
बीडमधील नारायण गडावर मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्याला राज्यातील हजारो मराठा बांधव उपस्थित होते. प्रकृती खराब असतानाही मनोज जरांगे यांनी या मेळाव्याला हजेरी लावली होती. यावेळी मनोज जरांगेंनी विविध मुद्द्यावर भाष्य केले. राज्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारने आर्थिक मदत करावी, यासाठी सेलिब्रिटी आणि राजकारण्यांकडून पैसे घ्यावेत असा सल्ला जरांगे पाटलांनी सरकारला दिला आहे. ते नेमके काय म्हणाले ते जाणून घेऊयात.
राज्यात पावसामुळे झालेल्या नुकसानाबाबत बोलताना जरांगे पाटलांनी म्हटले की, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नदीच्या शेजारचे वावर वाहून गेले. पिक वाहून गेले. त्यांना 1 लााख 30 हजार रुपये भरपाई द्या. आपलं असंच असतं. तज्ज्ञ नाही. अभ्यासक नाही. पुस्तकं नालीत वाचत बस म्हणा. ज्याचं शेत वाहून गेलं. पिक गेलं त्याला 1 लाख 30 हजार द्या. ज्याची जनावरे वाहून गेले, बाजरी, सोयाबीन वाहून गेले. त्यांना शेतकरी सांगेल तसा पंचनामा करून 100 टक्के भरपाई द्या. घर पडलं, शेळ्या वाहून गेल्या, सोनं वाहून गेलं. नळ्या वाहून गेल्या, सर्व वाहून गेले तेवढे पैसे द्यावेत.’
सरकारने उसाच्या एका टनामागे 15 रुपये कापण्याचा निर्णय घेतला आहे. यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, एक रुपयाही कापायचा नाही. शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे कापण्यापेक्षा ज्यांचा 10 हजार पगार आहे त्याचे अडीच हजार कापा, ज्याचा 20 हजार पगार त्याचे 5 हजार कापा, ज्याचा एक लाख आहे, त्याचे 25 हजार कापा. त्याला काय कमी पडणार आहे. कमी तर कमी. कमीत कमी चार पाच लाख तर अधिकारी नोकऱ्यावाले असतील. या 10 लाखातच जवळपास हजार एक कोटी जमा होतील. प्रत्येक राजकीय पक्षाकडे ही मागणी करायचे. ऊसाचे पैसे कापायचे नाही. नोकरदारांचे पैसे कापा आणि शेतकऱ्यांना वाटा.’
पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, ‘तुमच्या मुलांच्या गाडीचे टायर लाखाचे आहे. एका एका पक्षाकडे हजार कार्यकर्ते आहेत. उद्योगपती, राजकीय नेते यांच्याकडे हजारो रुपयांची प्रॉपर्टी आहे ना. फडणवीस यांची प्रॉपर्टी कमी आहे का. अजित पवारांची प्रॉपर्टी कमी आहे का. शिंदेकडे कमी प्रॉपर्टी आहे की. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याकडे काडी लागली का, काँग्रेसचे आहेत. नाना पटोले आहे, सोनिया गांधी आहे, त्यांचे पैसे कापा.’
‘अंबानीचं तेल मीठ बंद करा. एक दिवस रिलायन्स पंपाचा पैसा येतो तो दे शेतकऱ्यांना द्या. राज ठाकरेंकडे काही कमी आहे का. त्यांचे ट्रॅव्हल कंपन्या चालत आहेत. नारायण राणेंकडे काही कमी आहे का. छग्याला दोन चार पोते पैसे भरून द्या. त्यांच्याकडे काही काडी लागली का. वडेट्टीवार, छप्पन कुळेंकडून घ्या. कुटेची कंपनी त्यांनी बंद पाडली. अदानी, अंबानी टाटाकडून पैसे घ्या. आमच्या शेतकऱ्यांना लुटेपर्यंत अनेक कंपन्या आहेत. त्यांच्याकडून घ्या. निवडणुकीत त्यांच्याकडून घ्या. जैन मारवाड्यांकडून पैसे घ्या.’
पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, ‘शाहरुख खान त्याच्याकडून पैसे घ्या. देशात नंबर वन आहे. एवढे हिरो आहेत. त्यांच्या गाड्या 12-12 कोटींच्या आहेत. यांच्याकडे एवढं आहे. यांच्याकडून पैसे वसूल करा. एक हजार लोकं सर्व पक्षांकडे आहे. एक हजार कोटी एक एक पक्ष उभे करू शकतात या लोकांकडून पैसे घ्या आणि शेतकऱ्यांना द्या.’