
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या धामधुमीत सगळे पक्ष व्यस्त असतानाच, राज्यात मोठ्या प्रमाणात पक्षांतरही दिसत आहे. महायुतीमधील नेतेही एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत एकमेकांच्या पाक्षातील नेते, कार्याकर्ते, पदाधिकारी यांना आपल्या पक्षात आणण्यात गुंतले आहेत. मात्र या पळवापळवी मुळे महायुतीमध्ये मोठी नाराजी असून शिवसेना शिंद गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तर चक्क दिल्लीवारी करत अमित शाह (Amit Shah) यांच्यासमोरच नाराजी व्यक्त केली. त्यांनी काल दिल्लीला जाऊन अमित शाह यांची भेट घेतली, त्यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा करतानाच शिदे यांनी शाहांसमोर राज्यातील भाजप नेत्यांच्या विरोधात तक्रारीच पाढा वाचला. मात्र महाराष्ट्रातील घडामोडींकडे माझं लक्ष आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच गोष्टी मला माहीत आहे, असं अमित शहांनी म्हटल्याची माहिती समोर आली आहे. तुम्ही एनडीएतील महत्वाच्या पक्षाचे प्रमुख आहात,. तुमचा सन्मान राखला जाईल असं आश्वासन शहा यांनी एकनाथ शिंदेंना दिलं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान दिल्लीवारीनंतर एकनाथ शिंदे यांनी महत्वाचे आदेश दिले असून त्याची सध्या राज्यभरात चर्चा सुरू आहे. मित्रपक्षातील संभाव्य प्रवेश थांबवा असे आदेश शिंदे यांनी दिल्याचे समजते.
महायुतीत वितुष्ट नको, मित्रपक्षातील संभाव्य प्रवेश थांबवा
राजधानी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेऊन एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर शिवसेनेचे मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना महत्वाचे आदेश दिले आहे. मित्र पक्षातील संभाव्य पक्ष प्रवेश थांबवा असे सांगत महायुतीत वितुष्ट येईल असं कोणतंही काम करू नका असे शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना बजावले आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
काल एकनाथ शिंदे यांचा अचानक दिल्ली दौरा ठरला. त्यावेळी त्यांनी अमित शहांची भेट घेत जवळपास 50 मिनिटं त्यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत महाराष्ट्रात नेमकं काय सुरू आहे, महायुती धर्म कसा पाळायला हवा, त्याचा किती परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर होईल, हे सुद्धा त्यांनी समजावून सांगितलं. त्यानंतर मित्रपक्षातील संभाव्य प्रवेश सध्या रोखा असे आदेशच शिंदे यांनी शिवसेनेचे मंत्री व पदाधिकाऱ्यांना दिले. यामागची पार्श्वभूमी पाहिली तर भाजपने शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांना फोडून पक्षप्रवेश दिला होता.
महायुतीत पॅचअप ?
त्यानंतर नाराज झालेल्या शिवसेनेने मित्रपक्षातील काही पदाधिकाऱ्यांना गळाला लावण्याची रणनिती आखली होती. येत्या 22 तारखेला मित्र पक्षाती, विशेषत: भाजपमधील पदाधिकाऱ्यांचा प्रवेश सोहळा घ्यावा अशी विनंती या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. परंतु, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आाणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी गेल्या दोन दिवसांत झालेल्या चर्चेनंतर हे सर्व संभाव्य प्रवेश रोखण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. महायुतीत वितुष्ट येईल असं कोणतंही काम करू नका असे शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना बजावले आहे. हे पक्षप्रवेश प्रामुख्याने ठाणे, रत्नागिरी, मराठवाडा, नवी मुंबई, रायगड या भागातले होते. मात्र ते प्रवेश सध्या रोखण्याचे आदेश शिंदे यांनी दिल्याने महायुतीत पॅचअप झालं का, मित्रप्रवेशातील प्रवेश आणि एकंदर इनकमिंग थांबणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.