Rain Updates : मुंबईसह राज्यात पावसाचा यलो अन् रेड अलर्ट; कोकणात मुसळधार पावसाचा इशारा, कसं राहील वातावरण ?
महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत रिमझिम पाऊस तर जळगाव आणि रत्नागिरीत मुसळधार पाऊस झाला आहे. हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. पावसामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जुनी झाडे पडण्याच्या घटनाही वाढल्या आहेत.

अखेर मान्सूनचे आगमन झाले असून राज्यात येत्या 6 ते 7 दिवसांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून राज्यातील काही भागांसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्रात येत्या 6-7 दिवसांत अतिवृष्टीसदृश्य ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे अनेक भागांना रेड अलर्ट तर काही ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक, गोव्यातही अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 27 मे ते 2 जून या काळात मध्य महाराष्ट्रासह कोकणात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसेल, 40 ते 50 किमी प्रतितास वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मुंबईत पावसाची स्थिती काय ?
काल मुंबईत सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू होता. हवामान खात्याने मुंबईसह राज्यातील अनेक भागांत पावसाचा यलो अलर्ट जारी करत समुद्रकिनाऱ्यांना हाय टाईडचा इशारा दिला होता. त्यानुसार दुपारच्या सुमारास समुद्रात चार ते पाच मीटर उंच लाटा उसळल्या होत्या. मात्र आज सकाळ पासून समुद्रकिनाऱ्यांवर सकाळीच ओहोटी असल्याचे चित्र दिसून येत आहे. आज सकाळपासून दादर चौपाटी परिसरात समुद्राचे पाणी ओहटीमुळे बरेच कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
जळगावमध्ये पहाटेपासूनच मुसळधार पाऊस
मुंबईत पाऊस नसला तरी राज्याच्या इतर भागांत मात्र पावसाने हजेरी लावली असून जळगावमध्ये पहाटेपासूनच मुसळधार पाऊस बरसत आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. गेले 2 दिवस पावसाने उसंत घेतली होती, मात्र आज पहाटेपासून पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. पहाटेपासूनच आकाशात सर्वत्र काळे कुट्ट ढग पसरले असून अनेक भागांत मुसळधार पाऊस तर काही भागांत संततधार पाऊस सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. पावसामुळे वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाल्याने उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र या पावसाचा केळीसह पपई तसेच इतर फळबागांना मोठा फटका बसला असून अनेक शेतकऱ्याची मशागतीचे कामे लांबणीवर पडली आहे.
गोंदिया जिल्ह्यात मान्सूनची हजेरी
गोंदिया जिल्ह्यात मान्सूनची हजेरी लागली असून पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मात्र उकाड्यामुळे वैतागलेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला आहे.
पूर्वमोसमी पावसाने घेतला 254 झाडांचा बळी
पूर्वमोसमी पावसाने घेतला 254 झाडांचा बळी घेतला असून मे महिन्यात झाडे पडण्याच्या सर्वाधिक घटना घडल्य आहेत. विकासकामे झाडांना मारक ठरत आहेत. शहराला मे महिन्यातील पूर्वमोसमी पावसाने दिलेला तडाखा आणि त्यानंतर आता मान्सूनच्या दमदार हजेरीमुळे शहरात मे महिन्यात तब्बल 254 झाडं पडल्याच्या घटना घडल्या आहेत. मे महिन्यात झाडे पडण्याच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. तर, या झाडपडीमुळे एका नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात जुनी झाडे कोसळत असल्याने महापालिकेची विकासकामे झाडांच्या मुळावर उठली आहेत अशी चर्चा सुरू आहे. झाडांची मुळं तसेच खोड कमकुवत झाल्याने हे चित्र आहे.
झाडे पडण्याच्या घटना
जानेवारी : 25 फेब्रुवारी : 29 मार्च: 39 एप्रिल : 72 मे : 254
भर उन्हाळ्यात अवकाळी पावसाने झोडपले; जिल्ह्यातल्या 47 गावांना पुराचा धोका कायम
जालना जिल्ह्यात मे महिन्यात प्रखर उन्हाचा सामना करावा लागेल असं वाटत होतं परंतु मागील 20 दिवसापासून जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावत चांगलंच झोडपून काढलं. त्यामुळे आगामी काळात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झाला असून साहित्याची जुळवणी सुरू केलेली आहे. तर दुसरीकडे गोदावरी नदीकाठी असणाऱ्या गावांना पुढील चार महिने सतर्क राहण्याच्या सूचना देखील प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे. दरम्यान वीज पडण्याची आगाऊ सूचना देणारे दामिनी ॲप प्रत्येकाने मोबाईल मध्ये डाउनलोड करून घ्यावे शिवाय नैसर्गिक आपत्तीच्या काळात १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचा आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आले.
रत्नागिरीतील प्रमुख नद्या पाणीदार
गेले काही दिवस कोकणामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय.रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होताना पाहायला मिळतंय .प्रमुख नद्या पाणीदार होताना पाहायला मिळत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी ,वाशिष्ठी आणि काजळी या प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाली आहे.दरवर्षी जून महिन्यात सुरू होणाऱ्या पावसाने या वर्षी २० मेपासूनच संततधार कोसळण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या पावसामुळे टंचाईग्रस्त गावांना मोठा दिलासा मिळाला आहे. मे महिन्यात विहिरी, नाले, तलाव, कोरड्या पडल्या होत्या.पाणीटंचाईमुळे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त ४८ गावांतील ११२ वाड्यांना १५ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. जवळपास २८,५०५ ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू होती.
