KDMC मुख्यालयाबाहेर ‘सेल’चे बॅनर! खड्ड्यांमध्ये पडून मृत्यू झाल्यास आर्थिक मदत, मनपाच्या कारभाराचे काढले वाभाडे
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पडून किंवा स्टेशन परिसरातील भल्यामोठ्या लोखंडी गर्डर्सखाली चिरडून मृत्यू झाल्यास शासनाकडून मृताच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळेल, असे बॅनर लावण्यात आले आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) भोंगळ कारभारावर संताप व्यक्त करण्यासाठी एका जागरूक नागरिकाने शहरात एक उपहासात्मक बॅनर लावले आहे. त्या बॅनरची जोरदार चर्चा सुरु आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर “शासनाकडून आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून देण्याची सुवर्णसंधी” अशी खोचक घोषणा करत रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे किंवा स्टेशन परिसरातील धोकादायक लोखंडी गर्डर्समुळे मृत्यू झाल्यास मिळणाऱ्या योजनेची माहिती दिली आहे. या बॅनरबाजीने पालिका प्रशासन आणि अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणावर तीव्र ताशेरे ओढले आहेत.
बॅनरवर म्हटले, योजना पावसाळा संपेपर्यंतच
“खुश खबर! सेल! सेल!” म्हणत पालिका प्रशासनावर हल्लाबोल अशोक शेलार यांनी लावलेल्या या बॅनरवर आकर्षक मथळे आहेत. बॅनरमध्ये मनपावर टीका करत नागरिकांना उपाहासात्मक आवाहन करण्यात आले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पडून किंवा स्टेशन परिसरातील भल्यामोठ्या लोखंडी गर्डर्सखाली चिरडून मृत्यू झाल्यास शासनाकडून मृताच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळेल, असे म्हटले आहे. ही योजना केवळ पावसाळा संपेपर्यंतच मर्यादित असल्याचे सांगत पालिकेच्या ढिसाळ कारभारावर अधिक प्रकाश टाकला आहे.
अधिकाऱ्यांवर जोरदार टीका
संबंधित अधिकारी खड्डे बुजवण्याची कार्यवाही करीत नसल्यामुळेच दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे पालिकेनेच स्वतः ही योजना जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी या बॅनरमधून अशोक शेलार यांनी केली आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, ज्या अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे एखाद्या कुटुंबातील सदस्याचा जीव जातो, त्याच अधिकाऱ्याच्या कुटुंबातील सदस्यासोबतही तसेच घडले पाहिजे, तरच असे बेजबाबदार अधिकारी वठणीवर येतील.
त्या अपघाताची केली आठवण
२००५ मध्ये आधारवाडी चौकात झालेल्या अपघातात तीन जणांचा बळी गेला होता आणि त्यावेळी आपण स्वतः संबंधित अधिकाऱ्याला धडा शिकवला होता. तसेच त्यानंतर कायदेशीर लढाईही लढली होती, असे बॅनरमध्ये नमूद केले आहे. आपल्या कुटुंबातील सदस्यासोबत असे काही घडल्यास त्याच पद्धतीने उत्तर देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. या बॅनरबाजीमुळे कल्याण डोंबिवलीतील नागरिक समस्यांकडे अधिक गंभीरपणे पालिकेने लक्ष द्यावे अशी, अपेक्षा व्यक्त करत आहेत. या बॅनरसंदर्भात अधिक प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी नागरिकांना ९७६९२८३१६१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
