29 हजार गावात दुष्काळ जाहीर, मग सिंचनाची कामं काय केली? : राज ठाकरे

29 हजार गावात दुष्काळ जाहीर, मग सिंचनाची कामं काय केली? : राज ठाकरे

ठाणे : माझा दुष्काळ दौऱ्याचा कोणताही प्लॅन नाही. दुष्काळाचे टुरिझम करण्यात अर्थ नाही, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली. ते ठाण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.  ठाण्यात आज मनसे पदाधिकाऱ्यांचं शिबीर आयोजित करण्यात आलं होतं.  महाराष्ट्रातील दुष्काळाबाबत माहिती घेण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचं राज ठाकरे म्हणाले.

29 हजार गावात दुष्काळ

सरकार काय करतंय? अगोदरच्या सरकारमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाले. मग आताच्या सरकारमध्ये सिंचनाची काय कामं झाली? 29 हजार गावात दुष्काळ जाहीर झाला असेल, तर तुम्ही कामं काय केली, असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला.

दुष्काळासाठी राज्य सरकारने काय केलं ते सांगावं. दुष्काळाची कामं केली तर मग दुष्काळ जाहीर का करावा लागला. दुष्काळाचा भीषण प्रश्न का निर्माण झाला? तुम्ही कोणत्या उपाययोजना केल्या? दुष्काळ निवारणासाठी जर सरकारकडे निधी आहे, तर मग तो खर्च का करत नाही? असाही प्रश्न राज ठाकरेंनी विचारला.

सरकार दुष्काळासंदर्भात गंभीर नाही. हे नेते दुष्काळ दौरे करुन काय करतात. महानगरपालिका आणि राज्य सरकारचा फक्त पैसा खर्च करतात. मी दुष्काळी दौरा करणार नाही. दुष्काळी टुरिझम करण्यात पॉईंट नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी  म्हणजे देश नाही. देशभक्तीचे प्रमाणपत्र त्यांनी देऊ नये. नरेंद्र मोदींनी देशाला स्वप्न दाखवली होती त्याचे काय झाले? असा सवाल राज ठाकरेंनी विचारला. या निवडणुकीत राजीव गांधी यांचा काय संबंध असं म्हणत त्यांच्यावर पंतप्रधान मोदींकडून करण्यात येत असलेली टीका अयोग्य असल्याचं राज ठाकरे म्हणाले.

आरक्षणाचा निर्णय झाला तेव्हा पेढे वाटणारे भाजपाचे नेते कुठे आहेत असाही प्रश्न राज ठाकरेंनी विचारला आहे. मराठा तरूण-तरूणांना राज्य सरकारने फसवलं आहे. राज्यातल्या स्थानिक तरूणांना नोकरीची संधी मिळाली तर आरक्षणाची गरजच लागणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

राज्यातल्या मुला मुलींना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिलं तर महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच लागणार नाही. मराठा आरक्षण होणार नव्हतं, सरकारला फसवायचे होते. राजकारणाचा खेळ केलाय. मराठा मोर्चे निघाले होते. सर्व पक्षांनी आरक्षण देण्याचं ठरवलं होतं. मात्र आज या देशातील उद्योग धंदे खासगी आहेत, तर नोकऱ्या कुठे मिळणार, असा सवालही राज यांनी केला.

दुष्काळासाठी पाणी फाऊंडेशन आणि इतर सामाजिक संघटना काम करत आहेत. अभिनेता आमीर खान चांगलं काम करत आहे, त्यांचं अभिनंदन सर्वजण करत आहेत, असं राज म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एअर स्ट्राईकबाबत जे वक्तव्य केलं त्यावरुन देशाची खिल्ली उडवली जाते, असं राज ठाकरे म्हणाले. जे चुकीचं सुरु आहे, त्याबाबत बोललं गेलंच पाहिजे अशीही भूमिका राज ठाकरेंनी मांडली. मोदी सरकारविरोधात मी बोलतो आहे, कारण त्यांनी कामं केली नाहीत. स्वप्न दाखवून त्यांनी भ्रमनिरास केला. जर कामं केली नाहीत, तर कोणतंही सरकार असो त्याविरोधात बोललंच पाहिजे असंही राज ठाकरे म्हणाले. काँग्रेस सरकारने कामं केली नसती तरीही मी हेच बोललो असतो, असं त्यांनी नमूद केलं.

राज ठाकरे यांची पत्रकार परिषद

Published On - 3:17 pm, Mon, 13 May 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI