Manoj Jarange Patil : OBC चा खरा घात हा…मनोज जरांगे पाटील यांचा काँग्रेसवर अत्यंत गंभीर आरोप
Manoj Jarange Patil : "दबावात कुणाच्या जीआर निघत नसतो आणि रद्दही होत नसतो. त्याला कायदेशीर आधार घेतलाय का? कायद्याचे निकष पूर्ण केलेत का? हे सरकारला बघाव लागतं. कायद्याच्या चौकटीत राहून काम करावं लागतं. कोणाच्या दबावामुळे जीआर रद्द होत नसतो" असं मनोज जरांगे यांनी सांगितलं.

नागपूरला ओबीसी समाजाचा मोर्चा आहे. रस्त्यावर उतरुन ताकद दाखवणार. त्यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “काढू दे ना मोर्चे. दमले पाहिजे ते पण, आयतं खायला मिळालय. 16 टक्के मराठ्यांच आरक्षण खाल्लं. सरकार पण त्यांची मजा बघतय. त्यांच्या म्हणण्यानुसार, कायदा चालत नसतो. ते म्हणतील तसं होणार नाही. ते म्हणजे कायदा नाही“ “मराठ्यांसाठी हैदराबाद गॅझेटच्या आधारे जीआर काढला. पश्चिम महाराष्ट्रासाठी सुद्धा सातारा, औध संस्थानच्या आधारे गॅझेट निघतोय. कारण आमची प्रत्येक गोष्ट आधार घेऊन केलेली आहे, कितीही बोलू दे जीआरला, आरक्षणाला धक्का सुद्धा लागणार नाही. मराठ्यांना काय द्यायचं म्हटलं की नियम लागतात. पण त्यांना द्यायचं म्हटलं की, नियम लागत नाही. ही खूप खंत आहे आमची“ असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“त्यांचं काहीच बघितल जात नाही. लगेच आरक्षण दिलं जातं. न मागता त्यांच्या अंगावर फेकलं जातं. आम्हाला मात्र संघर्ष करावा लागतो. आमच्या नोंदी असून सुद्धा झगडावं लागतं. सगळे पुरावे असून सुद्धा त्रास दिला जातो. पण आम्ही कणखर, खंबीर आहोत. आम्ही लढून मिळवणार. मिळवलेलं जाऊ सुद्धा देणार नाही. आता जीआर निघालाय, मराठे सज्ज झालेले आहेत. आता प्रमाणपत्रासाठी मराठ्यांनी तयारी करण गरजेचं आहे“ असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
धनगर, बंजारा समाजाच्या आरक्षणावर काय म्हणाले?
धनगर, बंजारा समाज रस्त्यावर उतरला आहे. त्यावरही जरांगे पाटील बोलले. “धनगर बांधव असतील, आदिवासी बांधव असतील, बंजारा बांधव असतील, यांनी एकत्र बसून समज-गैरसमज दूर करणं गरजेच आहे. जर बंजारा समाजाच्या नोंदी असतील, तर त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. बसून तोडगा काढण्याचा प्रयत्न कराव हे माझं मत आहे“ असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
ओबीसींचा खरा घात कोणी केला असेल, तर, तो….
वडेट्टीवार म्हणतात ओबीसीत 350 जाती आहेत, सगळं तुम्हालाच पाहिजे. “ओबीसींच्या 374 जाती संपवल्या कोणी? या वडेट्टीवार साहेबांच्या वक्तव्याचा ओबीसींनी विचार करणं गरजेच आहे. ओबीसींना खोटं आणि बोगस आरक्षण दिलं. आमच मराठ्यांच 16 टक्के काढून. ओबीसींचा खरा घात कोणी केला असेल, तर येवल्याच्या अलिबाबांनी आणि काँग्रेसच्या पूर्वीच्या नेत्यांनी. त्यांना माहित होतं, 14 टक्के आरक्षण मंडल कमिशनने ओबीसींना दिलय, 16 टक्के आरक्षण मराठ्यांच आहे हे माहित असताना सुद्धा दिलं. ओबीसींची खरी फसवणूक, वाटोळं कोणी केलं असेल, तर ओबीसी नेत्यांनीच केलय“ असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.
