‘कोरोना’च्या धोक्यामुळे दादा-वहिनी घरीच थांबा, आक्षेप घेतल्याने मुंबईत भावाचीच हत्या

धाकट्या भावाने बाहेर जाण्यास रोखल्यामुळे मोठ्या भावाचा संताप अनावर झाला आणि दोघा भावंडांमध्ये चांगलाच वाद झाला. (Corona Lockdown Kandivali Brother Murder)

'कोरोना'च्या धोक्यामुळे दादा-वहिनी घरीच थांबा, आक्षेप घेतल्याने मुंबईत भावाचीच हत्या

मुंबई : ‘कोरोना’च्या वाढत्या धोक्यामुळे लॉकडाऊन आणि संचारबंदी असल्याने घरीच थांबा, बाहेर जाऊ नका, असा समजुतीचा सल्ला देणं मुंबईतील तरुणाला चांगलंच महागात पडलं. पत्नीसोबत घराबाहेर जाण्यास आक्षेप घेतल्याने चिडलेल्या भावाने धाकट्या भावाचीच हत्या केली. (Corona Lockdown Kandivali Brother Murder)

मुंबईतल्या कांदिवली पूर्वकडील पोइसरमध्ये काल दुपारी ही धक्कादायक घटना घडली. कोरोनाच्या भीतीने पुण्याला राहणारा दुर्गेश ठाकूर मोठ्या भावाच्या घरी राहायला आला.

28 वर्षीय आरोपी राजेश ठाकूर पत्नीसोबत खरेदी करण्यासाठी बाहेर निघाला होता. मात्र कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती आणि लॉकडाऊन, तसेच संचारबंदी असल्यामुळे घराबाहेर जाऊ नका, असा प्रेमळ सल्ला धाकटा भाऊ दुर्गेश ठाकूरने दिला. तरीही ठाकूर दाम्पत्य भाजी घेण्यासाठी घराबाहेर गेले.

दादा परत आल्यावर दुर्गेशने पुन्हा त्याला बोल लावला. त्यामुळे  मोठ्या भावाचा संताप अनावर झाला. त्यावरुन दोघा भावंडांमध्ये चांगलाच वाद झाला. मात्र हा वाद इतका विकोपाला गेला, की राजेशने सुरी खुपसून आपल्या धाकट्या भावाचा जीवच घेतला. समता नगर पोलिसांनी आरोपी राजेश ठाकूरला अटक केली आहे.

‘कोरोना’शी दोन हात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या काळात केवळ जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठीच सर्वसामान्य नागरिकांना घराबाहेर पडण्यास मुभा आहे. 14 एप्रिलपर्यंत देशभरात लॉकडाऊनचा कालावधी असेल.

जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यास जायला पोलिसांची कोणतीही आडकाठी नाही. परंतु किमान तीन फुटांचे अंतर आणि तोंडाला मास्क लावण्याची काळजी प्रत्येकाने घ्यावी असं वारंवार बजावून सांगितलं जात आहे.

(Corona Lockdown Kandivali Brother Murder)

Published On - 8:19 am, Fri, 27 March 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI