‘कोरोनाचं संकट दूर होऊ दे’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची गणरायाचरणी प्रार्थना, वर्षा निवासस्थानी बाप्पाचं आगमन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकिय निवासस्थानी श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी त्यांनी गणेशोत्सवाच्या राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. उत्सव साजरा करताना कोरोनाच्या सावटाचं भान बाळगण्याचं आवाहनही त्यांनी केलं.

'कोरोनाचं संकट दूर होऊ दे', मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची गणरायाचरणी प्रार्थना, वर्षा निवासस्थानी बाप्पाचं आगमन
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मुंबई : जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो, अशी प्रार्थना मी गणरायाच्या चरणी केली आहे. कोरोनाविरुद्ध जनतेला जागरूक करण्यासाठी आणि या संकटातून  आपली मुक्तता व्हावी म्हणून आपण सर्वानी एक जबाबदार नागरिक म्हणून प्रयत्न करायला हवेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. आज वर्षा येथे मुख्यमंत्री व त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्रीगणेश प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी राज्यातील जनतेला शुभेच्छा देताना ते बोलत होते. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.

सलग दुसऱ्या वर्षीही बाप्पाचा उत्सव साधेपणाने साजरा करतोय

‘आजपासून श्री गणरायाचं आगमन होत असून, जे जे काही अमंगल आहे ते नष्ट होवो अशी प्रार्थना मी आजच्या दिवशी गणरायाच्या चरणी करतो. आज केवळ महाराष्ट्रातच नाही तर, जिथं जिथं मराठी माणूस आहे तिथं अगदी परदेशात देखील श्री गणरायाची प्राणप्रतिष्ठा मनोभावे केली जाते. सलग दुसऱ्या वर्षी देखील आपण कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करतोय.”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देणं सरकार म्हणून कर्तव्य

“एरव्ही गणेशोत्सव म्हटला की, गर्दी आणि धुमधडाक्यातला जल्लोष असं चित्र असायचं. मात्र दोन वर्षापासून कोरोनाने आपल्या पायात बेड्या अडकवल्या आहेत. कितीही मनात असलं तरी आपल्याला काही गोष्टींवर बंधनं आणावी लागत आहेत. शेवटी उत्सवापेक्षा लोकांच्या जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देणे हे सरकार म्हणून आमचं कर्तव्य आहे”, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

“गणरायाला विघ्नहर्ता असं म्हणतात. तो हे संकट कायमचं दूर करेल अशी मला खात्री आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांच्याविरुद्ध जनतेच्या मनातल्या असंतोषाला तोंड फोडण्यासाठी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले होते, आज आपण सर्वांनी तसेच विविध मंडळ, संस्था यांनीदेखील कोरोनाविरुद्ध जनतेला जागरूक करण्यासाठी आणि या महामारीतून आपली मुक्तता व्हावी म्हणून प्रयत्न करायला हवेत. एक जबाबदार नागरिक म्हणून कोरोनाविरुद्ध प्रखर आंदोलन आपण सुरु करूयात ही शपथ आजच्या या मंगल दिनी घेऊयात”, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला केलं.

राज्यभरात गणेशोत्सवाची धूम, घरोघरी बाप्पांचं आगमन

ना ढोलताशांचा दणदणाट… ना गुलालांची उधळण… ना भव्यदिव्य मिरवणुका… मात्र, तरीही गणपती बाप्पा मोरया… मोरया रे बाप्पा मोरया रे… अशा घोषणा देत विघ्नहर्त्या गणरायाचं आगमन झालं. राज्यभर रस्त्यांवरून गणेश मूर्त्या घेऊन जाताना गणेश भक्त दिसत होते. मात्र, रस्त्यावर नेहमीसारखी गर्दी नसली तरी उत्साह मात्र कायम होता. यावेळी गणेश भक्तांनी कोरोना नियमांचं पालन करत उत्साहात गणरायाच्या मूर्तीची घरी आणि मंडपात प्रतिष्ठापना केली

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी उत्सवावर कडक निर्बंध होते. मात्र यंदा कोरोनाच्या संख्येत घट झाल्याने राज्य सरकारने नियम शिथिल करत उत्सव साधेपणाने साजरा करण्यास परवानगी दिली आहे. याचाच एक भाग म्हणून भक्तही राज्य सरकारच्या नियमांचे पालन करताना दिसत आहे.

(Cm Uddhav Thackeray Varsha residence Ganeshotsav 2021)

हे ही वाचा :

Ganesh Chaturthi 2021 | गणेश चतुर्थी आज, जाणून घ्या गणपती स्थापनेचा शुभ मुहूर्त

Ganesh Chaturthi 2021 | महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपती बाप्पाचं आज आगमन, भाविकांमध्ये मोठा उत्साह

Ganesh Chaturthi 2021 Live Updates | लाडक्या बाप्पाचं आगमन, राज्यभरात गणेशोत्सवाची धूम

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI