Uddhav Thackeray : मोदीही बिनविरोध आले नाहीत… उद्धव ठाकरेंनी डिवचलं
Uddhav Thackeray : महायुतीचे 60 पेक्षा जास्त उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यात भाजप आणि एकनाथ शिंदे नगरसेवकांची संख्या जास्त आहे. आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त मुलाखत प्रकाशित झाली आहे.

महाराष्ट्रात सध्या महापालिका निवडणुकीसाठी प्रचार निर्णायक टप्प्यात आला आहे. मुंबईसह 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. लगेच दुसऱ्यादिवशी 16 जानेवारीला निकाल आहे. या सर्वात मुंबई महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेच्या रुपाने ठाकरे कुटुंबाचं वर्चस्व होतं. पण चार वर्षांपूर्वी शिवसेनेत दोन गट पडले. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे. यात एकनाथ शिंदे यांच्याकडे अधिकृत शिवेना पक्ष आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आहे. मुंबईत आता भाजपला मानणारा देखील मोठा वर्ग आहे. मागच्या दोन विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या जागांवरुन ते स्पष्ट होतं. यंदाची पालिका निवडणूक भाजप, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. त्यासाठी या पक्षांनी आपली सर्व ताकद झोकली आहे.
भाजपकडे आज देशाची आणि राज्याची सत्ता आहे. पण मुंबई महापालिका जिंकणं हे त्यांचं स्वप्न आहे. ठाकरे बंधुंसाठी यंदाची निवडणूक ही अस्तित्वाची लढाई आहे. कारण बरेच लोक ठाकरे कुटुंबावरची निष्ठासोडून एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले आहेत. सध्या या महापालिका निवडणुकीत बिनविरोध उमेदवार निवडीचा मुद्दा गाजतोय. महायुतीचे 60 पेक्षा जास्त उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यात भाजप आणि एकनाथ शिंदे नगरसेवकांची संख्या जास्त आहे. आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त मुलाखत प्रकाशित झाली आहे. राज ठाकरेंची मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना मराठी मतांची फाटाफूट टाळण्यासाठी एकत्र निवडणूक लढवत आहेत.
बिनविरोध उमेदवार निवडीवर प्रश्न
संजय राऊत आणि सिने दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी दोन्ही ठाकरे बंधुंची मुलाखत घेतली. यावेळी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना बिनविरोध उमेदवार निवडीवर प्रश्न विचारला. 70 ठिकाणी बिनविरोध.. बॅरिस्टर नाथ पै सुद्धा कधी बिनविरोध निवडून आले नाहीत. उत्तर प्रदेशात राम मनोहर लोहिया किंवा अटलजी कधी बिनविरोध निवडून आले नाहीत. त्यावर उद्धव ठाकरेंनी मोदी सुद्धा बिनविरोध निवडून आले नाहीत असा टोल लगावला.
