
मोठी बातमी समोर येत आहे, मध्य रेल्वेचं वेळापत्रक पुन्हा एकदा कोलमडलं आहे, मध्य रेल्वे पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. कल्याणवरून कर्जत आणि कसाराकडे जाणाऱ्या लोकल 20 ते 25 मिनिटं उशिरानं धावत आहेत. लोकल उशिरानं धावत असल्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चाकरमान्यांना मोठा फटका बसला आहे, कल्याण रेल्वे स्थानकावर घरी परतणाऱ्या चाकरमान्यांची आणि प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. तर दुसरीकडे लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्या देखील उशिरानं धावत असल्यामुळे याचा देखील प्रवाशांना मोठा फटका बसला आहे.
चाकरमान्यांचे हाल
रविवारी रात्रीपासूनच मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसाचा मोठा फटका हा रेल्वे वाहतुकीला बसला आहे. पावसामुळे काही ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं आहे, तर काही ठिकाणी सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाला आहे, त्यामुळे मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे, अनेक लोकल गाड्या वीस ते पंचवीस मिनिटं उशिरानं धावत आहेत.
याचा मोठा फटका हा आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चाकरमान्यांना बसला आहे. लोकल ट्रेन वीस ते पंचवीस मिनिटं उशिरानं धावत असल्यामुळे कल्याण रेल्वे स्थानकात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. चाकरमानी रेल्वेची प्रतिक्षा करताना दिसत आहेत.
लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही उशीर
दरम्यान दुसरीकडे लोकलच नाही तर मध्य रेल्वे मार्गावर धावणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्याही विलंबानं धावत आहेत, त्यामुळे चाकरमान्यांसोबतच इतर प्रवाशांचीही रेल्वे स्थानकावर गर्दी झाली आहे. पावसामुळे रेल्वेचं वेळापत्रक विस्कळीत झालं आहे.
दरम्यान सकाळी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे मस्जिद रेल्वे स्थानक या ठिकाणी रूळावर पाणी साचले होते, त्याचा फटका दिवसभर मध्य रेल्वेला बसला आहे. अजूनही मध्य रेल्वेची वाहतूक पुर्वपदावर आली नसून, गाड्या वीस ते पंचवीस मिनिटं उशिरानं धावत आहेत. ठाणे रेल्वे स्थानकावर देखील चाकरमान्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. तर आज सकाळपासूनच पाऊस सुरू असल्यामुळे काही जणांनी घरूनच काम करण्याचा निर्णय घेतला, पुढील तीन ते चार दिवस हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे.