मराठा तरुणांचं 27 दिवसांपासून आंदोलन, अद्यापही नियुक्त्या न होणं हे दुर्दैवी : देवेंद्र फडणवीस

भाजप नेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर आणि नितेश राणे यांनी आझाद मैदान येथे जाऊन आज मराठा आंदोलकांची भेट घेतली (Devendra Fadnavis meet Maratha protesters).

मराठा तरुणांचं 27 दिवसांपासून आंदोलन, अद्यापही नियुक्त्या न होणं हे दुर्दैवी : देवेंद्र फडणवीस

मुंबई : मराठा समाजाच्या तरुणांचं गेल्या 27 दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. मात्र, अजूनही तरुणांना नियुक्त्या न मिळणं हे दुर्देवी आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले (Devendra Fadnavis meet Maratha protesters). सकल मराठा समाज पुरस्कृत एसईबीसी आणि ईएसबीसी उमेदवारांचं आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. मराठा आरक्षण महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 62/2018 मधील कलम 18 नुसार मराठा उमेदवारांना नियुक्ती मिळावी या मागणीसह अन्य मागण्यांसाठी हे तरुण आंदोलनाला बसले आहेत.

भाजप नेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर आणि नितेश राणे यांनी आज आझाद मैदान येथे जाऊन आंदोलकांची भेट घेतली (Devendra Fadnavis meet Maratha protesters). यावेळी आंदोलकांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.

“मराठा समाजाच्या उमेदवारांच्या नियुक्तीबाबत आम्ही वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर कलम 18 चा समावेश केला. सगळ्या मराठा उमेवारांना नियुक्त्या मिळाव्यात यासाठी कायदे केले. उच्च न्यायालयाने हा कायदा वैध ठरवला. सर्वोच्च न्यायालयाने या कायद्याला स्थगिती दिली नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“कलमाअंतर्गत नियुक्त्या देता येतील. मात्र, सरकार का घाबरतंय? कायदा वैध तर कारवाई अवैध कशी? कायद्याच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयात जाण्याचा सल्ला देणं म्हणजे हा न्यायालयाचा आणि विधीमंडळाचा अवमान आहे. याबाबत आम्ही विधीमंडळात प्रश्न उपस्थित करु”, असंदेखील देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

“नियुक्त्या देणं हे सरकारच्या हातात आहे. याअगोदरही आझाद मैदानात मराठा समाजाच्या तरुणांनी आंदोलनं केली. मात्र, आम्ही त्यांना जास्त वेळ बसू दिलं नाही. आता सुरु असलेल्या आंदोलनाला 27 दिवस झाले. हे दुर्देवी आहे. याबाबत कायदेशीर मुद्यावर सरकारला प्रश्न विचारु. मराठा उमेदावारांना नियुक्त्या का दिल्या नाहीत? हा प्रश्न विचारु. हा पक्षाचा मुद्दा नाही. सरकार हे प्रश्न अयोग्य पद्धतीने हाताळत आहे”, अशी टीका फडणवीस यांनी केली.

दरम्यान, प्रविण दरेकर यांनीदेखील यावेळी राज्य सरकारवर टीका केली. “मराठा तरुणांच्या समस्या ऐकायला ठाकरे सरकारला वेळ नाही. सरकार पोकळ आणि बहिरं आहे. या सरकारला मराठा समाजाप्रती आस्था नाही. मराठा भावनांचा उद्रेक होऊ शकतो. मराठा समाजाला आरक्षण नाही. सरकार ऐकत नाही. सरकारने केसाने गळा कापला”, असा टोला दरेकर यांनी लगावला.

आंदोलकांची प्रकृती खालावली

दरम्यान, 27 जानेवारी 2020 पासून मराठा समाजाच्या तरुणांचं आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. या आंदोलनादरम्यान काही आंदोलकांची प्रकृती खालावली. त्यांना आज उपचारासाठी सेंट जॉर्ज हॉस्पिटलसाठी दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Published On - 5:23 pm, Sun, 23 February 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI