मेट्रो कारशेड जागाबदलासाठी नवी समिती म्हणजे निव्वळ फार्स, अहवाल आधीच तयार!, फडणवीसांचा आरोप

मुंबईकरांना मेट्रो विलंबाने मिळेल आणि राज्याचेही मोठे आर्थिक नुकसान होईल. याबाबत प्रशासकीय अधिकार्‍यांकडून मुख्यमंत्र्यांची मोठी दिशाभूल सुरु आहे, असे पत्रंच फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.

मेट्रो कारशेड जागाबदलासाठी नवी समिती म्हणजे निव्वळ फार्स, अहवाल आधीच तयार!, फडणवीसांचा आरोप
Devendra Fadnavis and Uddhav Thackeray

मुंबई : ‘मेट्रो-3च्या कारशेडची जागा बदलण्यासाठीचा घाट आधीच घालण्यात आला असून, त्यासाठी आधीच अहवाल तयार करून, नवीन कमिटीचा निव्वळ फार्स  करण्यात येत अस, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. यातून मुंबईकरांना मेट्रो विलंबाने मिळेल आणि राज्याचेही मोठे आर्थिक नुकसान होईल. याबाबत प्रशासकीय अधिकार्‍यांकडून मुख्यमंत्र्यांची मोठी दिशाभूल सुरु आहे, असे पत्रंच फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. त्याचबरोबर हा अट्टाहास पूर्ण करण्यासाठी खासगी विकासकांना मोठा आर्थिक फायदा करुण देण्यासाठी हालचाली होत आहेत, असा प्रकार समोर येईल. तेव्हा मुख्यमंत्र्यांवरही संगनमताचा आरोप होईल, असंही फडणवीसांनी पत्रात म्हटलंय.(Devendra Fadnavis’s letter to CM Uddhav Thackeray on Metro Car Shed project)

‘2053 पर्यंतचा विचार करुन आरेच्या जागेची निवड’

“मुंबईकरांच्या जिव्हाळ्याच्या मेट्रोच्या प्रश्नावर अतिशय अक्षम्य असे दुर्लक्ष होत आहे. मुळात मेट्रो-3च्या कारशेडसाठी आरेचीच जागा सर्वार्थाने योग्य असताना कांजुरमार्गच्या जागेचा आग्रह धरला जात आहे. आता तर काही प्रशासकीय अधिकारी दिशाभूल करणारी माहिती देत आहेत. त्यातून राज्याचे प्रचंड आर्थिक नुकसान तर होणारच आहे, शिवाय, मुंबईकरांच्या अतिशय जिव्हाळ्याचा असलेला मेट्रो प्रकल्प लांबणीवर पडणार आहे”, असं फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय. त्याचबरोबर आरे कारशेडची जागा 2031 पर्यंतच पुरेशी आहे आणि त्यानंतर नवीन जागा शोधावी लागेल, असं सांगण्यात येत आहे. पण हे धादांत खोटे असून मेट्रो-3ची अंतिम डिझाईन क्षमता ही 2053 पर्यंतची लोकसंख्या विचारात घेऊन करण्यात आल्याचा दावाही फडणवीसांनी केलाय.

कांजूरमार्गमध्येही झाडांची मोठी कत्तल होणार?

2053 मध्ये 8 डब्यांच्या एकूण 55 गाड्या लागतील, तर 2031 मध्ये 8 डब्यांच्या एकूण 42 गाड्या लागतील. उद्घाटनाच्या दिवशी 8 डब्यांच्या एकूण 31 गाड्या पुरता कार डेपो लागेल. आरे तांत्रिक समितीने मेट्रो कारशेडसाठी एकूण 30 हेक्टर जागा दिली. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 25 हेक्टर जागा वापरण्यासाठी परवानगी दिली. तिथे आता बांधकाम सुरू आहे. त्याठिकाणी 8 डब्यांच्या 42 गाड्यांची व्यवस्था होते आहे. त्यानंतर ‘पीक अवर्समध्ये पीक तासां’च्या निकषानुसार 2031 ते 2053 या कालावधीत 8 डब्यांच्या 13 गाड्या टप्प्या-टप्प्याने दाखल कराव्या लागतील. 2031 ते 2053 पर्यंत टप्प्या-टप्प्याने या गाड्या वाढविताना जी अतिरिक्त जागा लागणार आहे ती या उर्वरित 5 हेक्टरपैकी केवळ 1.4 हेक्टर इतकीच जागा लागणार आहे. या जागेवर 160 झाडे आहेत, जी 2053 पर्यंत टप्प्या-टप्प्याने रिलोकेट करून रिप्लँट करावी लागतील. याचाच अर्थ असा की, आरेमध्ये अंतिम डिझाईन क्षमता सामावून घेणे इतकी पर्याप्त जागा उपलब्ध आहे. कारडेपो कांजुरमार्गला नेताना यापेक्षा किमान 3 पट झाडे तोडावी लागतील तसेच केवळ जागा बदलण्याच्या अट्टाहासापायी हजारो कोटी रूपयांचे नुकसान होणार आहे. शिवाय मुंबईकरांना यावर्षाअखेर जी मेट्रो मिळणार होती ती आता किमान 4 वर्षे उपलब्ध होणार नाही, ही अत्यंत अन्यायकारक बाब आहे, असेही या पत्रात म्हटले आहे.

‘आर्थर अँड जेकिंस’चा अडसर

कांजुरमार्ग येथील खाजगी दावाधारकांनी ‘आर्थर अँड जेकिंस’ यांच्या मोठ्या लीजधारकांना ‘पॉवर ऑफ अटर्नी’ दिली असून शासन त्यांच्याशी चर्चा करते आहे, तसेच त्यांना मोठी जागा ओपन रेसिडेन्शियल व कमर्शियल वापरा अनुज्ञेय करून उर्वरित जागा शासन घेणार, असे ठरते आहे. यामुळे खाजगी विकासकांना हजारो कोटींचा निव्वळ फायदा होणार आहे. याच जमिनीवर प्रधानमंत्री आवास योजनेतून गरिबांसाठी एक लाख घरे बांधण्याचा प्रस्ताव मागील राज्य सरकारकडे आला होता. त्यावर शासनाने समिती सुद्धा नेमली होती. मात्र नंतर असे लक्षात आले की, या जागांची लीज ही मिठागारांकरीता देण्यात आली होती. त्यामुळे अटी-शर्तींचे उल्लंघन होऊन जागा केंद्र सरकारकडे जमा होते. त्यामुळे तत्कालिन शासनाने केंद्र सरकारला या जमिनी गरिबांकरीता घरे देण्यासाठी मागणी केली होती. त्यासंदर्भात काही बैठकी सुद्धा झाल्या. परंतू अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.

..’तर मुख्यमंत्र्यांवर संगनमताचा आरोप होईल’

एकूणच दोन्ही बाबी लक्षात घेता काही अधिकारी आपली प्रचंड दिशाभूल करीत आहेत. आरे कारशेडसंदर्भात आधीच जागा स्थानांतरणाचा अहवाल तयार केला आहे आणि समिती तसेच कंसलटन्टचा फार्स सुरू आहे. हजारो कोटी रूपयांचे नुकसान असेल किंवा खाजगी व्यक्तींना हजारो कोटींचा फायदा असेल या सर्व बाबतीत सत्य उघडकीस येईलच आणि त्यावेळी विनाकारण आपल्यावरही संगनमताचा आरोप होईल, म्हणून मुंबईकरांच्या हिताच्या दृष्टीने अशा अधिकार्‍यांवर कारवाई करावी आणि तत्काळ आरे येथे कार डेपोचे काम सुरू करावे, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

सरकारची अव्यवहार्य संकल्पना – फडणवीस

मेट्रोच्या 2-3 लाईन्स एकत्रित करून कारडेपोचे नियोजन करणे, ही पूर्णत: अव्यवहार्य संकल्पना आहे. कारण, मेट्रो-3चा विचार केला तर कारशेडचा खर्च हा एकूण प्रकल्पाच्या खर्चाच्या तुलनेत अवघ्या 1 टक्क्यांपेक्षाही कमी आहे. अशा परिस्थितीत कारशेड आरेपासून 8 कि.मी दूर अंतरावर नेऊन नवीन जागी बांधणे यामुळे प्रकल्प किंमतीत होणारी वाढ कितीतरी अधिक आहे. शिवाय वेगवेगळे मेट्रोमार्ग हे वेगवेगळ्या वेळेत कार्यान्वित होत असतात आणि सिग्नलिंग प्रणाली सुद्धा वेगवेगळी असते. हे इंटिग्रेशन आणि त्यात लागणार्‍या विलंबामुळे व्याजाचा पडणारा भूर्दंड याचा विचार केला तर काहीशे पटीने बोजा वाढणार आहे, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या :

भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी एकेकाळी दिलेलं शपथपत्र कसं नाकारता?, राजीव सातव यांचा केंद्राला सवाल

ठाकरे सरकारचे सल्लागार कोण समजत नाही, महाराष्ट्र बुडवायला निघालेत : फडणवीस

Special Report | मेट्रो कारशेड विरुद्ध बुलेट ट्रेन, कोण नाक दाबणार, कुणाचं तोंड उघडणार?

Devendra Fadnavis’s letter to CM Uddhav Thackeray on Metro Car Shed project

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI