‘यांच्या आईच्या नवऱ्याने पैसे दिले का?’ डिफेंडर प्रकरणावरून जरांगे पाटलांचे टीकाकारांना चोख उत्तर
Manoj Jarange Defender Car : सध्या महागड्या डिफेंडर या कारने प्रवास केल्यामुळे जरांगे पाटलांवर टीका केली जात आहे. या टीकेला आता जरांगे पाटलांनी उत्तर दिले आहे.

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. सध्या महागड्या डिफेंडर या कारने प्रवास केल्यामुळे जरांगे पाटलांवर टीका केली जात आहे. तसेच ही कार जरांगेंना दौऱ्यासाठी कोणी दिली, अशी चर्चा सध्या सुरु आहे. यावर आता जरांगे पाटलांनी भाष्य केले आहे. कराडमधील सभेमध्ये त्यांनी टीकाकारांना चोख उत्तर दिले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
समाज जागा झाला याचा मनापासून आनंद – जरांगे पाटील
कराडमधील सभेत बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, ‘पश्चिम महाराष्ट्रातला समाज जागा झाला याचा आम्हाला मनापासून आनंद आहे. पश्चिम महाराष्ट्र एकत्र येत नाही असं कुणीतरी आधी म्हटलं होतं. पण मराठे जागे झाले हीच आनंदाची गोष्ट आहे. आपण एक आलो नाही, तर आपल्या मुळावर घाव बसतो. काहीही गरज नसताना आपल्या मराठा समाजाच्या नोंदी रद्द करण्याचं काम केलं. आपला समाज जसा ताकदीने उतरला ते कुणाला खपत नाही. आपल्याला भविष्याचा विचार करणं गरजेचं आहे. सावध व्हा, अन्यथा पुढच्या पिढीच जगणं मुश्किल होईल. अन्यायाची जाणीव झाली हे आपल्या साठी खूप महत्वाचं आहे.’
आरक्षण नसल्याने नोकऱ्या मिळत नाहीत…
पुढे बोलताना जरांगे पाटलांनी म्हटले की, टमराठ्यांना आरक्षणात ठेवायचं नाही हा कट रचला गेला, तुम्ही एकजूट राहिले नाहीतर मराठे आरक्षणापासून बाहेर जाणार. तुम्ही पक्षात विखरु नका, लेकरं मोठे होऊ शकत नाही, आरक्षण नसल्याने नोकऱ्या मिळत नाहीत. काहींच कारण नसताना प्रमाणपत्र रद्द करत आहे. आपल्याला जाग होणं गरजेचं आहे. OBC चं एक टक्काही आरक्षण द्या असं आम्ही म्हणत नाही. आमची नोंद सापडली त्याचं कुणबी प्रमाणपत्र द्या म्हणत आहे.’
यांच्या आईच्या नवऱ्याने पैसे दिले का?
जरांगे पाटलांनी पुढे बोलताना म्हटले की, टप्प्यात आल्यावर मी कार्यक्रम करतोच. मी कुणावर डाव टाकतो, हे कुणालाच सुधारत नाही. मराठाच बाप आहे, सरकार बाप नाही. मी तुमच्याशी कधीच गद्दारी करणार नाही, यांच्या मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणार आहे. माझ्यावर जळणाऱ्याची संख्या खूप आहे. मी डिफेंडरमध्ये फिरतोय, यांच्या आईच्या नवऱ्याने पैसे दिले का? मला जात मोठी करायची आहे म्हणून माझ्यावर माझी जात प्रेम करती. तुला काय करायचं मी कोणत्याही गाडीत बसेल. माझ्या समाजाचे लेकरं मला लाल दिव्याच्या गाडीत बसलेले बघायचे आहेत.
