‘शाळांनाही पाच दिवसाचा आठवडा करा’

राज्यातील शाळांनादेखील पाच दिवसांचा आठवडा करण्याची मागणी जनता शिक्षक महासंघाचे मुंबई-कोकण विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी शालेय शिक्षण विभागाकडे केली

'शाळांनाही पाच दिवसाचा आठवडा करा'


मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा मंत्रिमंडळाने जाहीर केला (State Government Five Days Week) . त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांनादेखील पाच दिवसांचा आठवडा करण्याची मागणी जनता शिक्षक महासंघाचे मुंबई-कोकण विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी शालेय शिक्षण विभागाकडे केली (School Five Days Week).

माध्यमिक शाळा संहितेनुसार, शाळा पाच दिवसांचा आठवडा करु शकतात. अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी आपल्या शाळांचा आठवडा पाच दिवसांचा केला आहे. पण, बहुतांश शाळा अजूनही सहा दिवस भरतात. शनिवारी अर्धा दिवस शाळा असते. शनिवारच्या अर्ध्या दिवसाच्या तासिका सोमवार ते शुक्रवार विभागून देता येऊ शकतात. त्यामुळे पाच दिवसांचा आठवडा शक्य असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.

मुंबईतील अनेक शाळा ह्या दुबार अधिवेशनात भरतात. दोन्ही अधिवेशनातील शाळा 15 मिनिटे आधी आणि 15 मिनिटे उशिरा सोडून पाच दिवसांचा आठवडा करणे शाळांना सहज शक्य असल्याने शालेय शिक्षण विभागाने याबाबत शासन निर्णय काढून शाळांचा पाच दिवसांचा आठवडा करावा.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ठाकरे सरकारने मोठं गिफ्ट दिलं आहे. पुढील महिन्यापासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू केला जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला. येत्या 29 फेब्रुवारीपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांच्या आठवड्याची अंमलबजावणी होणार आहे. त्यासोबतच कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास वाढवले जातील. मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांना आता दर शनिवार-रविवार हक्काची सुट्टी मिळणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पाच दिवसांच्या आठवड्याची मागणी प्रलंबित होती. राज्यात केंद्राप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा करावा, अशी मागणी राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI