ओबीसी तरुणाच्या आत्महत्येनंतर अजित पवारांनी हात जोडले, ओबीसी समाजाला दिले मोठे आश्वासन
महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाच्या निर्णयामुळे ओबीसी समाजात भीतीचे वातावरण आहे. लातूरमधील एका शेतकऱ्याने याच चिंतेतून आत्महत्या केली. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओबीसी समाजाला आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे.

महाराष्ट्रात सध्या ओबीसी आणि मराठा आरक्षणावरुन मोठा वाद सुरु झाला आहे. राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटला मंजुरी दिल्यानंतर आता मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळणं शक्य झाले आहे. मात्र या कारणामुळे सध्या ओबीसी समाजात आरक्षणावरुन भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच भीतीपोटी लातूर जिल्ह्यातील ३५ वर्षीय भरत कराड या तरुणाने आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले होते. ते लातूरच्या रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावात राहत होते. त्यांच्या आत्महत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला होता. आता यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एक ट्वीट करत ओबीसी समाजाला मोठे आवाहन केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतंच त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. अजित पवार यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी कुटुंबियांचे सांत्वनही केले. लातूर जिल्ह्यातील वांगदरी (ता. रेणापूर) येथील श्री. भरत महादेवराव कराड यांनी ओबीसी आरक्षणाच्या चिंतेतून मांजरा नदीपात्रात उडी घेऊन जीवन संपवल्याची घटना अत्यंत दुःखद आणि मन हेलावणारी आहे. सर्वप्रथम त्यांच्या आत्म्यास मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे अजित पवार म्हणाले.
अजित पवार काय म्हणाले?
आपलं सरकार सर्व समाज घटकांच्या न्याय व हक्कांसाठी कटिबद्ध आहे. मराठा समाजाला आरक्षणाचा हक्क देतांना कोणत्याही परिस्थितीत ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, याची आम्ही पूर्ण खबरदारी घेत आहोत. त्यामुळे या संवेदनशील काळात कुणीही टोकाची भूमिका घेऊ नये, अशी मी सर्वांना विनंती करतो. प्रत्येक समाजाच्या हितासाठी आम्ही काम करत असून कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही, हीच आमची भूमिका आहे. या दुःखद प्रसंगी मी कराड कुटुंबीय आणि त्यांच्या आत्मीयांच्या दुःखात सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याचं बळ देवो, हीच प्रार्थना, असेही आश्वासन अजित पवारांनी दिले.
लातूर जिल्ह्यातील वांगदरी (ता. रेणापूर) येथील श्री. भरत महादेवराव कराड यांनी ओबीसी आरक्षणाच्या चिंतेतून मांजरा नदीपात्रात उडी घेऊन जीवन संपवल्याची घटना अत्यंत दुःखद आणि मन हेलावणारी आहे. सर्वप्रथम त्यांच्या आत्म्यास मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
आपलं सरकार सर्व समाज…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) September 12, 2025
नेमकं प्रकरण काय?
लातूरच्या रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावातील भरत कराड हे गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीमुळे चिंतेत होते. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाल्यास ओबीसी समाजाचे आरक्षण संपुष्टात येईल अशी भीती त्यांना वाटत होती. ते फारसे शिकलेले नव्हते, त्यामुळे आपल्या मुला-मुलींच्या भविष्याची त्यांना विशेष काळजी होती. आपल्या मुलामुलींना शिक्षण आणि नोकरीत आरक्षणाचा लाभ मिळणार नाही या विचाराने ते निराश झाले होते. याच निराशेपोटी त्यांनी मांजरा नदीपात्रात उडी घेऊन टोकाचे पाऊल उचलले. त्यांच्या आत्महत्येनंतर पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली आहे. यात त्यांनी माझ्या पाठीमागे तरी माझ्या कुटुंबाला आणि ओबीसी समाजाला न्याय मिळावा, असे म्हटले आहे.
