दोन वर्षांपासून भरती रखडली, उमेदवारांना मोठा दिलासा; बीएमसीच्या कनिष्ठ अभियंता पदांबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय
BMC Junior Engineer Recruitment: दोन वर्षांपासून रखडलेली बीएमसीची 390 कनिष्ठ अभियंता पदांची भरती अखेर मार्गी लागली आहे. हायकोर्टाने मोठा निर्णय घेतला आहे.

मुंबई महापालिकेच्या रखडलेल्या कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रियेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. कनिष्ठ अभियंता पदासाठी डिप्लोमा ही पात्रता ग्राह्य धरावी, असा महत्त्वाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने सुमारे 390 पदांच्या भरती प्रक्रियेवरील अडथळा दूर झाला आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बीएमसीकडून 2024 मध्ये कनिष्ठ अभियंता पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत होती. या भरतीसाठी डिप्लोमा पात्रता निश्चित करण्यात आली होती. मात्र केवळ इंजिनीअरिंग पदवीधारक उमेदवारांनाच या पदासाठी पात्र ठरवावे, अशी मागणी करत काही पदवीधर उमेदवारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या वादामुळे भरती प्रक्रिया रखडली होती.
पदवीधारक उमेदवारांनी कनिष्ठ अभियंता पदासाठी केवळ डिप्लोमा पात्रता पुरेशी नसल्याचा युक्तिवाद केला होता. मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळत बीएमसीने निश्चित केलेली डिप्लोमा पात्रता कायम ठेवली आहे. केवळ इंजिनीअरिंगची पदवी आहे म्हणून संबंधित उमेदवाराला या पदासाठी आपोआप पात्र ठरवता येणार नाही, अशी भूमिका न्यायालयाच्या निर्णयातून स्पष्ट झाली आहे.
या निर्णयामुळे बीएमसीला रखडलेली भरती प्रक्रिया पुढे नेण्याचा मार्ग खुला झाला आहे. भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यास न्यायालयाने महापालिकेला मुभा दिली आहे. त्यामुळे आता संबंधित पदांसाठी पुढील प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षांपासून या भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरला आहे.
विशेषतः डिप्लोमा धारक उमेदवारांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयीन वादामुळे रखडलेली प्रक्रिया आता पुन्हा सुरू होणार असल्याने सुमारे 390 कनिष्ठ अभियंता पदांवर नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. भरतीची पुढील प्रक्रिया बीएमसीकडून कशा पद्धतीने आणि कोणत्या वेळापत्रकानुसार राबवली जाते, याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
