Maharashtra News LIVE : नागपुरात सिलेंडर तुटवड्यामुळे चहा-मिठाई बंद
Maharashtra News LIVE Updates : गुढीपाडवा आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता रेल्वे पोलीस आणि आरपीएफ यांनी मुंबईसह उपनगरीय मार्गावरील प्रमुख स्थानकांवर कडक बंदोबस्त तैनात केला आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
नागपुरात सिलेंडर तुटवड्यामुळे चहा-मिठाई बंद
एलपीजी सिलेंडर तुटवडा असल्याने नागपुरातील प्रसिद्ध श्रद्धा फरसाणमध्ये चहा आणि मिठाई प्रोसेसिंग बंद करण्यात आली आहे. चहा आणि मिठाई प्रोसेसिंगला जास्त गॅस लागतो. त्यामुळे प्रोसेसिंग बंद करण्यात आली आहे. अजूनही एलपीजीचा पुरवठा सुरळीत झालेला नाही. पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत चहा-मिठाई प्रोसेसिंग बंद राहणार असल्याचं समजत आहे. नास्ता मात्र सुरू ठेवण्यात आला आहे.
-
युद्धाचे परिणाम, गुढीपाडव्यावर महागाईचे संकट
गुढीपाडव्यावर युद्धाचे परिणाम झालेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे गुढीपाडव्यावर महागाईचे संकट पाहायला मिळत आहे. डिझेल भट्टीच्या वापरामुळे साखर माळांचा दर किलोमागे 30 रुपयांनी वाढला आहे. गॅस मिळत नसल्याने साखरेचा पाक डिझेल भट्टीवर तयार करावा लागत आहे. तर अनेक ठिकाणी साखर माळा तयार करणारे कारखाने बंद झालेत. त्यामुळे साखर माळांच्या मागणीत वाढ झाली आहे. पाणी भट्टीसाठी डिझेल लागत असल्याने साखरगाठीच्या माळांचा भाव 110 रुपये किलो वरून 140 रुपये किलोवर पोहचला आहे.
-
-
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याची शिवाजी पार्कवर जय्यत तयारी
मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर जय्यत तयारी सुरु आहे. गुढीपाडव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मेळावा पार पडणार आहे. राज ठाकरे या मेळाव्यात मराठी भाषा, मराठी माणसांचे प्रश्न, स्थानिकांना मिळणाऱ्या संधी आणि सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच मनसेप्रमुख राज्यातील काही ताज्या घडामोडींवरही भाष्य करू शकतात.
-
उमरगा तालुक्यातील कदेर परिसरात गारांचा पाऊस, शेती पिकांचे नुकसान
धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील कदेर परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे झालेल्या गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झालं. कडाक्याच्या उन्हाळ्यात अचानक आलेल्या या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केलं. काढणीसाठी तयार असलेले कांदा,ज्वारी आणि गव्हाच्या पीकाचे मोठे नुकसान झालं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
-
आपने केरळ निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी केली जाहीर
आम आदमी पक्षाने आगामी केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत 21 उमेदवारांचा समावेश आहे. यापूर्वी, आम आदमी पक्षाने आपल्या पहिल्या यादीत 22 उमेदवारांची घोषणा केली होती. आतापर्यंत, आम आदमी पक्षाने केरळ विधानसभा निवडणुकीसाठी दोन याद्या जाहीर करून 43 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
-
-
ममता बॅनर्जी बंगालमधील भवानीपूरमधून निवडणूक लढवतील
टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक भवानीपूरमधून लढवणार असून, त्यांच्या विरोधात सुवेंदू अधिकारी उभे असतील.
-
परराष्ट्र व्यवहार संसदीय समितीची बैठक उद्या होणार
परराष्ट्र व्यवहार संसदीय समितीची बैठक उद्या होणार आहे. पश्चिम आशियामध्ये राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेबाबत आणि त्यांच्या सुखरूप परतीबाबत सरकार माहिती देईल. या बैठकीला परराष्ट्र सचिवांसह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. एआय शिखर परिषदेच्या आयोजनाबाबतही माहिती दिली जाईल. ही बैठक उद्या सायंकाळी 4.30 वाजता संसद भवनाच्या परिशिष्टात होणार आहे.
-
इराणमधून 650 भारतीय उद्या संध्याकाळपर्यंत भारतात परततील – परराष्ट्र मंत्रालय
सरकारने सांगितले की, काल संध्याकाळपर्यंत विद्यार्थ्यांसह 650 भारतीय अर्मेनिया आणि अझरबैजानमार्गे इराणहून भारतात प्रवास करत होते. आता आणखी 50 भारतीय अर्मेनियामध्ये दाखल झाले आहेत. एकूण 700 भारतीय देशात दाखल होतील.
-
पुण्यातील जे.एम. रोड खाऊ गल्लीतील स्टॉल बंद
गॅस सिलींडरच्या अभावी पुण्यातील जे. एम. रोडलगत असलेल्या हिंदवी स्वराज्य खाऊ गल्लीतील खाद्यपदार्थाचे अनेक स्टॉल बंद पडले आहे. गॅस सिलींडर उपलब्ध होत नसल्याने खाऊ गल्लीतील अनेक स्टॉल बंद करण्याची वेळ आली आहे.
-
धुळे येथे शिवशाही बसला भीषण आग
धुळ्यात मुंबई – आग्रा महामार्गावरील पारोळा चौफुलीच्या उड्डाणपुलावर शिवशाही बसला आग लागल्याची घटना घडली आहे. ही शिवशाही बस आरटीओ ऑफिसला पासिंगसाठी जात असताना ही घटना घडली. सुदैवाने या बसमध्ये प्रवासी नसल्याने अनर्थ टाळला आहे.
-
ठाण्यात यंदाही चैत्र नवरात्रोत्सवाचा भक्तीचा महासागर
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ठाण्यातील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर यंदाही चैत्र नवरात्रोत्सवाचा भक्तीचा महासागर उसळणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आयोजित या उत्सवाचे हे ३१ वे वर्ष असून, यंदा धाराशिव येथील आई तुळजाभवानी मंदिराची ७० फूट उंच भव्य प्रतिकृती ठाणेकरांचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.
-
अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शीमध्ये काँग्रेसचं रास्तारोको आंदोलन
अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी येथील नळ नदीवरील पुलाचे काम आठ वर्षापासून रखडल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून रास्तारोको आंदोलन करण्यात आलं आहे. वारंवार मागणी करून देखील दखल घेतली जात नसल्यानं प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं आहे.
-
विविध मागण्यांसाठी पुण्यातील शेती महामंडळासमोर कामगारांचं ठिय्या आंदोलन
आपल्या विविध मागण्यांसाठी पुण्यातील शेती महामंडळळासमोर कामगारांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनामध्ये हजारो कामगार सहभागी झाले आहे. आम्हाला हक्काची जमीन नाही, राहायला घर नाही, याचा शासनाने विचार करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
-
गुढीपाडव्यानिमित्त सांगलीच्या बाजारपेठेत गाठी दाखल
गुढीपाडव्यानिमित्त आता सांगलीच्या बाजारपेठेत गाठी दाखल झाल्या आहेत. कच्च्या मालाचे वाढलेले दर आणि आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम सध्या या व्यवसायावर झाल्याचं पहयाला मिळत आहे. गाठीचे दर देखील वाढले आहेत.
-
नाशिकमध्ये कोळशाच्या मागणीमध्ये वाढ
नाशिकमध्ये कोळशाच्या मागणीमध्ये वाढ
हॉटेल व्यवसायिकांकडून कोळशाची अधिक प्रमाणात खरेदीकोळशाची मागणी वाढल्यानं दरातही वाढ
30 रुपये किलो असलेल्या कोळशाची आता 35 रुपये किलोंनी विक्री
हॉटेल व्यवसायिकांसह घरगुती वापरासाठी देखील कोळशाची मागणी
-
श्री तुळजाभवानी मंदिरात प्रसादाचे वाटप सुरळीत
युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये व्यावसायिक सिलेंडर पुरवठा बंद असल्याने अनेक महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी महाप्रसाद आणि अन्नक्षेत्र यावरती त्याचा थेट परिणाम झाला आहे मात्र महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये प्रसादाची व्यवस्था सुरळीत सुरू असून दररोज तीन हजाराच्या आसपास प्रसादाचे लाडू विक्री होत आहे.
-
चिपळूण नगर परिषद प्रशासनाच्या कारभारा विरोधात काँग्रेस आक्रमक
भाजपच्या जिल्हाध्यक्षांचे दिनाच्या बोर्डावर नाव टाकल्याबाबत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय जाधव यांच्या दालनात काँग्रेस जिल्हाध्यक्ष यांनी विचारला जाब. काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या प्रश्नांवर मुख्याधिकारी निरुत्तर. राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे नाव टाकणे चूक. मुख्याधिकारी यांची कबुली.
-
आईवर सावत्र मुलगा व कुटुंबीयांकडून मारहाण
शिरूर तालुक्यातील वढू बुद्रुक येथे नात्यांना काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. जमिनीच्या वादातून सावत्र मुलगा आणि त्याच्या कुटुंबीयांनी स्वतःच्या वृद्ध आईवरच अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे.
-
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पंतप्रधान मोंदींसोबत दीड तास चर्चा
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईत विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच अचानक दोन दिवस दिल्लीच्या विशेष दौऱ्यावर गेले. एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत दीड तास सखोल चर्चा केली. त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ पाहायला मिळाली.
-
नागपुरात एलपीजी दरवाढीविरोधात ऑटो चालक संघटनांचं आंदोलन
नागपुरात एलपीजी दरवाढीविरोधात ऑटो चालक संघटनांचं आंदोलन. काँग्रेसचे नगरसेवक वसीम खान यांच्या नेतृत्वात आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ऑटो चालक संघटनांचं आंदोलन. आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त
-
वाशिम जिल्ह्यासह परिसरात १७ ते २० मार्चदरम्यान अवकाळी पावसाचा इशारा
वाशिम जिल्ह्यासह परिसरात १७ ते २० मार्चदरम्यान अवकाळी पावसाचा इशारा.. काही ठिकाणी जोरदार पावसासह वादळीवाऱ्याची शक्यता… रब्बी हंगामातील हरभरा, गहू आणि इतर पिके काढण्याची लगबग सुरू असताना शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण
-
गॅस टंचाईमुळे सोलापुरातील इस्कॉन संस्थेलाही फटका
गॅस टंचाईमुळे सोलापुरातील इस्कॉन संस्थेलाही फटका….इस्कॉनच्या अन्नछत्रामधील गॅस सिलेंडर संपल्याने चुलीवर प्रसाद तयार करण्याचे काम सुरू आहे.
-
राज्यातील गॅस पुरवठ्याचा सिंधुदुर्गमधील कुडाळ MIDC वर परिणाम
राज्यातील गॅस पुरवठ्याचा सिंधुदुर्गमधील कुडाळ MIDC वर परिणाम.. MIDCतील 300 पैकी 150 उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर.. गॅस पुरवठा होत नसल्याने बाहेरच्या देशातील ऑर्डर घेता येत नाहीत.. MIDC अध्यक्षांची प्रतिक्रीया..
-
युद्धाचा लातूरमधील पाणी बॉटल्स आणि कोल्ड्रिंक्सवरही परिणाम
युद्धाचा लातूरमधील पाणी बॉटल्स आणि कोल्ड्रिंक्सवरही परिणाम…बॉटल्स बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालाचा तुटवडा…त्यामुळे राज्यातल्या पॅकेजिंग कंपन्यांनी भाव वाढवले …
-
गॅस दरवाढी विरुद्ध ठाकरे गटाचे आंदोलन
गॅस सिलेंडरचा तुटवडा व गॅस दरवाढी विरुद्ध जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना ठाकरे गटाने जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. डोळ्यावर आणि तोंडावर काळया पट्ट्या बांधून अनोखे आंदोलन करत शिवसेना ठाकरे गटाने प्रशासनाचे लक्ष वेधलं. जळगाव शहरातील गॅसचा तुटवडा तसेच गॅस सिलेंडरच्या दरात झालेली वाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाने आंदोलन केले. सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास दूर करावा , रिक्षा चालकांच्या समस्या सोडवाव्यात, गॅस दरवाढ रद्द करावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येऊन मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये जल शुद्धी केंद्रावरून पाणीपुरवठा खंडित
छत्रपती संभाजीनगरमध्ये बिडकीनी जवळील पारोळा जल शुद्धी केंद्रावरून पाणीपुरवठा खंडित झाला आहे. जल शुद्धी केंद्राच्या विद्युत पुरवठ्याला अडचण आल्याने टँकरद्वारे पुरवठा होणार्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला. महानगरपालिकेच्या N5 जल कुंभावर सकाळपासून 41 टँकर उभे आहेत. अजून तीन तास विद्युत पुरवठा सुरळीत होणार नसल्याची माहिती समोर येत आहे. तापमानाचा पारा वाढलेला असताना शहरातील अनेक भागातील नागरिक टँकरच्या प्रतिक्षेत आहेत.
-
पोलीस शिपाई ७१७ पदांकरिता २३७९१ उमेदवार लेखी परीक्षेच्या रेसमध्ये
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यांपासून पोलीस भरती सुरू असून पोलीस भरती ७१७ पदांकरिता घेण्यात येत आहे. यात सत्तावीस चालक पदाकरिता अंतिम चाचणी सुरू असून लेखी परीक्षा उद्या होणार आहे. या पोलीस भरतीसाठी 23,791 उमेदवारांनी भाग घेतला. गडचिरोली जिल्ह्यातील बारा तालुक्यातून हे सर्व विद्यार्थी मैदान चाचणी पूर्ण करून लेखी परीक्षेसाठी निवड झाले. 18 तारखेला चालक पोलीस पदाकरिता लेखी परीक्षा व 22 तारखेला पोलीस शिपाई पदाकरिता लेखी परीक्षा घेण्यात येत आहे. ७१७ पदाकरिता जवळपास 24 हजार उमेदवार आपला भविष्य आजमविणार आहेत.
-
घराच्या किंमती भडकणार?
आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता घरबांधणी साहित्यावरही दिसून येत आहे. गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे टाइल्स निर्मिती करणारे अनेक कारखाने ठप्प झाल्याची माहिती समोर येत आहे. गॅसवर चालणाऱ्या मशीनमुळे टाइल्स कटिंग आणि प्रक्रिया प्रभावित झाली आहे. यामुळे अमरावतीच्या बाजारपेठेत नवीन टाइल्सचा पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाले आहेत. टाइल्सचे दर प्रति स्क्वेअर फुट तीन रुपयांनी महाग झाल्याची माहिती आहे. आगामी काळात सिलेंडरचा पुरवठा झाला नाही तर आणखी दर वाढणार असल्याचे समोर येत आहे.
-
अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात आंदोलन
नागपुरात गॅस सिलेंडर तुटवड्याच्या विषयाला धरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.या वेळी गॅस सिलेंडर ला हार घालत सरकार विरोधात घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली शासनाचा चुकीचा धोरणामुळे गॅस तुडवडा निर्माण झाला. याचा त्रास जनतेला होत आहे. तर दुसरीकडे मात्र नागरिक रांगांमध्ये लागून अडचणीचा सामना करत आहे. यात गॅस एजन्सी समोर मोठ मोठ्या रांगा लागलेल्या आहेत. पण सरकारचा याकडे लक्ष नाही. राज्य शासन राज्यात तुटवडा नाही असा दावा करत आहे. अशा पद्धतीने कोणती आश्वासन किंवा दिलासा जनतेला न देत राज्यात तुटवडा नाही असे दावे सरकार करत आहे. राज्यात लोकांना होणार त्रास दूर करावा अशी मागणी आंदोललनातून करण्यात आलीय.
-
घरगुती गॅस टाकी 30 दिवसांऐवजी 45 दिवसांनी मिळणार
बीड जिल्ह्यात गॅस साठा पुरेसा उपलब्ध असुन पुरवठा सुरळीत सुरू असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र दोन टाक्यांमधील अंतर हे आता 21 ते 30 दिवसांऐवजी 45 दिवसांपर्यंत वाढवण्यात आले आहे. यामुळे घरगुती गॅस वापरणाऱ्यांना मोठ्या अडचणी येण्याची शक्यता आहे. तीस दिवसांपर्यंतचा कालावधी योग्य होता मात्र आता आणखी पंधरा दिवस गॅस कसा पुरवायचा असा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित झाला आहे. साठा पुरेसा उपलब्ध आहे तर ही अट का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
-
विविध मागण्या साठी शेतकऱ्यांचे गोंदी येथील गोदावरी नदी पात्रात जलसमाधी आंदोलन
जालना जिल्ह्यातील गोंदी या ठिकाणी गोदावरी नदी पात्रात शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन सुरु केलय.सरसकट कर्जमाफी त्याच बरोबर २०२५ चा खरीप पिकविमा मिळावा यासह अन्य मागण्यांसाठी गोंदि येथील गोदावरी नदीच्या पात्रात शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलय.राज्य सरकारने २ लाख रुपयाची कर्ज माफीची घोषणा केली असून,ही पूर्ण फसवी आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय.तसेच राज्य सरकारने आमच्या आंदोलनाची तत्काळ दखल घेतली नाही तर आम्ही आजचे जलसमाधी आंदोलन कायम स्वरुपी करत असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय.
-
चंद्रपूर शहरातही जाणवायला लागला घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा
चंद्रपूर शहरातल्या अनेक गॅस एजन्सीवर लोकं सिलेंडर घेण्यासाठी सकाळपासून रांगा लावून असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर शहरात आतापर्यंत गॅसचा मोठा तुटवडा जाणवत नव्हता मात्र 12 तारखेपासून गॅस सिलेंडरचा पुरवठा होत नसल्यामुळे हा तुटवडा निर्माण होत असल्याचं गॅस एजन्सी संचालकांचं म्हणणं आहे.
-
दिव्यातील ग्लोबल शाळेच्या मैदानामध्ये स्कूल व्हॅनने घेतला अचानक पेट…
दिव्यातील ग्लोबल शाळेच्या मैदानामध्ये पार्क करून ठेवलेल्या शाळेतील स्कूल व्हॅनने अचानक पेट घेतला आहे. सदर आगीमध्ये स्कूल व्हॅन पूर्णपणे जळून नुकसान खाक झाली आहे. अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले आहे. यामध्ये कोणतेही जीवितहानी नाही. सदर घटना कालची असून आग कशामुळे लागली याचा पुढील तपास मुंब्रा पोलीस करत आहे.
-
युद्धाचे तीव्र पडसाद मुंबईतील हाॅटेल इंडस्ट्रीवर होत आहेत….
युद्धाचे तीव्र पडसाद मुंबईतील हाॅटेल इंडस्ट्रीवर होत आहेत. भायखळ्यातील प्रख्यात अशा पर्शियन दरबार हाॅटेलमध्ये सध्या शुकशुकाट पसरलाय. रान बिर्यानीसाठी फेमस असलेल्या या हाँटेलमध्ये रान बिर्यानी तयार होणं बंद झालंय… गॅस नसल्याने मेनुतील 300 खाद्यपदार्थ बंद करण्यात आले आहेत. या भयंकर अवस्थेनॅ कोविडचे दिवस आठवले अशी प्रतिक्रिया हाॅटेल मॅनेजरने दिलीये…
-
खामगाव रेल्वे स्टेशन मुख्य प्रवेशद्वारावर रात्री अज्ञाताने स्थापित केला अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा..
बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावर रात्री अज्ञात व्यक्तीने अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा स्थापित केल्याने खामगाव शहरात खळबळ उडाली आहे.. सकाळी हा प्रकार उजेडात आल्यावर या परिसरात अण्णाभाऊ साठे यांचे अनुयायांची मोठी गर्दी केली आहे.. पोलीस व दंगा काबू पथक घटनास्थळी असून पोलीस परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.. खामगाव शहराच्या अगदी मुख्य मार्गावर रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच हा पुतळा बसविल्याने व घटनास्थळी पोलीस पोचल्याने या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.. सध्या घटनास्थळी दंगा काबू पथक व पोलीस तैनात असून जमावाशी पोलीस चर्चा करत आहेत..
-
जालन्यात गॅस एजन्सीचे गोडाऊन फोडले; ११० सिलेंडर लंपास करत चोरट्यांचा डल्ला
जालना जिल्ह्यातील उटवद शिवारात असलेल्या आनंद भारत गॅस एजन्सीच्या गोडाऊनवर चोरट्यांनी धाडसी दरोडा टाकत तब्बल ११० गॅस सिलिंडर लंपास केले आहेत. यामध्ये ९६ घरगुती सिलिंडर, १२ व्यावसायिक सिलिंडर आणि ५ किलोचे २ व्यावसायिक सिलिंडर अशा एकूण साडेचार लाख रुपयांच्या मुद्देमालाचा समावेश आहे. गॅस सिलिंडरच्या टंचाईच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणावर चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
-
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्ली दौऱ्यावर; भाजप श्रेष्ठींची भेट घेणार
महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. या दौऱ्यात शिंदे भाजपच्या केंद्रीय नेत्यांची भेट घेणार असून, सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या खटल्याचा आढावा घेणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, मागील काही निवडणुकांमध्ये मित्रपक्षाकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने शिवसेनेचे उमेदवार पराभूत झाल्याचा एक विशेष अहवाल शिंदेंनी तयार केला असून, तो भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसमोर ठेवला जाण्याची शक्यता आहे. या दौऱ्यामुळे महायुतीमधील अंतर्गत घडामोडींना वेग आला आहे.
-
आदिवासींचा उलगुलान एल्गार, हजारो कार्यकर्ते मंत्रालयावर धडकणार
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईत मंत्रालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. ‘आदिवासींचे आरक्षण बंजारा समाजाला देऊ नये’ आणि ‘पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेची ४० हजारांची मर्यादा रद्द करून ती ग्रामीण भागात सरसकट लागू करावी’, या प्रमुख मागण्यांसाठी हजारो आदिवासी बांधव रेल्वे आणि महामार्गाद्वारे मुंबईकडे कूच करणार आहेत. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांना घेराव घालण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे. मागण्या मान्य न झाल्यास मराठवाडा आणि मुंबईला जाणारे पाणी रोखण्याचा तसेच धरण फोडण्याचा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.
-
नागपूर विमानतळावर इंडिगोच्या विमानातून इंधन गळती; पायलटच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला
नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी इंडिगोच्या विमानातून इंधन गळती झाल्याची खळबळजनक घटना घडली. नागपूरहून गोव्याला जाण्यासाठी सज्ज असलेल्या ‘6E 6049’ या विमानाच्या ‘नोज व्हील’मधून अचानक इंधन गळू लागल्याचे तांत्रिक पथकाच्या लक्षात आले. सुदैवाने, विमान धावपट्टीवर असतानाच ही बाब निदर्शनास आल्याने तात्काळ उड्डाण थांबवून मोठी दुर्घटना टाळण्यात आली. सर्व प्रवासी सुरक्षित असून, तांत्रिक तपासणी आणि दुरुस्ती होईपर्यंत हे विमान नागपूर विमानतळावरच ‘ग्राऊंडेड’ करण्यात आले आहे.
-
नाशिकमध्ये गॅस सिलिंडरचा काळाबाजार, ५०० हून अधिक सिलिंडरसह ट्रक जप्त
नाशिकमधील त्र्यंबक रोडवरील नाईस संकुल परिसरात पुरवठा विभाग आणि सातपूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत गॅस सिलिंडरचा संशयास्पद साठा उघडकीस आणला आहे. या कारवाईत विनापरवाना ५०० पेक्षा अधिक HP घरगुती आणि कमर्शियल गॅस सिलिंडरने भरलेले दोन ट्रक आणि रिक्षा ताब्यात घेण्यात आली आहे. रस्त्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात सिलिंडरचा साठा असल्याने काळाबाजाराचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी ट्रकचालक आणि व्यवस्थापकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीतून गॅस वितरणातील मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
-
जालन्यात पुरवठा विभागाची मोठी कारवाई, भोकरदन आणि घनसावंगीत १५ घरगुती गॅस सिलेंडर जप्त
जालना जिल्ह्यातील भोकरदन आणि घनसावंगी शहरात पुरवठा विभागाने अवैध गॅस वापरांविरोधात धडक मोहीम राबवत एकूण २७ ठिकाणी धाडी टाकल्या. या कारवाईत हॉटेल, रेस्टॉरंट आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होत असल्याचे उघड झाले आहे. भोकरदनमधून ८ तर घनसावंगीमधून ७ असे एकूण १५ सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत संबंधित व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने आता कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.
-
फॉरेक्स ट्रेडिंगच्या आमिषाने नाशिकमध्ये मोठी फसवणूक
तब्बल २७ लाख २ हजार रुपयांना गंडा ‘सेबी’कडे नोंदणी असल्याचा बनाव करून विश्वास संपादन. बनावट लेटरहेड आणि स्टेटमेंटद्वारे गुंतवणूकदारांची फसवणूक. सरकारवाडा पोलिसांत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. रोहित आणि सिद्धार्थ जांभूळकर यांच्यावर आरोप. इतर गुंतवणूकदारांनाही लाखोंचा फटका बसल्याचा संशय
-
डॉ. मनीषा जेजुरकर प्रकरणात धक्कादायक खुलासे
मृतदेह सापडलेल्या ठिकाणी सिरींज आणि चाकू आढळल्याचा युक्तिवाद. संशयित डॉ. नीलेश जेजुरकर आणि महिला डॉक्टरच्या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी. पती मानसोपचारतज्ज्ञ असल्याने आत्महत्येस प्रवृत्त केलं, सरकारी पक्षाचा आरोप. दोघे घरात असताना आत्महत्या कशी? फिर्यादी पक्षाचा सवाल. तपास अपूर्ण असल्याने जामीन देऊ नये, सरकारी वकिलांची मागणी. बचाव पक्षाकडून आरोप फेटाळले, ही आत्महत्या असल्याचा दावा
-
हिसार ते तिरुपती रेल्वे आता रोज धावणार
नागपूरसह मध्य भारतातून तिरुपती बालाजी दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी आता रेल्वेची नियमित सेवा. हिसार ते तिरुपती रेल्वे आता रोज धावणार. हिसार ते तिरुपती रेल्वे नियमित केल्याने या निर्णयामुळे विदर्भातून तिरुपती जाणाऱ्या भाविकांना नियमित रेल्वे उपलब्ध असणार आहे
-
नागपूर महानगर पालिकेच्या महापौर, उप महापौर पदग्रहण सोहळ्यावर 16 लाखाचा खर्च
कोणत्याही प्रकाराची निविदा न काढता हा खर्च करण्यात आला.. आता स्थायी समितीची कार्योतर मंजुरी घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा काँग्रेस नगरसेवकांचा आरोप. कार्यक्रमासाठी स्टेज उभारणी, मंडप, पाणी, चहा, भोजन व्यवस्था यावर मोठ्या प्रमाणात खर्च.. फुल सजावटीसाठी अडीच लाख, माणसासाठी 2 लाख 57 हजार , रेड कार्पेटसाठी 51 हजार, एलइडी वॉलसाठी 32 हजार तर 1500 लोकांच्या भोजनासाठी 4 लाख 44 हजार खर्च दाखविण्यात आला आहे..
-
अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्याची मागणी
अनधिकृत शाळांची नेमकी माहिती नसल्याने दरवर्षी विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक होते. यंदा बहुतेक खासगी शाळची पूर्व प्राथमिक वर्गाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण. झाली तरी अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही मुंबई महानगरमधील अनधिकृत शाळांची यादी शैक्षणिक वर्ष सुरु होनापूर्वी आहीर करण्यात यावी, अशी मागणी पालक संघटनांकडून करण्यात येत आहे
-
ठाणे महापालिकेतील रखडलेल्या 1773 पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा
ठाणे महापालिकेतील रखडलेल्या 1773 पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढच्या महिन्यापासून भरती प्रक्रियेला सुरुवात होण्याची चिन्हे आहेत. सार्वत्रिक निवडणूक लागल्याने या भरती प्रक्रियेला ब्रेक लागला होता. तांत्रिक कारणामुळे तब्बल सहा महिन्यापासून रखडलेल्या ठाणे महानगरपालिकेतील 1773 पदांच्या भरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. ठाणे महापालिकेतील क आणि ड वर्गातील 1773 पदांसाठी ऑगस्ट 2025 रोजी जाहिरात काढण्यात आली होती. यामध्ये सर्वाधिक पदे ही आरोग्य विभाग आणि अग्निशमन विभागासाठी असून यामध्ये इतर पदांचा देखील समावेश आहे.
-
दिल्लीत आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपच्या केंद्रीय नेत्यांची भेट घेणार
दिल्लीत आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपच्या केंद्रीय नेत्यांची भेट घेणार आहेत. सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष चिन्ह याबाबत सुरू असलेल्या खटल्याचाही आढावा घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. काल केंद्रीय अधिवेशनात सहभागी होणाऱ्या शिवसेना खासदारांची शिंदेंनी बैठक घेत पक्षाची नेमकी भूमिका काय असणार याबाबत मार्गदर्शन केलं. मात्र मुंबईतील आर्थसंकल्पीय अधिवेशन सोडून शिंदे तातडीने दिल्लीला गेल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे.
यात प्रामुख्याने मागील ३ निवडणुकांमध्ये मित्र पक्षाकडून विविध ठिकाणी न मिळालेले सहकार्य, त्यामुळे पक्षाचे अनेक उमेदवार पराभूत झाले याचा अहवालही पक्षांतर्गत बनवण्यात आल्याची माहिती आहे. हा अहवाल शिंदेंकडून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे ठेवला जाऊ शकतो अशी पक्षांतर्गत चर्चा आहे.
-
जालना- गॅस एजन्सीच्या गोडाऊन मधून तब्बल 110 गॅस सिलेंडर चोरीला
जालन्यातील उटवद शिवारातील एका गॅस एजन्सीच्या गोडाऊन मधून तब्बल 110 गॅस सिलेंडर चोरीला गेले आहे. उटवद शिवारातील आनंद भारत गॅस एजन्सीच्या गोडाऊन मधून 96 घरगुती गॅस सिलेंडरसह 12 व्यावसायिक वापराचे गॅस सिलिंडर आणि दोन पाच किलोचे व्यावसायिक गॅस सिलेंडर चोरीला गेले आहेत.या प्रकरणी सिद्धार्थ आढाव यांच्या फिर्यादीवरून मौजपुरी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
मध्य रेल्वेवर फुकट्या प्रवाशांचे आव्हान
मध्य रेल्वेवरील विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी वारंवार तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात मध्य रेल्वेवरील ३८ लाख प्रकरणांमधून २२७ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदाच्या आर्थिक वर्षात विनातिकीट प्रवाशांची संख्या १० टक्क्यांनी वाढली आहे.
-
उन्हाळी सुट्ट्यांनिमित्त कोकण रेल्वेमार्गावर विशेष गाड्या
उन्हाळी सुट्ट्यांनिमित्त कोकण रेल्वेने मध्य रेल्वेशी समन्वय साधून मुंबई ते गोवा विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)-मडगाव साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी १६ एप्रिल ते ११ जून या कालावधीत, दर गुरुवारी रात्री १२.२० वाजता चालवली जाईल. त्याचप्रमाणे लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) मडगाव ही साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी १७ एप्रिल ते १२ जून या कालावधीत दर शुक्रवारी धावणार आहे. रात्री १२.५५ वाजता ही गाडी एलटीटीहून सुटेल.
-
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आमरस पुरीचा बेत महाग, हापूस आंब्याचे दर गगनाला
गुढीपाडवा सण जवळ येत असताना वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ बाजारात हापूस आंब्याची आवक सुरू झाली आहे. परंतु कोकणातील हापूस मर्यादित प्रमाणात येत असल्याने दर गगनाला भिडले आहेत. परिणामी, यंदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आमरस-पुरीचा बेत महागात पडण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, सोमवारी बाजारात एकूण १६,८४५ आंब्याच्या दाखल झाल्या. त्यात कोकणातील पेट्या ६,३२५ पेट्या, तर इतर राज्यांतील १०,५२० पेट्यांची नोंद झाली.
-
शिल्पा शेट्टीची डीपफेक छायाचित्रे हटविण्याचे आदेश
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा उद्योजक पती राज कुंद्रा यांना लक्ष्य करून तयार करण्यात आलेली एआय-निर्मित डीपफेक छायाचित्रे आणि चित्रफिती तात्काळ हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने जवळपास २८ संकेतस्थळांना दिले आहेत. त्यासाठी या संकेतस्थळांना आठवड्याची मुदत न्यायालयाने दिली आहे. या प्रकारामुळे शिल्पा हिच्या व्यक्तिमत्त्व हक्कांचे उल्लंघन झाले आहे, असे निरीक्षण न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या एकलपीठाने नोंदवले.
-
साखर निर्यातीसाठी अतिरिक्त कोटा मंजूर
केंद्र सरकारच्या अन्न मंत्रालयाने २०२५-२६ मध्ये (ऑक्टोबर ते सप्टेंबर) साखर निर्यातीसाठी अतिरिक्त ८७,५८७टनांचा कोटा मंजूर केला आहे. साखर कारखान्यांकडून आलेल्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला, असे मंत्रालयाने सोमवारी जाहीर केले. यापूर्वी सरकारने या हंगामासाठी १५ लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिली होती. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये इच्छुक साखर कारखान्यांना अदलाबदल न करता येणाऱ्या स्वरूपात अतिरिक्त पाच लाख टनांचा कोटा देण्यात आला होता. त्यासाठी फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत दिली होती.
-
सरलेल्या फेब्रुवारीमध्ये घाऊक महागाईचा भडका
सरलेल्या फेब्रुवारीमध्ये घाऊक महागाईचा भडका उडाला असून, ती ११ महिन्यांतील उच्चांकी पातळीवर पोहोचली. भाज्यांच्या किमतीत जरी या महिन्यांत घसरण झाली असली तरी खाद्य आणि बिगरखाद्य वस्तूंच्या किमतीत वाढ नोंदविण्यात आल्याचे सोमवारी जाहीर झालेल्या सरकारी मासिक आकडेवारीने स्पष्ट केले. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारीत घाऊक महागाई दर फेब्रुवारीत २.१३ टक्के नोंदविण्यात आला. या निर्देशांकात झालेली ही सलग चौथ्या महिन्यातील वाढ आहे. या आधी जानेवारीत तो १.८१ टक्के तर गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये २.४५ टक्के पातळीवर होता.
सरलेल्या फेब्रुवारीमध्ये घाऊक महागाईचा भडका उडाला असून, ती 11 महिन्यांतील उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. भाज्यांच्या किंमतीत जरी या महिन्यांत घसरण झाली असली तरी खाद्य आणि बिगरखाद्य वस्तूंच्या किमतीत वाढ नोंदविण्यात आल्याचं सोमवारी जाहीर झालेल्या सरकारी मासिक आकडेवारीने स्पष्ट केलं. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित घाऊक महागाई दर फेब्रुवारीत 2.13 टक्के नोंदविण्यात आला. या निर्देशांकात झालेली ही सलग चौथ्या महिन्यातील वाढ आहे. या आधी जानेवारीत तो 1.81 टक्के तर गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये 2.45 टक्के पातळीवर होता. तर दुसरीकडे मध्य रेल्वेवरील विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी वारंवार तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. 2025-26 या आर्थिक वर्षात मध्य रेल्वेवरील 38 लाख प्रकरणांमधून 227 कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदाच्या आर्थिक वर्षात विनातिकीट प्रवाशांची संख्या 10 टक्क्यांनी वाढली आहे. यासह महाराष्ट्र, देश विदेश, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक महत्वाच्या बातमीचे अपडेटस जाणून घेण्यासाठी दिवसभर टीव्ही9 मराठीचा हा ब्लॉग फॉलो करा.