राज ठाकरे म्हणजे मानाला भुकेलेलं पोरगं, कुचक्या कानाचे; मनोज जरांगे यांचा जोरदार हल्लाबोल
मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील हे आंदोलन राजकीय वादाचा विषय बनले आहे. राज ठाकरे यांनी आंदोलनावर टीका केली असताना, जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर खरपूस प्रतिक्रिया दिली.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. आज या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलकांनी ठिय्या मांडला आहे. या आंदोलनावरुन नुकतंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाचा विषय सोडवला होता, मग ते परत का आले, असा सवाल राज ठाकरेंनी केला होता. यावरुन मनोज जरांगेंनी खरपूस टीका केली आहे.
मनोज जरांगे यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज ठाकरेंच्या विधानावर टीका केली. मराठा तरुणांनी मान खाली घालावी लागेल असं पाऊल उचलायचं नाही. सर्वांनी शांत राहायचं. यांनी कितीही अन्याय अत्याचार करू द्या. मी आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. हा माझा शब्द आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.
पैसे छापायला बघतात
कुणी रेनकोट, छत्र्या वाटत असतील तर एक रुपया देऊ नका. त्यांच्या छत्र्या, रेनकोट घेऊ नका. काही लोकांनी धंदा सुरू केला आहे. समाजाच्या नावाने कमवत आहेत. माझ्या नावावर कमावत आहेत. रेनकोट वाटपाच्या नावाखाली पैसे गोळे करू नका. शेवटचं सांगतो. महाराष्ट्रातील मराठ्यांनी कुणालाही पैसे द्यायचे नाही. गरीबाची सेवा करा. लोकं ट्रक भरून घेऊन येत आहेत. कुणी नाव सांगत नाही. समाजाला मदत करायची सोडून पैसे छापायला बघत आहे, अशीही टीका मनोज जरांगेंनी केली.
काल आणि आज मी पाणी प्यायलो. उद्यापासून मी पाणी घेणार नाही. पाणी बंद करणार आहे. सरकार ऐकत नाही. उपोषण कडक करणार. मराठा तरुणांनी मान खाली घालावी लागेल असं पाऊल उचलायचं नाही. सर्वांनी शांत राहायचं. यांनी कितीही अन्याय अत्याचार करू द्या. मी आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. हा माझा शब्द आहे. काल जर मुख्यमंत्र्यांच्या घरी बैठक झाली. तातडीने मार्ग काढा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत असं ऐकलं. मग ज्यांना आदेश दिले तर ते मार्ग का काढत नाही. उपसमितीला आदेश दिला. मग मार्ग का काढत नाही. हे लय भंगार आहेत. नुसत्या बैठका घेत आहेत. लय बैठका झाल्या, असे मनोज जरांगेंनी सांगितले.
मग पक्ष बरबाद झाला तरी चालतं
राज ठाकरेंच्या म्हणण्यावर बोललो. दोघे भाऊ चांगले. ब्रँड चांगला आहे. हा विनाकारण मराठ्यांच्या मध्ये पडतो. ११ ते १३ आमदार निवडून दिले. ते पळून गेले. आम्ही विचारलं का. फडणवीसांनी लोकसभेला तुझा गेम केला. विधानसभेला तुझ्या मुलाला त्यांनीच पाडलं. तरी आम्ही विचारलं का. राज ठाकरे म्हणजे मानाला भुकलेलं पोरगं. फडणवीस त्यांच्या घरी चहा पिऊन गेला तरी मग पक्ष बरबाद झाला तरी चालतं. हुरळून जातात. कुचक्या कानाचं म्हणतात. तुम्ही नाशिकला गेला. आम्ही विचारलं का. पुण्याला गेला आम्ही विचारलं का. तुम्ही संभाजीनगरला येता आम्ही विचारलं का? असा सवाल मनोज जरांगेंनी केला.
चंद्रकांत पाटील लैच लांब जायला लागलेत
चंद्रकांतदादांना म्हणा मराठ्यांच्या शिव्या खाऊ नका. इथून पुढे बोलू नका. या चंद्रकांत पाटलांनीच मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून व्हॅलिडिटी रोखली होती. त्यामुळे वचवच करू नका. तू जास्त लांब नाही. कोल्हापूरलाच आहे. राजघराण्याच्या भागातच आहे. चंद्रकांत पाटील लैच लांब जायला लागलेत, असेही मनोज जरांगे म्हणाले.
