मोठी बातमी! घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाकडून राज ठाकरेंना निमंत्रण
एकीकडे शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांची युती होऊ शकते अशी चर्चा सुरू आहे, मात्र त्यातच आता शिवसेना शिंदे गटाकडून राज ठाकरे यांना जेवणासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे.

राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राबाबतचे दोन्ही जीआर रद्द केल्यानंतर मुंबईमध्ये विजयी मेळावा पार पडला होता, या मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधू शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची उपस्थिती होती. तब्बल वीस वर्षानंतर हे दोन्ही बंधू एकाच व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिलालं. दरम्यान त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा देखील दिल्या, ठाकरे बंधूंमध्ये जवळीक वाढत असल्याचं यातून दिसून येत आहे. आगामी निवडणुकांसाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र येऊ शकतात, अशी देखील जोरदार चर्चा सुरू आहे.
मात्र दुसरीकडे आता शिवसेना शिंदे गटाकडून देखील मनसे प्रमुख राज ठाकरे यांना जेवणाचं निमंत्रण देण्यात आलं आहे, याबाबत मंत्री शंभूराज देसाई यांनी माहिती दिली आहे. मनसे आणि शिवसेना यांची युती होणार की नाही हे वेळ सांगेल? कारण एकीकडे त्यांचं उद्धव ठाकरेंशी बोलणं सुरू आहे, दुसरीकडे आम्ही सुद्धा त्यांना जेवणासाठी निमंत्रण दिलं आहे. आम्ही त्यांच्याकडे गेलो तर एक पद्धत असते की त्यांना आम्ही सुद्धा निमंत्रण दिलं पाहिजे. त्यामुळे त्यांना आम्ही सुद्धा निमंत्रण दिलेलं आहे, ते कधी येतात याची आम्ही वाट पाहत आहोत. एक, दोन दिवसांमध्ये एकनाथ शिंदे यांच्याशी याबाबत चर्चा करू, असं यावेळी देसाई यांनी म्हटलं आहे.
दरम्यान आज भंडारा येथे बोलताना परिणय फुके यांनी शिवसेनेबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, यावर देखील शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. परिणय फुके यांनी जे वक्तव्य केले आहे, ते योग्य नाही, इथे कोणी कोणाचा बाप नाहीये, सगळे समान आहेत, महायुतीमध्ये तीन्ही पक्ष मिळून सरकार चालवत आहेत, त्यामुळे कोणी कोणाचा बाप काढू नये, असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. दरम्यान फुके यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना शिंदे गट चांगलाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
