
Eknath Shinde in Delhi : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने मध्यरात्री दिल्ली जवळ केली. त्यांच्या या अचानक दिल्ली दौऱ्याने चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहे. त्यापूर्वीच शिंदे यांनी दिल्ली गाठल्याने महायुतीत काय नवीन घडामोड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे. ठाण्यासह राज्यातील काही ठिकाणी शिंदे सेना आणि भाजपमधील कुरबुरी वाढल्या आहेत. तर शिंदेसेनेच्या आमदारांना निधी देण्यावरूनही नाराजी नाट्य आहे. त्यामुळे या दिल्ली दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
शिंदेसेना-भाजपमध्ये धुसफुस
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची नांदी आली आहे. त्याचवेळेस भाजपमध्ये इनकमिंग वाढले आहे. त्यात शिंदे सेना आणि अजितदादांच्या जुन्या-जाणत्या लोकांचाही समावेश असल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे नाराजी पसरली आहे. तर अनेक ठिकाणी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. ठाण्यासह इतर भागात दोन्ही पक्षात धुसफुस चव्हाट्यावर आली आहे. निधी वाटपावरूनही सध्या नाराजी नाट्य असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यात नेमके कोणत्या विषयावर चर्चा होणार हे अजून समोर आलेले नाही.
उपमुख्यमंत्री मोदींची भेट घेणार
मध्यरात्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत दाखल झाले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या बंगल्यावरून शिंदे आज दिल्लीत वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतली असे मानण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ते भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर आज सकाळी शिंदे हे मोदींच्या भेटीला निघाल्याचे समोर आले आहे. या भेटीत ते राज्यातील कोणत्या विषयावर चर्चा करतात याची माहिती लवकरच समोर येईल.
मुख्यमंत्र्यांचा मंगळवेढा दौरा रद्द
दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असल्याने उद्या होणारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मंगळवेढा दौरा रद्द करण्यात आला आहे. ते आता 2 नोव्हेंबर रोजी मंगळवेढ्याला जाणार असल्याचे समोर येत आहे. मंगळवेढा येथे होणारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण कार्यक्रम होणार होता. तो पुढे ढकलण्यात आला. या कार्यक्रमाला मनोज जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर येणार असल्याची चर्चा होती. दौरा रद्द झाल्याने शिवप्रेमी नाराज झाले आहेत.