Maharashtra News LIVE : सांगली – पेट्रोल डिझेल संपणार, या अफवेने पेट्रोल भरण्यासाठी झुंबड

Maharashtra News LIVE : नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरातचे आणखी काळे कारनामे उघड होत आहेत. तुर्की मधाच्या नावाखाली खरातकडून फसवणूक होत असल्याची माहिती समोर येत आहे. तुर्की मध कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक असल्याचा दावा करून अनेक उद्योजक आणि राजकीय नेत्यांना महागड्या दराने मधाची विक्री केल्याची माहिती समोर आली आहे.

Maharashtra News LIVE : सांगली - पेट्रोल डिझेल संपणार, या अफवेने पेट्रोल भरण्यासाठी झुंबड
tv9 marathi live blog
Image Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: Mar 29, 2026 | 3:34 PM

नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरातविरोधात तीन नवे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे खरावरील एकूण दाखल गुन्ह्यांची संख्या सहावर पोहोचली आहे. महिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. खराने विद्यार्थिनीलाही सोडलं नसून तिनेही अत्याचाराचे गंभीर आरोप केले आहेत. लग्न, धार्मिक विधी आणि तंत्रमंत्राच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप महिलांनी केला आहे. अमानुष लैंगिक अत्याचारासोबतच जमिनी खरेदी व्यवहारातही मोठी फसवणूक केल्याचा आरोप खरातवर आहे. पाथर्डी परिसरातील सुमारे 25 एकर जमीन व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात आहे. कोट्यवधी रुपयांची लूट झाल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे. फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांची जमीन परत देण्याची मागणी केली जात आहे. अशोक खरातची आज पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने कोर्टात हजर केलं जाणार आहे. चौकशीसाठी पुन्हा पोलीस कोठडी वाढवण्याची शक्यता आहे. या नव्या तक्रारींमुळे हे प्रकरण अधिक गंभीर बनलं आहे. यासह राज्यातील इतर घडामोडी, देश-विदेशातील अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या..

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 24 Mar 2026 08:37 PM (IST)

    सांगली – पेट्रोल डिझेल संपणार, या अफवेने पेट्रोल भरण्यासाठी झुंबड

    सांगली जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी पेट्रोल टंचाई निर्माण झाल्याच्या अफवेमुळे पेट्रोल पंपांवर इंधन भरण्यासाठी वाहनाधारकांची झुंबड उडाली आहे.आखाती देशातील युद्ध परिस्थिती मुळे पेट्रोल टंचाई निर्माण होणार ,अशा अफवांचे पिक पसरल्याने अनेक पेट्रोल पंपांवर आता पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे.

  • 24 Mar 2026 08:17 PM (IST)

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधानांमध्ये चर्चा – भाजप खासदार विवेक ठाकूर

    एक अतिशय सकारात्मक गोष्ट घडली आहे. पंतप्रधानांनी सभागृहात भारताची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे.आज जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधानांमध्ये चर्चा झाली, तेव्हा या संपूर्ण वातावरणात भारताचे महत्त्व काय आहे आणि त्याचे मत काय आहे, हे स्पष्ट झाले आहे असे भाजप खासदार विवेक ठाकूर यांनी सांगितले.

  • 24 Mar 2026 07:56 PM (IST)

    परळ टी टी पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू

    परळ टी टी पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असून, त्यासाठी पुलाची उत्तर मार्गिका वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे. पुलाची एक मार्गिका बंद करण्यात आल्याने दक्षिण मुंबईत सध्या मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

  • 24 Mar 2026 07:55 PM (IST)

    उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बोलावली राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक

    उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बोलावली राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक

    देवगिरीवर राष्ट्रवादी आमदारांची बैठक

    सुनेत्रा पवार या देवगिरी निवासस्थानी दाखल

    राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राहणार उपस्थित

    अनेक आमदार बैठकीच्या पार्श्वभूमीवर निवास्थानी दाखल होण्यास सुरुवात

  • 24 Mar 2026 07:46 PM (IST)

    बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड गावात दोन गटात तुफान राडा

    बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड गावात दोन गटात तुफान राडा झाला असल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली आहे. या राड्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, मात्र याप्रकरणात अद्याप दोन्ही गटाकडून तक्रार दाखल करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

  • 24 Mar 2026 07:11 PM (IST)

    जालना महापालिकेचा 463 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर

    जालना महापालिकेचा 463 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर

    मनपा आयुक्तांनी स्थायी समितीसमोर सादर केला 463 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प

    वाढीव 50 कोटीची तरतूद असल्याने पालिका प्रशासनाचा यंदाचा अर्थसंकल्प जाणार पाचशे कोटीच्या वर

    स्वच्छता, शिक्षण आणि आरोग्य यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद

  • 24 Mar 2026 06:55 PM (IST)

    जालना महानगरपालिकेत मनपा आयुक्तांनी सादर केला अर्थसंकल्प

    जालना महानगरपालिकेत मनपा आयुक्तांनी आज स्थायी समितीसमोर अर्थसंकल्प सादर केला. यावेळी बैठकीत अर्थसंकल्पावर सविस्तर चर्चा करण्यात आली. जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आज ही बैठक पार पडली. या बैठकीत स्थायी समिती सदस्य आणि मनपा आयुक्त यांच्यात आगामी अर्थसंकल्पाबाबत सविस्तर चर्चा झाली. मनपा आयुक्तांनी आगामी अर्थसंकल्पाचा आराखडा स्थायी समितीसमोर मांडला. यावेळी स्वच्छता, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्याबाबत स्थायी समिती सदस्यांनी मनपा आयुक्तांशी सविस्तर चर्चा केली.

  • 24 Mar 2026 06:45 PM (IST)

    कर्नाटकात अजितदादांच्या अपघाताचा FIR स्वीकारण्यात आला-रोहित पवार

    कर्नाटकात अजितदादांच्या अपघाताचा FIR स्वीकारण्यात आला.  रोहित पवारांनी एफआयआरची कॉपी विधानसभेत दाखवली.

  • 24 Mar 2026 06:30 PM (IST)

    जे पकडले गेले नाहीत त्या भोंदूबाबांच काय?- उद्धव ठाकरे

    जे पकडले गेले नाहीत त्या भोंदूबाबांच काय? बुवाशक्तीपेक्षा युवा शक्तीला ताकद दिली पाहिजे. बुवा चमत्कार करू शकत नाही पण युवा चमत्कार करु शकता असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

  • 24 Mar 2026 06:25 PM (IST)

    ‘सातारा ZPअध्यक्ष निवडीवेळी पोलिसांची धक्काबुक्की’- शंभुराज देसाई

    सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीवेळी पोलिसांनी मला रोखलं… पोलिसांच्या धक्काबुक्कीत मला इजा झाली… जिल्ह्यातील 100 पोलिसांवर कारवाई करा… मंत्री शंभुराज देसाईंचा पोलीस दलावर संताप…

  • 24 Mar 2026 06:15 PM (IST)

    भोंदू खरात प्रकरणात कुणालाही सोडणार नाही-फडणवीस

    भोंदू खरात प्रकरणात कुणालाही सोडणार नाही… जो ‘क्लीन’ आहे त्यालाच ‘चिट’ देणार… दोषींवर कठोर कारवाई होणार… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत इशारा

  • 24 Mar 2026 05:47 PM (IST)

    उद्धव ठाकरेंचा स्वभाव राजकारणी नाही : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    “उद्धव ठाकरेंचा स्वभाव राजकारणी नाही. ठाकरेंचा मुळ स्वभाव हा शांत आणि संयमी असा आहे. त्यांनी एखादा निर्णय घेताना परिणामांची चिंता केली नाही. मी पु ल देशपांडे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांना ‘कोट्या’धीश ही उपमा देतो”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्यासह विधानपरिषदेतील एकूण 9 सदस्य निवृत्त होत आहे. यानिमित्ताने बोलताना फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली.

  • 24 Mar 2026 05:31 PM (IST)

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरे यांचा साहेब असा उल्लेख

    विधानपरिषदेतून 9 सदस्य निवृत्त होत आहेत. या 9 सदस्यांच्या निरोपाच्या भाषणावर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी उद्धव ठाकरे यांचा साहेब असा उल्लेख केला आहे. तसेच शिंदेंनी उद्धव ठाकरे यांना त्यांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.

  • 24 Mar 2026 05:11 PM (IST)

    राष्ट्रवादीचे नेते शरद पवार दत्ता मेघे यांच्या निवासस्थानी

    राष्ट्रवादीचे नेते शरद पवार दत्ता मेघे यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत. शरद पवार हे गाडीतून उतरल्यानंतर व्हीलचेअर वर बसून आत गेले. शरद पवार हे दत्ता मेघे यांचं निधन झाल्याने त्यांच्या परिवाराची सांत्वनपर भेट घेण्यासाठी गेले आहेत.

  • 24 Mar 2026 05:09 PM (IST)

    अशोक खरात याला मदत करणाऱ्या सर्वांची चौकशी करण्यात येईल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    “अशोक खरात याला मदत करणाऱ्या सर्वांची चौकशी करण्यात येईल. अशोक खरात विरुद्ध 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 5 पीडित महिल्यांच्या जबाबावरुन 5 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत”, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

  • 24 Mar 2026 04:54 PM (IST)

    भोंदू बाबा अशोक खरात देश सोडून पळून जाण्याची शक्यता होती- फडणवीस

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, भोंदू बाबा अशोक खरातच्या काळ्या कृत्याचा उलगडा झाला होता. हा भोंदू बाबा पळून जाण्याची शक्यता होती. त्यामुळे हे प्रकरण काळजीपूर्वक हाताळण्यात आले. पीडित महिलांना सुरक्षेची हमी देण्यात आली आहे. आतापर्यंत सहा गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

  • 24 Mar 2026 04:44 PM (IST)

    भोंदू बाबा अशोक खरातबाबत बच्चू कडू म्हणाले की…

    बच्चू कडू म्हणाले की,  भोंदू बाबाचा आम्ही निषेध करतो आम्हाला कार्यकर्त्यांनी महादेवाच्या मंदिरात नेलं, त्या ठिकाणी ते भोंदू बाबा होते, त्यांनी त्या ठिकाणी माझा सत्कार केला, ते माझ्यापेक्षा मोठी असल्याने संस्कृती प्रमाणे मी त्यांच्या पाया पडलो. आम्हाला माहित असते की हा महाराज कामाचा नाही पण समाज मन जपण्यासाठी आम्ही जातो, मात्र आम्ही त्याचा निषेध करतो

  • 24 Mar 2026 04:33 PM (IST)

    आमच्याकडे पुरेसा गॅस आणि डिझेल-पेट्रोल- सरकार

    इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅसच्या तुटवड्याबाबत सरकारचे म्हणणे आहे की, “अफवांकडे लक्ष देऊ नका. आमच्याकडे पुरेसा गॅस, डिझेल आणि पेट्रोल आहे. आम्ही लोकांना पीएनजी कनेक्शन घेण्याचे आवाहन केले आहे.”

  • 24 Mar 2026 04:20 PM (IST)

    अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

    भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. अशोक खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानुसार आता पोलीस 29 मार्चपर्यंत अशोक खरातची चौकशी करतील.

  • 24 Mar 2026 04:10 PM (IST)

    एसआयआरवर सर्वोच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी

    सर्वोच्च न्यायालयाने एसआयआर संदर्भात महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. सरन्यायाधीशांनी म्हटले आहे की, पश्चिम बंगाल वगळता इतर सर्व राज्यांमध्ये एसआयआरची अंमलबजावणी सुरळीत झाली आहे. इतर राज्यांमध्ये एसआयआर संदर्भात फारसे खटले दाखल झालेले नाहीत. सरकारी वकिलांचा असा युक्तिवाद आहे की, केवळ पश्चिम बंगालमध्येच एसआयआरची अंमलबजावणी होण्यात तार्किक विसंगती आहे.

  • 24 Mar 2026 04:08 PM (IST)

    तृप्ती देसाई नाशिक पोलिसांकडून ताब्यात

    नाशिक जिल्हा न्यायालयाच्या बाहेरुन पोलिसांनी तृप्ती देसाई यांना ताब्यात घेतलं आहे. तृप्ती देसाई भोंदू कॅप्टन खरात याचा निषेध करण्यासाठी आल्या होत्या. तेव्हा त्यांना ताब्यात घेतलं.

  • 24 Mar 2026 04:00 PM (IST)

    मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात दाखल होणार

    थोड्या वेळात मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात दाखल होणार आहे. धनगर आरक्षणसाठी उपोषणाला बसलेल्या दिपक बोऱ्हाडे यांना देणार पाठिंबा. आज उपोषणाचा ९ वा दिवस असून जरांगे पाटील देणार भेट.

  • 24 Mar 2026 03:45 PM (IST)

    अभिनेता अजिंक्य देव विधान भवनात

    मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते अजिंक्य देव हे आज विधान भवानत दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. विधान भवनात गेल्यानंतर त्यांनी कधी कधी देवाचं दर्शन घ्यायला यावं लागतं अशी दिली प्रतिक्रिया दिली आहे.

  • 24 Mar 2026 03:30 PM (IST)

    डोंबिवलीत परप्रांतीय कामगाराची अरेरावी

    डोंबिवलीमध्ये परप्रांतीय कामगाराने अरेरावी केल्याची घटना समोर आली आहे. “मे मराठी नही सीकुंगा, हमारे बिहार मे काम कमी नही हें तुम लोग बुलाते हो हमे” असे म्हणत परप्रांतीय कामगाराची अरेरावी पाहायला मिळाली.

  • 24 Mar 2026 03:15 PM (IST)

    कृष्णा आंधळेची माहिती देणाऱ्यास मिळणार एक लाखाचे बक्षीस

    बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे गेल्या 14 महिन्यांपासून फरार आहे. याच विषयावर सीआयडी कडे न्यायालयाने देखील विचारणा केली होती. त्यानंतर आता सीआयडी कडून कृष्णा आंधळेवर एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

  • 24 Mar 2026 02:54 PM (IST)

    नांदेड : गॅस मिळत नसल्याने ग्राहक नाराज, सिलेंडर आदळून व्यक्त केला निषेध

    सध्या घरगुती सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने नांदेड जिल्ह्यात गॅस एजन्सी समोर ग्राहकांच्या रांगा बघायला मिळत आहेत. हतबलं झालेल्या एका ग्राहकाने गॅसच रिकामं सिलेंडर फेकून संताप केला आहे. नांदेडच्या धर्माबाद शहारातील ही घटना असल्याची माहिती समोर आलं आहे.

  • 24 Mar 2026 02:40 PM (IST)

    डोंबिवली : मुलीच्या लग्नातील दोष काढण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने लुटले

    डोंबिवलीत अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलीच्या लग्नातील कथित ‘दोष’ उतरवण्याच्या बहाण्याने एका भोंदू बाबाने वयोवृद्ध व्यक्तीला लुबाडल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी विष्णू नगर पोलिसांनी दीपक सावंत नावाच्या आरोपीला कल्याण येथून अटक केली आहे.

  • 24 Mar 2026 02:25 PM (IST)

    लातूर : तोतया पोलिस अधिकाऱ्याला अटक

    लातूरसह परभणी आणि नांदेड जिल्ह्यात पोलिस अधिकारी असल्याची बतावणी करून लोकांची फसवणूक करणाऱ्या एकाला लातूर पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या तोतया अधिकाऱ्याकडून 4 लाख 30 हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. विजय कदम असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

  • 24 Mar 2026 02:09 PM (IST)

    इराणमधून 1000 भारतीय मायदेशी परतले – PM मोदी

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत बोलताना सांगितले की, ‘इराणमधून 1000 पेक्षा जास्त लोक मायदेशी परतले, यातील 700 पेक्षा जास्त अधिक विद्यार्थी आहे. भारतीयांच्या सुरक्षेसाठी आम्ही सर्व आखाती देशांच्या संपर्कात आहोत. तसेच होर्मुझमधून भारतीय जहाजे सुरक्षितपणे यावीत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे.’

  • 24 Mar 2026 02:00 PM (IST)

    भाजप प्रदेशाध्यक्ष रविॅद्र चव्हीण दोन दिवस मॉरिशस दौऱ्यावर

    प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मोका येथे महाराष्ट्र भवनाच्या विस्तारित वास्तूचा पायाभरणी सोहळा संपन्न झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र भवनाच्या विस्तारासाठी ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. महाराष्ट्र आणि मॉरिशस यांच्यातील मैत्रीचे नाते पिढ्यानपिढ्यांचे असून सातासमुद्रापार राहूनही मराठी समाजाने आपली सांस्कृतिक ओळख अभिमानाने जपल्याची रविंद्र चव्हीण यांनी भावना व्यक्त केली. रविंद्र चव्हाण यांनी मॉरिशसचे राष्ट्राध्यक्ष धरमबीर गोखुल यांची घेतली सदिच्छा भेट, भेटीत भारत-मॉरिशस संबंध, पर्यटन, ब्ल्यू इकॉनॉमी, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर सुरक्षा यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली.

  • 24 Mar 2026 01:50 PM (IST)

    महिलांची ओळख समोर यायला नको

    नाशिकमध्ये जो प्रकार घडला तो अत्यंत गंभीर आहे महिलांची ओळख समोर यायला नको पोलिसांनी लक्ष ठेवायला पाहिजे. विखे पाटील आणि फडणवीस यांचे मनपासून आभार की या भेंदूवर त्यांनी कारवाई केली अन्यथा कधीच हे प्रकरण बाहेर आलं नसतं. यात महिला, मुली यांच्यावरही अत्याचार झालाय, त्यामुळे या प्रकरणाचं गांभिर्य जास्त आहे. मला एवढंच सांगायचं आहे की ज्यांचे संबंध त्या खरात सोबत असतील त्याच्यांवर कारवाई करा . या प्रकरणी राजकारण करू नये , विरोधी पक्षातील लोकांचेही संबंध आहेत, अशी प्रतिक्रिया देवयानी फरांदे यांनी दिली.

  • 24 Mar 2026 01:40 PM (IST)

    आरेवाडीच्या बिरोबा यात्रेस उत्साहात प्रारंभ

    सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडीच्या बिरोबा यात्रेला सुरुवात झाली आहे.महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि धनगर समाजाचे आराध्य दैवत म्हणून बिरोबा देवस्थानची ओळख आहे.आरेवाडी बनाच्या परिसरात यात्रेनिमित्ताने यात्रा कमिटी व प्रशासनाकडून या ठिकाणी येणाऱ्या भाविकांच्या दृष्टीने पूर्ण तयारी करण्यात आली आहे.बिरोबाच्या नावानं चांगभलंच्या गजरात यात्रेच्या पहिल्या दिवशी धार्मिक विधीचा कार्यक्रम पार पडला, पुढील पाच दिवस,या ठिकाणी यात्रा पार पडणार असून यात्री निमित्ताने सुमारे दोन हजारांवर वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लागली आहेत.

  • 24 Mar 2026 01:30 PM (IST)

    पेट्रोल पंप दुसर्‍या दिवशी देखील बंद

    जळगावच्या मोहाडी रोड परिसरातील भारत पेट्रोलियमचा पेट्रोल पंप दुसर्‍या दिवशी देखील बंद आहे. पेट्रोल डिझेलचा साठा संपल्यामुळे काल सायंकाळापासून पेट्रोल पंप बंद आहे. वेगवेगळ्या अफवांमुळे पेट्रोल डिझेल भरण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने पेट्रोल डिझेलचा साठा संपला. कंपनीकडून पेट्रोल डिझेलचे टँकर येण्यास विलंब झाल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी देखील पेट्रोल पंप बंद होता. पेट्रोल डिझेल भरण्यासाठी येणारा नागरिकांना रिकाम्या हाताने परतण्याची वेळ आली आहे.

  • 24 Mar 2026 01:20 PM (IST)

    मला आणि माझ्या नातेवाईकांना फोन येत आहेत, ही केस कशाने थांबेल यासाठी प्रयत्न केला जातोय- धनंजय देशमुख

    बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणाची बीडमध्ये आज सुनावणी पार पडली. यानंतर मिडीयाशी बोलताना स्व.संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मोठा दावा केलाय, मला आणि माझ्या नातेवाईकांना वेगवेगळ्या नंबर वरून फोन येत आहेत हि केस कशी थांबेल यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र आम्ही त्यामध्ये पडत नाहीत. पोलीस अधीक्षकांना या संदर्भातील रितसर लेखी तक्रार केलेली आहे. आज पोलीस अधीक्षक असतील तर त्यांना भेटणार आहे. या संदर्भात कारवाई होईल अशी अपेक्षा देखील धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

  • 24 Mar 2026 01:10 PM (IST)

    गोंदियात जंगली हत्तींचा धुमाकूळ

    गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्रातील वडेगाव-बंध्या परिसरात जंगली हत्तींच्या कळपाने पुन्हा धुमाकूळ घातला आहे. मागील सहा दिवसांपासून हत्तींच्या हालचाली सुरू असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. 11 मार्चपासून या भागात सक्रिय असलेल्या हत्तींच्या कळपामुळे मका व मिरची पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आतापर्यंत 42 शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत, तर सध्या सुरू असलेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. एकूण नुकसान सुमारे 15 ते 20 लाख रुपयांपर्यंत पोहोचल्याचा अंदाज आहे. वन विभागाकडून थर्मल ड्रोनच्या मदतीने हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत असून, विशेष गस्तीचेही आयोजन करण्यात आले आहे. मनुष्यहानी टाळण्यासाठी नागरिकांनी रात्रीच्या वेळी एकटे जंगलात किंवा शेतात जाऊ नये, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

  • 24 Mar 2026 01:00 PM (IST)

    पालकमंत्र्यांना केलेली धक्काबुक्की अयोग्य-संजय शिरसाट

    सातारा प्रकरणात मुख्यमंत्री यांचं उत्तर अपेक्षित आहे, पण तिथे पोलिसांनी जी धक्काबुक्की पालक मंत्र्यांना केली ती अयोग्य होती. यासाठीच आम्ही भांडलो , यात काही गैर नाही. निलम गोऱ्हे यांनी जो निर्णय घेतला तो त्यांच्या अधिकार क्षेत्रातील आहे. संजय राऊत काय म्हणतात याला अर्थ नाही, आम्ही आमची भावना व्यक्त केली, त्यांनी काहीही बोलू देत पण आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत. भोंदू बाबा खरातचं प्रकरण गंभीर आहे, सगळ्यांची चौकशी व्हायला पाहिजे. महिलांचे फोटो ब्लर करा, त्यांच्या कुटुंबीयांना याचा त्रास होऊ नये ही काळजी घ्या, असे आवाहन मंत्री संजय शिरसाट यांनी केले.

  • 24 Mar 2026 12:55 PM (IST)

    भोंदूबाबा अशोक खरात महिला लैंगिक अत्याचार प्रकरणात ज्येष्ठ विधीज्ञ अजय मिसर यांची नियुक्ती

    भोंदूबाबा अशोक खरात महिला लैंगिक अत्याचार प्रकरणात ज्येष्ठ विधीज्ञ अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  अजय मिसर यांनी २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट, २०११ मधील दादर ऑपेरा हाऊस बॉम्बस्फोट, रवी पुजारी खटला, नाशिक धान्य घोटाळा यासह अनेक महत्वाच्या खटल्यांमध्ये सरकारी वकील म्हणून  महत्त्वाची भूमिका बजावलीय.

  • 24 Mar 2026 12:40 PM (IST)

    आखाती देशांच्या युद्धाचे पडसाद थेट वाशिम जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रावर

    आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता थेट वाशिम जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रावर उमटताना दिसत आहेत. गॅस टंचाईमुळे गुजरातमधील टाईल्स उद्योग ठप्प झाल्याने टाईल्सचा पुरवठा मोठ्या प्रमाणात घटला आहे. यामुळे जिल्ह्यात टाईल्सच्या दरात प्रति ब्रास ५०० ते ६०० रुपयांची वाढ झाली असून, ग्रॅनाइटच्या दरातही प्रति स्क्वेअर फूट १० रुपयांनी वाढ झाली आहे. दरवाढीमुळे बांधकामाचा खर्च वाढला असून नागरिकांसह व्यापाऱ्यांनाही मोठा आर्थिक फटका बसत आहे..

  • 24 Mar 2026 12:30 PM (IST)

    इगतपुरी तालुक्यात पुन्हा अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची घटना

    इगतपुरी तालुक्यात पुन्हा अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची घटना घडली आहे. फांगुळगव्हाण गावातील 14 वर्ष 9 महिन्यांची मुलगी बेपत्ता झाली आहे. अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.  23 मार्च रोजी घटना उघडकीस आली.  कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र काहीच पत्ता लागला नाही, अखेर पालकांची इगतपुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तालुक्यात अशा घटनांमध्ये वाढ होत असल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

  • 24 Mar 2026 12:20 PM (IST)

    काहींना बुकिंगची अडचण तर काही नागरिकांना बुकिंग होऊनही सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी

    जालना जिल्ह्यातल्या बदनापूर शहरातील भारत गॅसच्या एजन्सीवर घरगुती गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिक सकाळपासूनच दाखल झाले असून लांब रांगा असल्याचही दिसून आलंय. ग्रामीण भागातील मिनी गॅस एजन्सीवर सिलेंडर मिळत नसल्याने थेट तालुक्याच्या ठिकाणी धाव घेऊन नागरिकांना गॅस एजन्सी गाठावी लागत आहे. मात्र काही नागरिकांची तांत्रिक अडचणीमुळे बुकिंग होत नाही तर ज्यांची बुकिंग झाली त्यांना देखील घरगुती सिलेंडर मिळत नसल्याचं नागरिकांचा म्हणणं आहे, त्यामुळे अजूनही घरगुती गॅस सिलेंडर मिळण्यासाठी नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून मोठा त्रास सहन करावा लागत आहे, बदनापूर शहरासह ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने नागरिक एजन्सीवर रांगा लावून तासंतास खडाक्याच्या उन्हातही उभा राहत आहे.

  • 24 Mar 2026 12:08 PM (IST)

    दीपक केसरकर यांच्या विरोधात सावंतवाडीत मोर्चा

    अशोक खरात याच्याशी संबंधित असल्याने आणि दीपक केसरकर यांनीच अनेक राजकीय नेत्यांचे संबंध अशोक खरातची जुळवन आणल्याने दीपक केसरकर यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा… त्यांची एसआयटी चौकशी करावी… या मागणीसाठी आज सावंतवाडीत मोर्चा काढण्यात आला. ठाकरे शिवसेनेने हा मोर्चा काढलेला.

  • 24 Mar 2026 11:54 AM (IST)

    मुंबईतील 177 कोटींच्या टोरेस प्रकरणात मोठी मुख्य आरोपी ओलेना स्टोयानला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा

    मुंबईतील 177 कोटींच्या टोरेस प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. मुख्य आरोपी ओलेना स्टोयानला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.मुंबई विशेष न्यायलया हा महत्वाचा निर्णय दिला. ईडीने केलेल्या अर्जाला न्यायालयाने मंजुरी दिली आहे. टोरेस प्रकरणात काही आरोपी परदेशात फरार झाले होते.

  • 24 Mar 2026 11:39 AM (IST)

    बदनापूर शहरातील भारत गॅस एजन्सी वर नागरिकांच्या रांगा

    बदनापूर शहरातील भारत गॅस एजन्सी वर नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत.  घरघुती गॅस सिलेंडर घेण्यासाठी सकाळपासूनच नागरिक दाखल झाले आहेत.  काहींना बुकिंगची अडचण येत्ये तर काही नागरिकांनी बुकिंग होऊनही सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार केली आहे.

    ग्रामीण भागातल्या मिनी गॅस एजन्सीवर सिलेंडर मिळत नसल्याने नागरिक तालुक्याच्या गॅस एजन्सीवर धाव घेत आहेत.

  • 24 Mar 2026 11:19 AM (IST)

    खरातसारख्या विकृत मनोवृत्तीच्या माणसावर कठोर कारवाई व्हावी – तटकरे

    मुख्यमंत्री फडणवीस आज खरात प्रकरणावर निवदेन करणार आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा. खरातसारख्या विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तीवर कठोर कारवाई व्हावी हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे – सुनिल तटकरे

  • 24 Mar 2026 11:15 AM (IST)

    इगतपुरी तालुक्यात पुन्हा अल्पवयीन मुलीचं अपहरण

    इगतपुरी तालुक्यात पुन्हा अल्पवयीन मुलीचं अपहरण झालंय.  फांगुळगव्हाण गावातील 14 वर्ष 9 महिन्यांची मुलगी बेपत्ता झाली आहे.  अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याचा संशय आहे. 23 मार्चला ही घटना उघडकीस आली, तिच्या कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र तिचा काहीच पत्ता लागला नाही.  अखेर पालकांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली अखेर अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 24 Mar 2026 11:06 AM (IST)

    6 एप्रिल रोजी सुनेत्रा पवार पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरतील – सुनील तटकरे

    बारामतीची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न. 6 एप्रिल रोजी सुनेत्रा पवार पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरतील – सुनील तटकरे

  • 24 Mar 2026 10:53 AM (IST)

    बीडमध्ये चोरट्यांचा हैदोस; पिंपळनेरमध्ये बिअर बार फोडून ७० हजारांचा मुद्देमाल लंपास

    बीडच्या पिंपळनेर परिसरात चोरट्यांनी उच्छाद मांडला असून, रात्रीच्या सुमारास एका बिअर बारवर डल्ला मारला आहे. चोरट्यांनी बारमधून १० हजार रुपयांची रोकड आणि ६० हजार रुपये किमतीचे विदेशी दारूचे बॉक्स असा एकूण ७० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. धक्कादायक म्हणजे, चोरी केल्यानंतर चोरट्यांनी बारच्या बाजूलाच बसून १० बाटल्या दारू प्यायली. पुराव्यासाठी सीसीटीव्हीचा डीव्हीआर आणि केबल नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरी चोरटे गावातील दुसऱ्या एका कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. सध्या पिंपळनेर परिसरात भीतीचे वातावरण असून पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

  • 24 Mar 2026 10:45 AM (IST)

    आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीचा कांद्याला फटका; निर्यात ठप्प झाल्याने भावात मोठी घसरण

    सौदी अरेबिया, दुबई, मलेशिया आणि थायलंड यांसारख्या देशांमध्ये भारतीय कांद्याला मोठी मागणी असते, मात्र सध्या अमेरिका, इराक आणि इराण दरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक जलवाहतूक विस्कळीत झाली आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील जहाजांची वाहतूक बंद असल्याने नाशिक, पुणे आणि गुजरातचा कांदा बंदरांवरच पडून आहे. निर्यातदारांनी जहाज मालकांना दुप्पट भाडे देऊ करूनही कोणीही माल नेण्यास तयार नसल्याने निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. याचा थेट फटका स्थानिक बाजारपेठांना बसला असून धुळ्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर ७०० ते ११०० रुपये क्विंटलपर्यंत खाली घसरले आहेत.

  • 24 Mar 2026 10:29 AM (IST)

    जालन्यात एलपीजी गॅसचा साठा संपला; रिक्षाचालक संकटात, विद्यार्थी वाहतुकीवर परिणाम

    जालना शहरात एलपीजी ऑटो गॅसचा साठा पूर्णपणे संपल्याने रिक्षाचालकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. शहरातील 3500 रिक्षाचालक एलपीजी गॅसवर अवलंबून असून, गॅस उपलब्ध नसल्याने अनेक रिक्षा जागेवरच उभ्या आहेत. गॅस उपलब्ध होण्यासाठी अजून दोन ते तीन दिवस लागण्याची शक्यता व्यवस्थापनाकडून वर्तवण्यात आली आहे. या तुटवड्यामुळे आणि वाढलेल्या दरांमुळे रिक्षा व्यवसाय पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. याचा सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीला आणि दैनंदिन प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे. हातावर पोट असलेल्या रिक्षाचालकांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. शहराची वाहतूक व्यवस्था मंदावली आहे.

  • 24 Mar 2026 10:17 AM (IST)

    भोंदूबाबा खरात प्रकरणी पत्रकार दत्ता खेमनर पुरावे सादर करणार, SIT कडून नाशिकमध्ये चौकशी

    भोंदूबाबा खरात याच्या काळ्या कारनाम्यांचा पर्दाफाश करणारे श्रीरामपूरचे पत्रकार दत्ता खेमनर आता या प्रकरणाचे महत्त्वाचे पुरावे सादर करणार आहेत. साधारण एक वर्षापूर्वी खेमनर यांनी बातमीच्या माध्यमातून या भोंदूबाबाचा पर्दाफाश केला होता, ज्याची दखल घेत आता विशेष तपास पथकाकडून (SIT) त्यांची चौकशी केली जाणार आहे. या चौकशी प्रक्रियेसाठी खेमनर नाशिककडे रवाना झाले आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून अहिल्यानगर पोलीस अधीक्षकांनी त्यांना तातडीने पोलीस संरक्षण पुरवले आहे. या सुरक्षिततेबद्दल खेमनर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. या पुराव्यांमुळे आता खरात प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • 24 Mar 2026 10:05 AM (IST)

    सोलापुरात रिक्षाचालकांचे हाल; ऑटो एलपीजी गॅससाठी किलोमीटरभर लांब रांगा

    सोलापूर शहरात सध्या ऑटो एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे केवळ एकच गॅस पंप सुरू असल्याने रिक्षाचालकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. पेट्रोल पंपापासून तब्बल एक किलोमीटरपर्यंत रिक्षांच्या रांगा पाहायला मिळत आहे. या टंचाईमुळे गॅसच्या दरातही ३० ते ३५ रुपयांनी वाढ झाली आहे. दरवाढ होऊनही ग्राहक वाढीव भाडे देण्यास तयार नसल्याने रिक्षा व्यवसाय करणे आता परवडत नसल्याची भावना चालक व्यक्त करत आहेत.

  • 24 Mar 2026 09:50 AM (IST)

    संतोष देशमुख खून प्रकरणाची बीडच्या विशेष मकोका न्यायालयात आज होणार सुनावणी

    यापुर्वीच्या सुनावणीत आरोपींना व्हिडिओ पुराव्यांची कॉपी देण्याचे सरकारी पक्षाला कोर्टाने दिले होते आदेश. चार्ज फ्रेम झाल्यापासून खुन, खंडणी आणि ॲट्रॉसिटी या मुळ प्रकरणाच्या युक्तिवादाला अद्याप सुरूवात झालेली नाही. यासंदर्भातील युक्तिवादाला आज सुरूवात होण्याची शक्यता. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना बदलण्यासाठी आरोपींनी कोर्टाकडे केलेल्या अर्जावर निर्णय येण्याची शक्यता.

  • 24 Mar 2026 09:40 AM (IST)

    नालेसफाईसाठी स्मार्ट उपाय ,यंदा रोबोटिक यंत्रणा ठाणे महापालिका वापरणार

    पावसाळ्यात नाले तुंबून उद्भवणाऱ्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ठाणे पालिकेने यंदा तंत्रज्ञानाचा आधार घेत मोठे पाऊल उचललेले आहे. ठाण्यात सुमारे तीनशे किलोमीटर लांबीचे नाले असून विविध भागातून वाहत हे नाले खाडीत मिळतात…

  • 24 Mar 2026 09:30 AM (IST)

    ठाण्याच्या ताफ्यात आता नव्या 100 भगव्या बस येणार…

    ठाणे परिवहन सेवेचा 2026,27 चा आर्थिक वार्षिक 791 कोटी 86 लाख रुपयांचा अर्थसंकल्प महासभेत सादर करण्यात आला परिवहन व्यवस्थापन भालचंद्र बेहेरे यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात प्रवाशांना दिलासा देणारा निर्णय घेत कोणतेही तिकीट दरवाढ प्रस्तावित केली नाही. येत्या काळा टप्प्याटप्प्यात पीएम बस योजनेअंतर्गत शंभर बस परिवहनच्या ताब्यात दाखल होणार आहेत. यासाठी केंद्र सरकारकडून निधी प्राप्त झाला आहे .या बसचा रंग भगवा असणार असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे…

  • 24 Mar 2026 09:20 AM (IST)

    आज दुसऱ्या दिवशी ही पेट्रोल मिळणार नसल्याच्या अफवेमुळेने चंद्रपूर शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर लोकांच्या रांगा…

    सकाळ पासूनच नागरिक पेट्रोल पंपवर पेट्रोल भरण्यासाठी मोठी गर्दी करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल ही संपले, चंद्रपूर शहरातील पेट्रोल पंप पुढील चार दिवस बंद असणार असल्याच्या उडल्या आहे अफवा, यामुळे लोकांमध्ये पसरलं आहे घबराटीचे वातावरण, त्यामुळे जास्तीत जास्त लोकं पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंप वर करतायेत गर्दी, तर दुसरीकडे पेट्रोल पंप संचालकांनी चार दिवस पेट्रोल पंप बंद असल्याच्या अफवांमुळे हा सर्व प्रकार घडत असल्याची आणि शहरात कुठल्याही प्रकारच्या पेट्रोलची टंचाई नसल्याची दिली माहिती,

  • 24 Mar 2026 09:05 AM (IST)

    सनदी अधिकाऱ्याच्या कुटुंबियासोबत खरातची प्रॉपर्टी आली समोर

    नाशिकमध्ये काही वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यात होता अधिकारी. सध्या मुंबईत वरिष्ठ पदावर कार्यरत.  सनदी अधिकाऱ्याच्या पत्नीचा खरात कुटुंबा सोबत सातबारा. नाशिकच्या पाथर्डी शिवारात मोक्याच्या ठिकाणी 40 गुंठे जागेचा सातबारा आला समोर. भोंदू बाबा अशोक खरात आणि अधिकाऱ्यांचे लागेबांध उघड

  • 24 Mar 2026 08:57 AM (IST)

    डोंबिवलीत ‘त्रिनामी’ नराधमाचा धक्कादायक कारनामा उघड

    डोंबिवलीत ‘त्रिनामी’ नराधमाचा धक्कादायक कारनामा उघड झाला आहे. नोकरीच्या आमिषाने दाखवून आधी महिलेवर बलात्कार केला. नंतर कंत्राटाचं आमिष दाखवत पतीलाही १० लाखांचा चुना लावला. रहीम पद्मसी उर्फ करीम मोहम्मद जैन उर्फ करण जोशी असं या आरोपीचं नाव आहे. शहरात तीन नावांनी वावरणारा हा आरोपी महिलांना व्याजावर पैसे देत व्याजाच्या नावाखाली महिलांचं शोषण करत असल्याचा भयंकर गुन्हा उघड झाला आहे. रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करताच आरोपी फरार झाला होता. कल्याण न्यायालयात आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला असता न्यायालयाने जामिन अर्ज फेटाळला आहे.

  • 24 Mar 2026 08:46 AM (IST)

    शिरपूर तालुक्यातील सांगवी इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील गंभीर हलगर्जीपणाचा प्रकार समोर

    धुळ्यातील शिरपूर तालुक्यातील सांगवी इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील गंभीर हलगर्जीपणाचा प्रकार समोर आला आहे. सांगली इथल्या आरोग्य विभागाच्या दवाखान्यात डॉक्टर उपलब्ध नसल्याने गरोदर महिलेला उपचाराविना परतावं लागलं आहे. पूनम राहुल गायकवाड या गरोदर महिलेला प्रसूतीसाठी सायंकाळच्या सुमारास सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणलं होतं. मात्र त्या वेळी आरोग्य केंद्रात फक्त एक नर्स होती. प्रमुख वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने महिलेला उपचाराविना शिरपूरकडे पाठवण्यात आलं. आरोग्य केंद्रात १०८ रुग्णवाहिका उपलब्ध असतानाही “डिझेल नाही” असं कारण सांगितले जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.

  • 24 Mar 2026 08:36 AM (IST)

    धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच

    धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. धाराशिव जिल्हा परिषदेच्या सभापती पदाची निवड 27 मार्च रोजी होणार असून त्याआधीच माहितीतील तिन्ही पक्षाकडून मोर्चे बांधणी सुरू आहे. सभापतीपदासाठी शिवसेना, भाजप आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. विशेष म्हणजे, अध्यक्षपद न मिळाल्यामुळे शिवसेनेला महत्त्वाची सभापती पदे मिळावीत, अशी भूमिका सावंत गटाची आहे. दरम्यान, चर्चेत असलेल्या फॉर्म्युल्यानुसार भाजपकडे दोन सभापती पदे, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक पद मिळण्याची शक्यता आहे. या घडामोडींमुळे धाराशिव जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा सत्तासंघर्ष पेटला असून, 27 मार्चची निवडणूक निर्णायक ठरणार आहे.

     

  • 24 Mar 2026 08:24 AM (IST)

    तुर्की मधाच्या नावाखाली भोंदूबाबा खरातकडून फसवणूक; 1 किलो मधाची बाटली तब्बल 9 लाखांना

    नाशिक – भोंदूबाबा अशोक खरातचे आणखी काळे कारनामे उघड होत आहेत. तुर्की मधाच्या नावाखाली खरातकडून फसवणूक होत असल्याची माहिती समोर आली आहे. तुर्की मध कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक असल्याचा दावा करून अनेक उद्योजक आणि राजकीय नेत्यांना महागड्या दराने मधाची विक्री केल्याचं समजतंय. १ किलो मधाची बाटली ९ लाख रुपयांना विकली जायची. लैंगिक अडचणी घेऊन येणाऱ्यांना मधाची विक्री केली जायची. एल्विश हनीची विक्री करताना ते तुर्कीच्या समुद्रात खोल गुहेतून मिळत असल्याचा दावा करत विक्री करण्यात आली.

  • 24 Mar 2026 08:15 AM (IST)

    नाशिकमधील खरात फाइल्स प्रकरणात मोठी अपडेट समोर; ‘श्री शिवनिका संस्थान’च्या आर्थिक व्यवहारांचा खुलासा

    नाशिकमधील खरात फाइल्स प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. मिरगावमधील ‘श्री शिवनिका संस्थान’च्या आर्थिक व्यवहारांचा मोठा खुलासा झाला आहे. ऑडिट रिपोर्टमधून संस्थानच्या झपाट्याने वाढीचा तपशील समोर आला आहे. २०२० ते २०२२ दरम्यान उत्पन्न फक्त ४.९० लाखांच्या घरात आहे. १.६० ते १.६४ लाख रुपयांची तूट नोंद करण्यात आली आहे. २०२४ हे ‘गेम चेंजर’ वर्ष ठरलं. ७६ लाख ९१ हजार ४१६ रुपयांच्या देणग्यांचा ‘महापूर’ आला. खर्च वजा जाता तब्बल ७०.६६ लाखांची विक्रमी शिल्लक राहिली.  संस्थानची आर्थिक स्थिती अचानक मजबूत झाली.

  • 24 Mar 2026 08:13 AM (IST)

    नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरातविरोधात तीन नवे गुन्हे दाखल

    नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरातविरोधात तीन नवे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे खरावरील एकूण दाखल गुन्ह्यांची संख्या सहावर पोहोचली आहे. महिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. पाथर्डी परिसरातील सुमारे 25 एकर जमीन व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात आहे. कोट्यवधी रुपयांची लूट झाल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे.

  • 24 Mar 2026 08:11 AM (IST)

    शिर्डीत उद्यापासून रामनवमी उत्सवाला सुरुवात

    शिर्डीत उद्यापासून रामनवमी उत्सवाला सुरुवात होणार आहे. 25 ते 27 मार्चदरम्यान उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. 26 मार्च रोजी साई समाधी मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं राहणार आहे. साईबाबा संस्थान ट्रस्टकडून उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. भाविकांच्या सोयीसाठी संस्थानकडून विविध उपाययोजना केल्या जाणार आहेत. राज्यभरातून अनेक पायी पालख्या दाखल होत आहेत.

  • 24 Mar 2026 08:06 AM (IST)

    भोंदूबाबा अशोक खरातला आज नाशिक कोर्टात हजर करणार

    भोंदूबाबा अशोक खरातला आज नाशिक कोर्टात हजर केलं जाणार आहे. अशोक खरातची पोलीस कोठडी आज संपणार असल्याने न्यायालयात हजर केलं जाणार आहे. भोंदूबाबा खरातविरोधात आत्तापर्यंत सहा गुन्हे दाखल झाले आहेत. गुन्ह्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. एसआयटीकडून तक्रारदारांना पुढे येण्याचं आवाहन केलं जात आहे. त्यासाठी एक हेल्पलाइन नंबरदेखील जारी करण्यात आला आहे.

Follow Us