Raj Thackeray : आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही, राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा
Raj Thackeray : "दोघांची भाषण संपली की एकत्र आरोळ्या ठोका. खरंतर आज मोर्चा निघायला पाहिजे होता. मराठी माणूस कसा सर्वबाजूनी एकवटतो याचं चित्र मोठ्या प्रमाणावर उभं राहिलं असतं. नुसत्या मोर्चाच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली. खरंतर आजचाही मेळावा हा शिवतीर्थावर मैदानात व्हायला हवा होता" असं राज ठाकरे म्हणाले.

“हिंदी भाषिक राज्य आर्थिक दृष्ट्या मागास. हिंदी न बोलणारी राज्य आर्थिक दृष्ट्या प्रगत आणि वर हिंदी शिकायची आम्ही. हिंदी बोलणाऱ्यांना राज्य सांभाळता आलं नाही. रोजगाराला इकडे येतात आणि आम्ही हिंदी शिकायचं. पाचवी नंतर मुलं काय हिंदी चित्रपट सृष्टीत जाणार का?. आमचा भाषेला विरोध नाही. एक भाषा, एक लिपी उभी करायला वर्ष लागतात” असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. ते वरळी डोम येथे मराठी विजय दिवस मेळाव्यात बोलत होते. ‘अमित शाह म्हणाले इंग्रजी येतं त्यांना इंग्रजी येत असल्याची लाज वाटेल. तुम्हाला नाही येत’ असं राज ठाकरे यांनी म्हणताच एकच हंशा पिकला.
“या हिंद प्रांतावर मराठ्यांनी सव्वाशे वर्ष राज्य केलं. आम्ही मराठी लादली का?. गुजरात, पंजाब, मध्यप्रदेश अटोकपर्यंत आम्ही पोहोचलो. आम्ही लादली का? हिंदी भाषा 200 वर्षापूर्वीची भाषा आहे. महाराजांच्या काळातही नव्हती. कशासाठी आणि कोणासाठी? यांनी फक्त चाचपडून पाहिलं. मुंबई स्वतंत्र करता येते का? यासाठी भाषेला डिवचून बघू. महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे ते पाऊल टाकू. कुणाची माय व्यालीय त्यांनी महाराष्ट्राला हात घालून दाखवा. मुंबईला हात घालून दाखवा. मजाक वाटला का?. आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही” आहोत असं राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलं.
‘दोघांची बॉडी लँगवेज कशी होती’
“मी मुलाखतीत म्हटल होतं. त्यातून या सगळ्या गोष्टी सुरु झाल्या. कुठल्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे शक्य झालं” असं राज ठाकरे म्हणाले. “आता संध्याकाळी सगळं सुरु होईल. आता काय वाटतं, दोघांची बॉडी लँगवेज कशी होती, कोण कमी हसलं, कोणं जास्त हसलं. मूळ विषय सोडून इतर विषयांवर चर्चा करतात” असं राज ठाकरे म्हणाले. “कुठचाही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा. माझ्या मराठीकडे, महाराष्ट्राकडे कोणी वेड्यावाकड्या नजरेने पहायच नाही” असं राज ठाकरे म्हणाले.