लोकलमधून प्लॅटफॉर्मवरील मुलीच्या अंगावर थुंकणाऱ्याचा शोध सुरु

लोकलमधून प्लॅटफॉर्मवरील मुलीच्या अंगावर थुंकणाऱ्याचा शोध सुरु

मुंबई : मुंबईतील दादर रेल्वे स्टेशन इथे स्टेशनवर उभ्या असलेल्या प्रवाशावर थुंकण्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. सोमवारी सकाळी ही घटना दादर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर घडली. या घटनेबाबतची माहिती तिने आपल्या ट्विटर अकाऊंवर पोस्ट केली आहे.

बोरीवली येथे राहणारी हिनल शाह (20) ही तरुणी कुर्ला येथील एका जाहिरात एजन्सीमध्ये इंटर्नशिप करत आहे. सोमवारी सकाळी ती बोरीवलीहून निघाली आणि दादर स्टेशनला उतरली यावेळी ती प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर उभी असताना तिथून वेगाने जाणाऱ्या लोकलमधून एका अज्ञात व्यक्ती तिच्या अंगावर थुंकला. या किळसवाण्या प्रकराने तिला भयंकर राग आला होता. मात्र त्यावेळी कपड्यांवर असलेली घाण लपवणे गरजेचे होते.

एकिकडे स्वच्छ भारत असा नारा देतोय तर दुसरीकडे कचरा कुठे फेकायचा आणि कुठे थुंकायचं इतकी साधी गोष्टदेखील आपण शिकलो नाही हेच यावरून दिसत आहे. प्लॅटफॉर्मवर हजारो लोक लोकलची वाट बघत असतात पण त्याचा जराही विचार न करता हे किळसवाणे प्रकार घडतात. आरपीएफतर्फे अशा माणसांवर कारवाई करण्यात येते. मात्र लोकलचा वेग जास्त असल्याने त्या माणसाचा शोध घेण्यात अडचणी येत असल्याचे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले.

रेल्वेमधून प्रवास करताना अनेक अडचणींना सामना करावा लागतो. पण प्रवासावेळी नियमांचे पालन न करता प्रवास करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. स्वच्छ भारत अभियान असा नारा एकीकडे देत असतानाच रेल्वे परिसरातून प्रवास करत असताना घाणेरड्या वृत्तीला सामोरे जावे लागत आहे. हा प्रकार पहिल्यांदाच घडला नसून याआधीसुद्धा असे प्रकार समोर आले आहेत. मात्र इतकं होऊनसुद्धा आपण काहीही शिकलो नाही हेच खरं.

Published On - 5:27 pm, Wed, 13 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI