उद्या दिल्लीत शरद पवारांच्या खासदारांची मोदींसोबत मिटींग तर आज… राजकारणात मोठा ट्विस्ट येणार?
Sharad Pawar NCP - BJP: राज्याच्या राजकारणात पुन्हा नवीन वादळ येण्याचा दावा करण्यात येत आहे. शरद पवार राष्ट्रवादीच्या भाजपशी खास मैत्रीने राजकीय तरंग उठत आहेत. गेल्या महिन्याभरापासून विविध बैठकी आणि भेटीने वातावरण तापलेले असतानाच आता पुन्हा एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे. राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येणार का?

उद्या दिल्लीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. डिलीमिटेशन विधेयकावर ही भेट असल्याचे सांगितले जात आहे. तर कामानिमित्त ही भेट असल्याचा दावा करण्यात येत आहे. या भेटीवरून महाविकास आघाडीतील तीव्र प्रतिक्रिया समोर येत असतानाच कोल्हापूरमधून एक मोठी घडामोड समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि आमदार जयंत पाटील यांचा एकत्रित विमान प्रवास कळीचा मुद्दा ठरला आहे. या एकत्रित विमान प्रवासाची चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादी भाजपशी घरोबा करणार का? असा सवाल केल्या जात आहे. राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता असलेली काय आहे ही घडामोड?
फडणवीस-जयंत पाटील यांचा एकत्रित विमान प्रवास
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि आमदार जयंत पाटील यांचा एकत्रित विमान प्रवास केला. मुंबई ते कोल्हापूर दरम्यान या तिघांनी एकत्रित विमान प्रवास केला. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यावर होते. तर आमदार जयंत पाटील हे आपल्या ईश्वरपूर मतदारसंघात होते. मात्र दोघांच्या एकत्रित विमान प्रवासामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
उद्या 8 खासदार मोदींच्या भेटीला
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला जाणार आहेत. कालच खासदार सुप्रिया सुळे यांनी याविषयी पत्रकार परिषदेत माहिती दिली. डिलिमिटेशन विधेयकावर सहमती तयार करण्यासाठी ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. डिलिमिटेशनवर हमी मिळाल्यास चर्चेस हरकत काय, असा सवाल प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केला आहे. तर डिलिमिटेशनविरोधात आमचे खासदार मतदान करतील. विधेयकावरील मतदानावेळी कोण कुणाच्या बाजूने आहे ते कळेल असे आमदार रोहित पवार म्हणाले. या घाडमोडींवर काँग्रेसने तिखट प्रतिक्रिया दिली आहे. ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की भेट घेत असतील, चर्चा करणार असतील तर शुभेच्छा, मोदी, शाहांच्या दरबारी भेठीगाठी, काहीतरी शिजतंय. पण आमची त्यांच्यावर नजर आहे. तर पवारांचा पक्ष हा मविआचा भाग आहे. कोणी कुठेही जाणार नाही असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
भेटीगाठीचा घटनाक्रम, घरोब्याच्या दाव्यात किती दम?
विनोद तावडे- जयंत पाटील भेट
गेल्या महिन्याच्या सुरुवातीला मुंबईत जयंत पाटील आणि भाजप नेते विनोद तावडे यांच्यात 3 जुलै 2026 रोजी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अनौपचारिक भेट झाली. या भेटीमुळे शरद पवार गट एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांना हवा मिळाली. तर जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत एका कामानिमित्त ही भेट झाल्याचा खुलासा केला. तर खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा कामानिमित्त ही भेट असल्याचे स्पष्ट केले होते.
शरद पवार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट
या भेटीची चर्चा सुरू असतानाच 7 जुलै 2026 रोजी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानभवनातील शिंदेंच्या दालनात भेट झाली. शिंदे यांनी त्यांचा सत्कार केला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाबाबत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीनिमित्त ही भेट झाली आणि ती सदिच्छा भेट असल्याचे नंतर स्पष्टीकरण देण्यात आले.
शरद पवार-पंतप्रधान मोदी यांची भेट
जंतरमंतरवर 20 जुलै रोजी कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलकांवर लाठीहल्ला झाला. पोलिसांच्या या लाठीचार्जविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली. 25 जुलै रोजी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. त्यापूर्वी दोन दिवस अगोदर शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात भेट झाली. जेन झी आंदोलन आणि इतर मुद्यावर ही भेट झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट झाली हे विशेष. यामुळेच राज्याच्या राजकारणात नवीन ट्विस्ट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.