कल्याण डोबिंवलीत मनसेचा महापाैर? मोठा ट्विस्ट, थेट एकनाथ शिंदे यांच्याकडून भाजपाचा गेम? अर्ज…
राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका झाल्या असून महापाैर पदावरून चुरस बघायला मिळत आहे. आरक्षण सोडतनंतर अनेक दिग्गजांना धक्का बसला. त्यामध्येच आता कल्याण डोबिंवली महापालिकेच्या महापाैर पदाबाबत मोठी अपडेट पुढे येत आहे.

राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका झाल्या असून या निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपसह शिवसेना शिंदे गटाने अनेक महापालिकांवर बाजी मारली. महापालिका निवडणुकीनंतर महापाैर पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. मात्र, महापाैर निवडीबाबत म्हणाव्या तेवढ्या हालचाली अजून सुरू झाल्या नाहीत. कल्याण डोबिंवली महापालिकेची निवडणूक भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाने एकत्र लढवली. या महापालिकेत शिवसेना शिंदे गटाचे अधिक उमेदवार निवडून आले. भाजपा आणि शिवसेनेने युती करून ही निवडणूक लढवली असली तरीही शिवसेना शिंदे गटाने निवडणुकीनंतर मनसेला देखील आपल्यासोबत घेतले. शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने एकत्र येत निवडणूक लढवली होती. निकालानंतर समीकरणे पूर्णपणे बदलल्याचे बघायला मिळत आहे. कल्याण डोबिंवलीत महापाैर नक्की कोणत्या पक्षाचा होणार यावरून चर्चा रंगत असतानाच मोठा ट्विस्ट आला.
केडीएमसी सचिव कार्यालयातून शिवसेनेसह मनसेने महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज घेतल्याची माहिती मिळत आहे. ज्यामुळे मोठी खळबळ उडाली. शिवसेनेने 7 अर्ज तर मनसेने 1 उमेदवारी अर्ज नेला. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आरक्षण पडल्यानंतर अनुसूचित जातीचे 3 उमेदवार असून यापैकी दोन शिवसेनेकडे तर एक मनसेकडे आहे.
शिवसेनेकडे अनुसूचित जमातीचे किरण भांगले आणि हर्षाली थविल हे दोन उमेदवार तर मनसेकडे अनुसूचित जमातीच्या पदासाठी शीतल मंढारी हे उमेदवार आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेने शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर शिवसेनेचे उमेदवाराचे संख्याबळ पाहता शिवसेनेलाच महापौर पद जवळपास निश्चित आहे. आता पुन्हा एकदा मनसेने देखील उमेदवारी अर्ज घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली.
महापौर पदासाठी एकूण 3 प्रमुख उमेदवार असून रस्सीखेच बघायला मिळत आहे. महापौर निवडणुकीत आता राजकीय गणित बदलणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. आज सायंकाळपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख आणि वेळ असून नेमकं काय गणित असणार या अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लागले लक्ष आहे. हर्षला चौधरी थविल महापौर? भाजपकडून उपमहापौर नावही चर्चेत आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी हर्षला चौधरी थविल तर उपमहापौर पदासाठी भाजपचे राहुल दामले उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे मनसेचे राजू पाटील भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
