील टॅटू वरून ओळख पटल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींनी मयताची पान टपरी जाळल्याने जुना वाद होता याच वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे

  • 21 Apr 2026 09:40 AM (IST)

    चंद्रपूर चौथीच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू

    चंद्रपूर जिल्ह्यात शाळेत जाण्यासाठी तयार होत असलेल्या एका 10 वर्षीय विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू झालाय. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहरातील ही घटना असून ईशान सत्यपाल आत्राम असं मृतक विद्यार्थ्यांचं नाव आहे. चौथ्या वर्गात शिकणारा ईशान सकाळी शाळेत जाण्यासाठी तयार होत असतानाच अचानक खाली कोसळला. पालकांनी त्याला तातडीने शहरातीलच एका रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

  • 21 Apr 2026 09:30 AM (IST)

    गिरणार–दुगाव रोडवर भीषण अपघात, मोठी खळबळ

    वाळू गणपत थेटे गंभीर जखमी. सकाळी मारुती रायांच्या दर्शनासाठी जात असताना अपघात. अज्ञात पिकअप वाहनाची जोरदार धडक. धडकेनंतर चालक घटनास्थळावरून फरार. वाळू थेटे यांची प्रकृती चिंताजनक. फरार वाहनचालकाचा शोध सुरू. पोलिस तपास सुरू

  • 21 Apr 2026 09:20 AM (IST)

    अवकाळी पावसाने हळद उत्पादक शेतकऱ्यांच प्रचंड नुकसान

    वाळू घातलेल्या हळदीच्या ताडपत्री वरून वाहत आहे पाणी. हळद भिजल्याने काळी पडणार. हळद उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता.. जिल्ह्यात मध्ये रात्री विजांच्या कडकडाटासह झाला अवकाळी पाऊस अवकाळी पावसाने शेती पिकांचे नुकसान

  • 21 Apr 2026 09:11 AM (IST)

    राज्यावर पावसाचे मोठे संकट, पुढील काही तास धोक्याची..

    राज्यावर पावसाचे सावट आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांकरिता अत्यंत मोठा इशारा दिला. पुढील काही तास राज्यात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. काही भागात अवकाळी पावसाला सुरूवात देखील झाली. मुंबईसह उपनगरात ढगाळ वातावरण झाले असून पाऊसही पडत आहे.

  • 21 Apr 2026 09:06 AM (IST)

    पुणे जिल्ह्यातील वाकी बुद्रुकच्या भैरवनाथ पतसंस्थेत ६.५३ कोटींचा घोटाळा

    पुण्याच्या खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथील भैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत तब्बल ६ कोटी ५३ लाख ९२ हजार रुपयांचा आर्थिक घोटाळा उघडकीस आला असून, या प्रकरणी तब्बल ३६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संचालक मंडळ आणि संबंधितांनी संगनमताने ठेवीदारांचा विश्वासघात करत मोठ्या प्रमाणात अपहार केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

  • 21 Apr 2026 09:00 AM (IST)

    उत्तर भारतामध्ये उष्णतेची लाट

    उत्तर भारतामध्ये तापमानाचा पारा वाढणार असून, काही दिवसांत दिल्लीतील तापमान ४३ अंश सेल्सिअसवर जाण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. दिल्लीतील रिज स्टेशन, मुंगेशपूर, आयानगर आणि इतर हवामान केंद्रामध्ये रविवारी कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवण्यात आलं.

  • 21 Apr 2026 08:50 AM (IST)

    बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात दिलासा

    बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात दिलासा मिळाला आहे. तात्पुरती जप्तीचे दिलेले आदेश रद्द करण्यात आले आहेत. भोसले यांच्या येस बँक आणि डीएचएफएल प्रकरणी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ‘येस बँक’ आणि ‘दिवाण हाउसिंग फायनान्स लिमिटेड’च्या (डीएचएफएल) आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) न्यायालयात सुरू असलेल्या दाव्यात बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले आणि त्यांच्याशी संबंधित कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

    ED ने दिलेले तात्पुरत्या जप्तीचे आदेश न्यायालयाने रद्द करत, कारवाई मोठ्या प्रमाणात अस्थिर असल्याचे नमूद केले आहे. न्यायाधिकरणाचे अध्यक्ष न्यायाधीश मुनीश्वर नाथ भंडारी आणि सदस्य जी. सी. मिश्रा यांनी हा निकाल दिला असून आता पुढील प्रक्रिया लवकरात सुरू करण्यात येणार आहे.

  • 21 Apr 2026 08:40 AM (IST)

    बदलापूरला अवकाळी पावसाने झोडपलं; अचानक आलेल्या पावसामुळे बदलापूरकरांची तारांबळ

    आज सकाळच्या सुमारास बदलापुरात ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. गेल्या दोन दिवसांपासून बदलापूर आणि ग्रामीण भागात तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे होता. त्यानंतर सकाळी ढग भरून आले आणि बदलापूर परिसरात पावसाने हजेरी लावली. या पावसाचा सर्वाधिक फटका नोकरदार वर्गाला बसलाय. सकाळी कामावर जाण्याच्या गडबडीत पावसाने हजेरी लावल्यामुळे चाकरमान्यांना भिजत भिजतच रेल्वे स्टेशन गाठावं लागलय.

  • 21 Apr 2026 08:30 AM (IST)

    अक्षय तृतीयेला देशभरात २० टन दागिन्यांची खरेदी; दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणावर विक्री

    अक्षय तृतीयेच्या दिवशी संपूर्ण देशात १८ ते २० टनांच्या आसपास सोन्या-हिऱ्यांच्या दागिन्यांची विक्री झाल्याचा अंदाज ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे (जीजेसी) अध्यक्ष राजेश रोकडे यांनी व्यक्त केला आहे. विशेषतः दक्षिण भारतातही मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. तेथे सकाळपासूनच लोकांनी सोन्याचे दागिने घ्यायला गर्दी केली होती, तर महाराष्ट्रात दुपारनंतर विक्री खऱ्या अथनि सुरू झाली आणि दुकाने रात्री उशिरापर्यंत उघडी होती, असेही ते म्हणाले. मागील वर्षीच्या अक्षय तृतीयेला १० ग्रॅमसाठी सोन्याचा भाव ९० हजार रुपये होता. तो आता एक लाख ५४ हजार रुपये आहे.

  • 21 Apr 2026 08:20 AM (IST)

    मुंबईत दोन दिवस पाणीबाणी, १८ तास पुरवठा बंद; पाच विभागांना फटका

    मुंबईच्या दक्षिण आणि मध्य भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिकेने शिवडी येथे महत्त्वाचे तांत्रिक काम हाती घेतले आहे. शिवडी येथील हाजी बंदर मार्गावर १,५०० मिमी व्यासाचे दोन नवे ‘बटरफ्लाय व्हॉल्व’ बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे बुधवारी सकाळी १० वाजल्यापासून गुरुवारी पहाटे चारपर्यंत म्हणजे जवळपास १८ तास मुंबईतील ए, बी, सी, ई आणि एफ-दक्षिण या पाच विभागांतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

  • 21 Apr 2026 08:16 AM (IST)

    नाशिकमधील TCS प्रकरणातील संशयित आरोपींकडून मोबाईल जप्त; व्हॉट्सअप ग्रुपची माहिती SIT तपासात समोर

    नाशिकमधील TCS प्रकरणातील संशयित आरोपींकडून मोबाईल जप्त करण्यात आला. व्हॉट्सअप ग्रुपची माहिती SIT तपासात समोर आली आहे. दररोज ग्रुप लीडर ग्रुपमधून वेगवेगळे आक्षेपार्ह मेसेज पाठवून तरुणींचा छळ करत होत अशी सूत्रांची माहिती आहे. ऑफिसमध्ये दररोज नेटचा पासवर्ड अश्लील नावाने किंवा मुलींच्या धार्मिक भावना दुखावतील अशा पद्धतीने सेट केले जात असल्याचे देखील प्रकार समोर आले आहेत. तरुणी आणि महिलांचे लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराचा प्रयत्न केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींचा पुन्हा पोलीस ताबा घेऊन या प्रकरणात अधिकचा तपास केला जाणार आहे.

  • 21 Apr 2026 08:14 AM (IST)

    नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरातच्या कोट्यवधींच्या प्रॉपर्टीवर ईडीकडून तात्पुरती टाच येण्याची शक्यता

    नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरातच्या कोट्यवधींच्या प्रॉपर्टीवर ईडीकडून तात्पुरती टाच येण्याची शक्यता आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ED कडून कारवाईला वेग आला आहे. ईडीकडून संबंधित मालमत्तांची तपशीलवार छाननी सुरू असून संशयित व्यवहारांमुळे कोट्यवधींची संपत्ती अडचणीत आली आहे. बोगस गुंतवणूक, फसवणूक आणि मनी लाँड्रिंगबाबत अद्याप तपास सुरू आहे. विविध ठिकाणी छापे टाकून महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. पुढील काही दिवसांत मोठ्या कारवाईची शक्यता आहे.

  • 21 Apr 2026 08:13 AM (IST)

    नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका

    नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. 65 हजार शेतकऱ्यांच्या 41 हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. कृषी विभागाकडून मार्च मधील नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. 73 कोटींचा नुकसानभरपाई प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आला आहे. 410 गावांमध्ये शेतीचं नुकसान झालं असून 65,756 शेतकरी बाधित झाले आहेत. तर 34,136 हेक्टरवरील कांदा पिकाचं सर्वाधिक नुकसान झालं आहे. डाळिंब 4,584 हेक्टर, गहू 1,231 हेक्टर, भाजीपाला 189 हेक्टर नुकसान झालं आहे.

    फळपिकांसाठी स्वतंत्र 11 कोटींच्या मदतीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. हेक्टरी 8,500 ते 22,500 रुपयांपर्यंत मदत देण्याची तरतूद आहे. सिन्नर, निफाड, दिंडोरी, मालेगावसह अनेक तालुक्यांना फटका बसला आहे.

Follow Us