मराठवाड्यात 22 लाख शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका; 53 जणांचा मृत्यू अन्…, नुकसानीच्या पंचनाम्याचा अहवाल समोर
१ जून ते ६ सप्टेंबर दरम्यान मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत नैसर्गिक आपत्तीमुळे ५३ जणांना आपला जीव गमावावा लागला आहे. शिवाय १६ जण जखमी झाले.
Marathwada Rain Affected Area : गेल्या काही दिवसांपासून मराठवा़ड्यात सतत पाऊस कोसळत होता. यामुळे अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याचे पाहायला मिळाले. हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, नांदेड, परभणी या भागात मुसळधार पाऊस झाला होता. यामुळे अनेक जिल्ह्यात पूरस्थिती पाहायला मिळत होती. आता मराठवाड्यात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. यानुसार १८ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील खरीप पिकांसह फळबागांना फटका बसला आहे. तर या विभागात ३९.६५ टक्के नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. यानुसार ७ लाख २० हजार हेक्टरवरील पंचनामे झाले असून, ११ लाख हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे अद्याप शिल्लक आहेत.
मराठवाड्यात 1 ते 3 सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीचा फटका खरीप पिकांसह फळबागांना बसला. यामध्ये 18 लाख हेक्टर क्षेत्र पेक्षा अधिक पिकांचं अतोनात नुकसान झालं होतं. त्यानंतर प्रशासनाकडून तात्काळ पंचनामे करण्याला सुरुवात झाली. सद्यस्थितीला मराठवाड्यात 7 लाख 20 हजार हेक्टर वरील पंचनामे पूर्ण झाले आहेत. तर उर्वरित 11 लाख हेक्टरवरील पंचनामे अद्यापही बाकी आहेत, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे ही टक्केवारी 39 टक्क्यांवर पोहोचली.
पिकांसह फळबागांचा प्रचंड नुकसान
मराठवाड्यातील 22 लाख 48 हजार 445 शेतकऱ्यांचं 18 लाख हेक्टर पेक्षाही अधिक क्षेत्रावरील खरीप पिकांसह फळबागांचा प्रचंड नुकसान झालं होतं. यामध्ये 17 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र हे जिरायत तर 27 हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्र फळबागांचा होतं.
प्रशासनाच्या प्राथमिक माहितीनुसार, मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ७ लाख १५ हजार ९५८ शेतकऱ्यांच्या ६ लाख ६६ हजार ८५८.६५ हेक्टरवरील शेतीपिकांचे पंचनामे आतापर्यंत पूर्ण झालेले आहेत. या पंचनाम्याची टक्केवारी ३९.६५ टक्के असून या पंचनाम्यात परभणीत सर्वाधिक ८५.५ टक्के पंचनामे पूर्ण झालेले आहेत. त्यापाठोपाठ हिंगोलीत ६७.३८ टक्के, लातूरमध्ये ३३.८२ टक्के, बीडमध्ये २३.७८ टक्के, छत्रपती संभाजीनगरमध्ये २०.५३ टक्के, जालन्यात १५.४३ टक्के, नांदेडमध्ये १३.२६ टक्के तर धाराशिवमध्ये सर्वात कमी केवळ १.२५ टक्के पंचनामे झाल्याचे दिसत आहेत.
घरांची अंशतः पडझड
तसेच १ जून ते ६ सप्टेंबर दरम्यान मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत नैसर्गिक आपत्तीमुळे ५३ जणांना आपला जीव गमावावा लागला आहे. शिवाय १६ जण जखमी झाले. सुमारे १२६९ जनावरांना आपला जीव गमवावा लागला. तसेच १४ पक्क्या व कच्च्या घरांची पूर्णतः पडझड झाली असून ३८४ पक्क्या घरांची अंशतः तर २४२३ कच्च्या घरांची अंशतः पडझड झाली आहे. त्यासोबतच २७ झोपड्या पडझड वा नष्ट झाल्या असून १८२ गोठ्यांचेही या नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. दरम्यान नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर सरकारकडून कधी मदत मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलं आहे.