Chandrakant Patil : तुमच्यासारखा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही… चंद्रकांतदादांनी रोहित पवारांना तिथेच सुनावलं
Chandrakant Patil : चंद्रकांतदादा पाटील आणि आमदार रोहित पवार यांच्यात चांगलीच जुगलबंदी दिसून आली. सांगलीतील इस्लामपूर येथील कार्यक्रमात त्यांनी रोहित पवारांची फिरकी तर घेतलीच पण सुनावले सुद्धा.

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी एका कार्यक्रमात आमदार रोहित पवार यांची चांगलीच फिरकी घेतली. यावेळी मंचावर जयंत पाटील, अजितदादा उपस्थित होते. इस्लामपूरमध्ये एका कार्यक्रमानिमित्त अनेक दिग्गज मंचावर हजर होते. त्यांनी वेळ मिळताच एकमेकांना चिमटे काढण्याची संधी दवडली नाही. त्यावरून सभास्थानी चांगलीच खसखस पिकली. यावेळी चंद्रकांत पाटलांनी रोहित पवारांना चांगलाच टोला हाणला.
एनडींची झाली आठवण
“मी अनेक वर्ष मुंबईत होतो. १३ वर्ष संघटनेसाठी काम केलं. राज्यभर फिरलो. त्यानंतर कोल्हापुरात स्थिर झालो. तेव्हापासून एनडी पाटलांशी परिचय झाला. एखादा प्रश्न सुस्पष्ट शब्दात कसा मांडायचा हे एनडी पाटलांकडून शिकलं पाहिजे. अनेक नेत्यांचा प्रॉब्लेम हा आहे की त्यांना प्रश्नच मांडता येत नाही. त्यांना काय म्हणायचं तेच कळत नाही. पण एनडी पाटलांची मांडणी सुस्पष्ट असायची. त्यांचा विचार शेवटापर्यंत जाईपर्यंत जे ॲडजेस्टमेंट होऊ द्यायचे नाही.”, अशी आठवण चंद्रकांतदादांनी सांगितली.
अन् टोलचा विषय कायमचा संपला
टोलचा विषय त्यांनीही असाच हाताळला होता. मी अनेक प्रस्ताव मांडले. मी मंत्री होतो. आणि कोल्हापूरचा मंत्री होतो. मी एनडींना म्हणालो, आपण एक काम करू. एमएच ०९ म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याची वाहने वगळून टोल घेऊ. बाकी कोल्हापूरला येणारे, अंबाबाईला येणारे, व्यापाराला येणारे यांचा तुम्ही आग्रह का धरता. त्यांनी अतिशय नेमके शब्द वापरले. ते म्हणाले, ही टोलची खोकी, इथून गेल्याशिवाय माझा लढा संपणार नाही. शेवटी सरकारला नमावं लागलं. त्याकाळात ३७३ कोटी कंत्राटदाराला सरकारने दिले आणि टोलचा विषय कायमचा संपला, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
एनडी मांडणी अगदी मुद्देसुद करायचे. ते म्हणायचे, एक गाडी विकत घेतली तर त्यावर ३० वर्ष टोल द्यावा लागेल. त्या ३० वर्षात टोलच्या पैशात दुसरी गाडी येते. एक गाडी खरेदी होईल इतका टोल देणं हेच मला मान्य नाही. त्यांनी शेवटी टोल घालवला, असे चंद्रकांतदादा म्हणाले.
रोहित पवारांना टोला
आगामी काळात अनेक गोष्टी पूर्ण कराव्यात असं दादा म्हणाले. दादांनी सूचना केली की जिल्हा नियोजनातून १० कोटीचा प्रस्ताव तयार केला. रोहित पवार यांनी ४० लाख दिल्यानंतर ते म्हणाले त्यावर मी एक शून्य वाढवावा. मी एका गिरणी कामगाराचा मुलगा. माझे आई वडील दोन्ही गिरणी कामगार. तुमच्यासारखा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, असा टोला चंद्रकांत दादांनी रोहित पवारांना लगावला.
माझ्या वडिलांना पहिला पगार महिन्याला १० रुपये. रिटायरमेंटच्यावेळी महिन्याला १४०० रुपये. त्यामुळे मी अशी घोषणा करत नाही. वेळ पडली तर घरदार विकून सामाजिक कार्य करण्याची सवय लागली. पण ती वेळ इथे येणार नाही. शासकीय निधी, प्रशासकीय अधिकार हातात आहे. दादांनी सूचना केली आहे. अर्धा पार्ट माझ्याकडे आहे. त्याची मी घोषणा करतो, असे चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले.
अजितदादांना घेतला चिमटा
रोहित म्हणाले ४० लाख. त्यावर एक शून्य जोडले तर किती होतं बरं. गणितही कच्च आमचं. मग ते चार कोटी होतात. दादांनी दोन शून्य जोडल्यावर ४० कोटी होतात. अरे ८ लाख कोटीच्या महाराष्ट्राच्या खजिन्याचा मालक इथे बसला आहे. आपलं बजेटचं साईज ८ लाख कोटी आहे. तुम्ही ४० कोटी काय मागता अधिक मागायला पाहिजे. अजितदादांचा स्वभाव आहे. त्यांना पटलं तर ते लगेच घोषणा करतात, असा चिमटाही चंद्रकांत पाटील यांनी अजितदादांना काढला.
