मी मुंबईकरांची… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मागितली जाहीर माफी, कारण
ही कामे पूर्ण झाल्यावर मुंबई ५९ मिनिटांत हे उद्दिष्ट गाठण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अक्षय कुमारसोबतच्या संवादात त्यांनी भविष्यातील वेगवान प्रवासाची ग्वाही दिली, ज्यामुळे मुंबईकरांना लवकरच सुकर वाहतूक अनुभवता येईल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या मुलाखतीत मुंबईत सुरु असलेल्या मेट्रो कामाबद्दल भाष्य केले. यावेळी अभिनेता अक्षय कुमारसोबतच्या संवादात देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील मेट्रो आणि अन्य पायाभूत सुविधांच्या कामांमुळे होत असलेल्या वाहतूक कोंडीबद्दल मुंबईकरांची जाहीर माफी मागितली. तसेच मुंबईतील ही कामे पूर्ण झाल्यावर ५९ मिनिटांत मुंबई हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या मुलाखतीत अक्षय कुमार यांनी मेट्रोची कामे लवकर संपवण्याची मागणी केली. तसेच हे काम पूर्ण झाल्यावर महाराष्ट्र दिनाप्रमाणे एक दिवस सुट्टी जाहीर करावी, अशी एक सूचनाही त्यांना केली. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी सविस्तर भाष्य केले. तुम्ही चांगली गोष्ट सांगितली. मुंबईत मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. त्यामुळे अनेकांना वाहतूक कोंडीतून जावं लागत असल्याने मी त्याबद्दल मुंबईकरांची माफी मागतो.” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुंबईतील मेट्रो आणि टनेलचं काम सुरू आहे. या सर्व गोष्टी संपल्यावर आम्ही एक मंत्र तयार केला आहे. मुंबई इन ५९ मिनिट असा तो मंत्र आहे. मुंबईतून कोणत्याही कोपऱ्यात जाण्यासाठी ५९ मिनिटेच लागली पाहिजेत किंवा त्यापेक्षा कमी लागली पाहिजे, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
यासोबतच फडणवीसांनी अक्षय कुमार यांच्या सुट्टीच्या मागणीवर मिश्किलपणे उत्तर दिले. जेव्हा ही कामं बंद होतील, तेव्हा १ मे रोजी महाराष्ट्र डे जाहीर करून सुट्टी देऊ, असे मिश्किल अंदाजात म्हटले. यावर अक्षय कुमारने “सर त्या दिवशी सुट्टी असते. तुम्ही तर गुगलीच टाकली,” असे म्हटले.
गोरेगावच्या फिल्मसिटीमध्येही बदल घडवा
यावेळी अक्षय कुमारने सध्या सुधारलेल्या पायाभूत सुविधांमुळे वेळेची बचत होत असल्याचं सांगितले. मी चार दिवसापूर्वी कुलाब्याला जात होतो. मी ३५ मिनिटात पोहोचलो. पायाभूत सुविधा चांगल्या झाल्याने हे शक्य झालं. मी पूर्वी जुहू वरून कुलाब्याला दाढी करून जायचो. तिथे गेल्यावर पुन्हा दाढी करायचो. एवढा वेळ लागायचा. पण तुम्ही दक्षिण आणि उत्तर मुंबईला जोडलं. गोरेगावला फिल्मसिटीची जमीन आहे. तिथेही बदल घडवा, असे म्हटले.
अक्षय कुमार यांच्या मागणीवर फडणवीस यांनी गोरेगावच्या फिल्मसिटीला ‘वर्ल्डक्लास’ बनवण्याची योजना असल्याचं स्पष्ट केलं. २०१४-१९ मध्ये मला फिल्म सिटीला इको सिस्टिममध्ये परावर्तित करायचं होतं, प्लान केला होता, डिझाईन केली होती. पण अनेक कारणाने ते झालं नाही. मी हातात घेतले आणि प्रकल्प पूर्ण झाले नाहीत अशा दोन-तीन प्रकल्पांपैकी हा एक आहे. मी या फिल्मसिटीला वर्ल्डक्लास बनवणार आहे. माझ्याकडे फिल्मसिटीसाठी चांगली योजना आहे. एआयनेही फिल्मला प्रभावित केलं आहे. एक इको सिस्टीम तयार करायची आहे. एक वर्षात आम्ही हा बदल घडवून आणू. त्यानंतर चार वर्षात हा संपूर्ण एरिया बदललेला असेल. आम्ही जागतिक दर्जाची फिल्मसिटी बनवू.” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
