MPSC अध्यक्षांच्या चौकशीसाठी समिती; पण रोहित पवारांकडून ‘ती’ भीती व्यक्त, म्हणाले- पदावर असणारा पुरावे…
MPSC Students Protest: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर समितीची शिफारस करण्यात आली आहे. यानंतर आता रोहित पवारांनी सरकारच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या विद्यार्थी आंदोलनाला मोठं यश आले आहे. एमपीएससी आयोगाचे माजी आणि विद्यमान अध्यक्ष तसेच सदस्य यांच्याविरोधात संविधानाच्या कलम 317 प्रमाणे कारवाई करण्यासाठी समिती गठीत करण्याची विनंती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांच्याकडे शिफारस केली आहे. यावर आता आमदार रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. या निर्णयावर त्यांनी टीका केली आहे.
एमपीएससी आयोगाचे माजी आणि विद्यमान अध्यक्ष यांच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेत समिती गठीत करून 3 महिन्यात अहवाल मागवून त्या निष्कर्षांच्या आधारे पुढील कार्यवाही करण्यात यावी, अशी विनंती करणारी शिफारस राज्यपालांकडे सादर करण्यात आली आहे. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, हे काही होणार नाही. एसआयटी जसे नाममात्र असते तसे हे आहे. सरकार मुलांसोबत खेळत आहे.
रोहित पवार म्हणाले की, हे सरकारला परवडणार नाही. ते समिती गठीत करा बोलले आहेत. पण म्हाडाच्या पेपरमध्ये एसआयटी झाली. काय झालं? ते फक्त चालढकल करत आहेत. संध्याकाळी त्यावर बोलू. अजितदादांच्या बाबतीत सीआयडी केली. काय भजी तळली का? चोरांची चौकशी करताना चोराला त्याच पदावर ठेवले आहे. चौकशी करणार असं कसं होणार? कागदावर काय लिहिले आहे ते तर समजू द्या, असं त्यांनी सांगितलं आहे.
ते पुढे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षात अनेक एसआयची स्थापन केल्यात. किती काम केले? त्यांनी ते दाखवतो. राज्यपालांनी आमच्या अटी पूर्ण केल्या तर ठीक आहे. पेपर फोडला तर जेलमध्ये टाका. उद्या कॅबिनेटने प्रस्ताव करावा तो राज्यपालांना पाठवावा. ते राष्ट्रपतींकडे पाठवणार. मग तो सुप्रीम कोर्टात जाणार आणि मग होणार. एकाला वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांचं भविष्य खड्ड्यात टाकत आहे. एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा घेऊन चौकशी करा. पदावर असणारा चोर पुरावे नष्ट करू शकतो, अशी जोरदार टीका रोहित पवारांनी केली आहे. यामुळे आता मुख्यमंत्री यावर काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे.
