माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपदाचा राजीनामा देण्याबद्दल मोठं वक्तव्य, म्हणाले…
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर सभागृहात मोबाईलवर रम्मी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. विरोधकांच्या आरोपांना तोंड देत, कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि जर ते दोषी आढळले तर राजीनामा देण्याची घोषणा केली.

सध्या राज्याच्या राजकारणात कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. माणिकराव कोकाटे यांचा भर सभागृहात अधिवेशनादरम्यान मोबाईलवर रम्मी गेम खेळतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओवरुन विरोधकांकडून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. रम्मी मास्टर कृषीमंत्री, शेतकऱ्यांनो विसरा हमी, खेळा रम्मी, अशी टोलेबाजीही केली जात आहे. त्यातच कृषीमंत्र्यांच्या या व्हिडीओवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचे बोललं जात होतं. आता कोकाटे यांनी यावर थेट भाष्य केले.
माणिकराव कोकाटे यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत कोकाटे यांनी राजीनामा देण्याबद्दल भाष्य केले. यावेळी माणिकराव कोकाटे यांनी “मी ऑनलाईन रमी खेळताना दोषी आढळलो तर नागपूरच्या अधिवेशनात मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांपैकी दोघांपैकी कोणीही एकाने निवदेन करावं, त्याच क्षणी न थांबता, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना न भेटता थेट राज्यपालांकडे जाऊन मी राजीनामा सादर करेन”, असे थेट आवाहन कोकाटे यांनी दिले.
मी राजीनामा सादर करेन
“मला ओसडीकडून माहिती घेण्यासाठी एसएमएस करावा लागतो. किंवा फोन करावा लागतो. मी मोबाईल उघडताच तो गेम आला. तो स्किप करता आला नाही. मोबाईल नवीन होता. स्किप करणारा व्हिडीओ समोर आला नाही. मोबाईल उघडल्यावर कोणताही गेम स्किप होत नाही. दहा पंधरा सेकंदाचा व्हिडिओ समोर आला. पूर्ण व्हिडिओ का दाखवला नाही. महाराष्ट्राच्या लक्षात आलं असतं. मी याबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सभापती आणि विधानसभा अध्यक्ष या चौघांना लेखी पत्र देणार आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणार आहे. यात सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे. जर माझ्या पत्राच्या आधारे मी ऑनलाईन रमी खेळताना दोषी आढळलो तर नागपूरच्या अधिवेशनात मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांपैकी दोघांपैकी कोणीही एकाने निवदेन करावं, त्याच क्षणी न थांबता, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना न भेटता थेट राज्यपालांकडे जाऊन मी राजीनामा सादर करेन”, असे माणिकराव कोकाटेंनी म्हटले.
दोषींचे सीडीआर चेक करा
“व्हिडीओ कुणी काढला त्यात मला जायचं नाही. सभापती त्याची चौकशी करतील. त्यात काही नाही. ज्यामुळे शेतकरी आणि छावा संघटनेच्या भावना दुखावतील. मी वेडंवाकडं काही केलं नाही. शेतकऱ्यांशी संबंध नाही अशा गोष्टी दाखवल्या गेल्या. दोषींचे सीडीआर चेक करा. जे कोणी भाग घेतला ते समोर येऊ द्या. कृषी मंत्री म्हणून वारंवार समोर आणलं जातं, त्याची चौकशी करावी”, असेही माणिकराव कोकाटे म्हणाले.
