राज्यभरात पावसाचा जोर वाढला, धबधब्यांवर जाण्यास मनाई, हवामान विभागाचा अलर्ट काय?
महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईसह विविध शहरांमध्ये पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे. पवना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस सक्रीय झाला आहे. राज्यात कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. वसई, विरार, नालासोपारा यांसह अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे कोल्हापूरसह घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मुंबईत पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी
मुंबईत सध्या वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. पावसाचा आनंद घेण्यासाठी मुंबईतील गिरगाव चौपाटीवर पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. रविवारची सुट्टी असल्याने तरुण वर्गाने तसेच पर्यटकांनी चौपाटीला पसंती दिली. फुटबॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉल खेळण्यासाठी तरुण वर्गाची मोठी गर्दी झाली होती. जिथे पावसाचा आनंद आणि खेळाचा अनुभव घेण्यासाठी नागरिक जमले होते.
पवना नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
पिंपरी-चिंचवडसह मावळ तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाच्या सांडव्यावरून ४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. पवना धरण ७२ टक्के भरल्याने आणि पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसामुळे पाण्याची मोठी आवक होत आहे. हा विसर्ग १५ जुलैपर्यंत सुरू राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जलसंपदा विभागाने पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गात वाढ किंवा कपात केली जाईल, असे स्पष्ट केले. पवना नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नदीपात्रात कोणीही उतरू नये. तसेच शेती अवजारे, पाण्याचे पंप आणि जनावरे तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
नाशिकमधील धबधब्यावर पर्यटकांना मज्जाव
नाशिकमधील सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांना मज्जाव करण्यात आला आहे. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने पाणी पातळीत वाढ झाली आहे. रविवारची सुट्टी असल्याने धबधबा परिसरात पर्यटकांची गर्दी वाढल्याने अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त आणि गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.
सांगलीत संततधार पाऊस
सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण परिसरात संततधार पावसामुळे छोटे-मोठे धबधबे प्रवाहित झाले आहेत. मे महिन्यापासून सुरु असलेल्या पावसामुळे या परिसरात हिरवळीचे साम्राज्य पसरले आहे. निसर्गाचे सौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. भारतीय हवामान खात्याने कोल्हापूर जिल्ह्याला पुढील पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यासह घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
