Sanjay Raut : तर हे वादळ मुंबईत आलंच नसतं… जरांगे यांच्या आंदोलनावरून संजय राऊत यांनी साधला सरकारवर निशाणा
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आमरण उपोषण सुरू केले आहे, मराठा आरक्षणासाठी त्यांची मागणी आहे. हजारो मराठा समाजाचे लोक त्यांना पाठिंबा देण्यासाठी आले आहेत. शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी चर्चा करून हा प्रश्न सोडवावा असे राऊत म्हणाले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कायदा व सुव्यवस्था राखणे आव्हान आहे.

मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलनाचं, उपोषणाचं अस्त्र उपसणारे मनोज जरांगे पाटील आज मुंबईतील आझाद मैदानात दाखल झाले असून सकाळी 10 वाजल्यापासून त्यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे. सरकार आमच्या सर्व मागण्या मान्य करेपर्यंत बेमुदत आमरण उपोषण करणार, गोळ्या खाव्या लागल्या तरी आता मागे हटणार नाही असे सांगत मनोज जरांगे यांनी निर्धार व्यक्त केला आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी हजारो मराठा बांधव आझाद मैदान आणि आसपासच्या परिसरात जमले असून मुंबईत अक्षरश: भगवं वादळ एकवटलं आहे. मनोज जरांगे यांच्या याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदा संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
सध्या गणेशोत्सव सुरू असून सणा-सुदीच्या काळात मुंबईत प्रचंड गर्दी असते. आणि त्याच दरम्यान मराठा आंदोलनामुळे हजारो आंदोलकह मुंबईत दाखल झाले असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याच सर्व मुद्यांवरून राऊतांनी सरकारला घेरलं. मराठा आंदोलनाचे नेते, जरांगे जिथे बसले होते, त्या मराठवाड्यात सरकारच्या वतीने अधिकारी गेले होते, पण तिथे जर खुद्द मुख्यमंत्री फडणवीस गेले असते, त्यांच्याशी चर्चा केली असती तर हे वादळ मुंबईत आलंच नसतं, असं राऊत म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी दोन पावलं मागे जायला हवं होतं, स्वतः ठोस प्रपोजल घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्या गावात जाऊन मुख्यमंत्र्यांनी चर्चा करायला पाहिजे होती असंही राऊत यांनी नमूद केलं.
जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण
मुंबई ही महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची राजधानी आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला मराठी माणूस आपला न्याय मागण्यासाठी मुंबईत आलेला आहे. मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे न्यायालयाचे काम नाही, जर कोणी हे न्यायालयाच्या हवाले देत असतील हे सरकारचं काम आहे हे राज्याच्या गृह खात्याचे काम आणि खास करून राज्याच्या मुख्यमंत्र्याचे काम. कोणीतरी जरांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून अप्रत्यक्षपणे राजकारण करत आहे असं राऊत म्हणाले.
आतापर्यंत आपण जेव्हा जेव्हा सत्तेवर आलेल्या आहात तेव्हा आपण या प्रश्नांना चालना दिली किंवा त्या माध्यमातून राजकारण तुम्ही केलं मिस्टर फडणवीस. आणि तुम्हाला आता त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण कोणी करत असेल. आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात,त्यामुळे जनतेला विश्वासात घेऊन सांगा राजकारण करणारे कोण? तुमच्या सरकारमध्ये आहेत विरोधी पक्षात आहेत की कॅबिनेटमध्ये आहेत ? ते सांगावं असंही राऊतांनी सुनावलं.
म्हणून लोक चिडले आहेत
जर आपण ब्राह्मण समाजासाठी एक परशुराम महामंडळ स्थापन करून त्यांच्या आर्थिक विकासासाठी उपलब्ध निधी करून दिला. शासनाचे पाच पाच वरिष्ठ अधिकारी त्या महामंडळाच्या कार्यासाठी तुम्ही कामाला लावले. पण मराठा समाज आज रस्त्यावर आहे, ही एक दरी तुम्ही समजून घेतले पाहिजे आणि लोक यामुळे चिडलेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यावर अशाप्रकारे जे आरोप केले जात आहेत त्याला ते स्वतः जबाबदार आहत, अशा शब्दांत राऊतांनी खडे बोल सुनावले.
ते महाराष्ट्राला आग लावण्याचा प्रकार करत आहेत
सगळा महाराष्ट्र माझा आहे, या महाराष्ट्र जाती उपजाती सगळ्या माझ्या आहेत आणि मी या सगळ्यांचा नेता आहे. म्हणून मी या राज्याचा नेते आहे यशवंतराव चव्हाण, वसंत दादा पाटील, वसंतराव नाईक, शरद पवार, माननीय बाळासाहेब ठाकरे अशा नेतृत्वांनी महाराष्ट्राला जी दिशा दिली, त्याच्यापासून ते भरले आहेत ते एका जातीय नेते होण्याचा प्रयत्न करत आहेत. मला नेता म्हणावा, नेता समजावा म्हणून ते इतर जातीमध्ये भांडण लावण्याचे काम राजकीय दृष्ट्या जसे मोदी करत आहेत तसे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस करत असतील ,तर ते महाराष्ट्राला आग लावण्याचा प्रयत्न करत आहेत अशी टीकाही राऊतांनी केली.
