देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्लाझ्मा थेरपी, रेमडेसिव्हिरचा डोसही दिला, प्रकृतीत सुधारणा

काही तासांपूर्वी त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळीही 93 पर्यंत खाली घसरली होती. | Devendra Fadnavis

देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्लाझ्मा थेरपी, रेमडेसिव्हिरचा डोसही दिला, प्रकृतीत सुधारणा

मुंबई: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सध्या कोरोनाची लागण झाल्यामुळे मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार घेत आहेत. यादरम्यान त्यांच्यावर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी देवेंद्र फडणवीस यांना प्लाझ्मा थेरपीचा एक डोस देण्यात आला होता. यानंतरही आजही त्यांना आणखी एक डोस देण्यात आल्याचे सांगितले जाते. (plasma therapy and Remdesivir injection used for treatment on Devendra Fadnavis)

देवेंद्र फडणवीस यांना शुगरचा त्रास असल्यामुळे त्यांची थोडी अधिक काळजी घ्यावी लागत आहे. काही तासांपूर्वी त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळीही 93 पर्यंत खाली घसरली होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन देण्यात आले. यानंतर त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी 97 पर्यंत वाढली असून आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

कोरोनाचा संसर्ग झाल्यास आपण सरकारी रुग्णालयांत उपचार घेऊ, असे देवेंद्र फडणवीस यांनी तीन महिन्यांपूर्वी सांगितले होते. त्यानुसार कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर फडणवीस हे मुंबईच्या सेंट जॉर्ज या सरकारी रुग्णालयात दाखल झाले. डॉ. तात्याराव लहाने आणि इतर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपचार केले जात आहेत.

‘देवेंद्र फडणवीसांनी लवकर बरे व्हावे; आम्हाला लढण्यासाठी समोर तगडा पैलवान पाहिजे’
संजय राऊत यांनीही रविवारी दसरा मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांना कोरोनातून बरे होण्यासाठी आपल्या खास शैलीत शुभेच्छा दिल्या होत्या. देवेंद्र फडणवीस यांना कोरोना झाला आहे. फडणवीसांनी त्यामधून लवकर बरे व्हावे, असा सदिच्छा आम्ही देतो. कारण, आम्हाला लढण्यासाठी समोर तगडा पैलवान पाहिजे, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले होते.

संबंधित बातम्या:

देवेंद्र फडणवीसांचा सन्मान राखा, त्यांच्याविषयी वाईटसाईट बोलू नका; रोहित पवारांनी ट्रोलिंग करणाऱ्यांचे कान उपटले

(plasma therapy and Remdesivir injection used for treatment on Devendra Fadnavis)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI