ना लेझर लाईट, ना नाचगाण्याचा कार्यक्रम मग तरीही रेव्ह पार्टी कशी? खडसेंचा थेट सवाल, हनी ट्रॅपबद्दलही मोठा गौप्यस्फोट
पुण्यातील खराडी येथील रेव्ह पार्टीवर पोलिसांनी केलेल्या छाप्यात माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या जावयाची अटक झाली. खडसे यांनी यावर सरकार आणि पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी या प्रकरणाला राजकीय साजिरा असल्याचा आरोप केला आहे आणि पोलीस कारवाईच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण तापले आहे.

पुण्यातील खराडी भागात एका रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळावरून गांजासदृश आणि इतर नशा आणणारे पदार्थ जप्त केल्याचा दावा केला आहे. या अटकेनंतर एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकार आणि पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.
पोलीस यंत्रणा हनी ट्रॅपबद्दल माहिती का देत नाही?
एकनाथ खडसे यांनी याप्रकरणी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी या संपूर्ण प्रकरणाला संशयास्पद म्हटले आहे. यावेळी त्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “हा संपूर्ण प्रकार संशयास्पद आहे. पोलीस जितकी तत्परता दाखवतात, लगेच पत्रकार परिषद घेतात. फोटो दाखवतात, मग इतकी तत्परता प्रफुल लोढा जो हनी ट्रॅपमध्ये अडकला, बलात्कारामध्ये अडकलाय, ज्याने गिरीश महाजनांवर आरोप केले आहेत, त्या संदर्भात पोलीस यंत्रणा किंवा सरकार पुढाकार घेऊन जनतेला माहिती का देत नाही?” असा सवाल एकनाथ खडसेंनी विचारला.
जर सत्य असेल तर कारवाई करा
“नाशिकमध्ये जे काही सेक्स कँडल किंवा हनी ट्रॅप झाला त्याचा इतका गवगवा केला, त्याठिकाणी इतके आरोप झाले. त्या महिलने आरोप केले. तीन ठिकाणी ते मागे घेण्यात आले ही वस्तुस्थिती आहे. त्याबद्दल सरकार काहीही का करत नाही. एकंदरीत पोलीस यंत्रणा यामध्ये कशाही पद्धतीने खडसे बदनाम झाला पाहिजे, अशा स्वरुपाचा प्लॅन केल्याचे पाहायला मिळत आहे. इथे वारंवार खडसेंचे जावई, खडसेंचे जावई असे वारंवार बोलत आहेत. जर त्याने केलं असेल तर नक्की कारवाई करा, मी त्याबद्दल बोलत नाही, जर सत्य असेल तर कारवाई करा, माझी ना नाही. पण जर अशा पद्धतीने प्लॅन करुन कोणी करत असेल तर याबद्दल सरकारने, पोलिसांनी उत्तर द्यावे”, असेही एकनाथ खडसेंनी म्हटले.
मग ही रेव्ह पार्टी कशी?
“नाचगाण्याचा कार्यक्रम नाही, लेझर नाही मग ही रेव्ह पार्टी कशी?” असा सवाल एकनाथ खडसेंनी केला. तसेच या प्रकरणाला मुद्दाम रेव्ह पार्टी म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संशय व्यक्त केला. या प्रकरणात सत्य बाहेर येईलच असा विश्वासही खडसेंनी व्यक्त केला. या घटनेमुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.
