अदानी विरुद्ध ठाकरे, धारावीसाठी राज ठाकरेंची तोफ धडाडणार? सभेची तारीख काय?
धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून राजकीय वातावरण तापले आहे. उद्धव ठाकरे यांच्या विरोधानंतर आता राज ठाकरेही या लढ्यात उतरण्याची शक्यता आहे. अदानी समूहाच्या प्रकल्पाविरोधात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची चिन्हे आहेत.

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पावरुन राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाला तीव्र विरोध केला आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील या लढ्यात उतरण्याची शक्यता आहे. येत्या ७ डिसेंबर रोजी धारावीतील कामराज स्कूल मैदानात सर्वपक्षीय जाहीर सभा करण्यात आली आहे. या जाहीर सभेत राज ठाकरे सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे.
धारावीतील कामराज स्कूल मैदानात ७ डिसेंबर रोजी होणारी सर्वपक्षीय सभा धारावी बचाव समितीने आयोजित केली आहे. या सभेचा मुख्य उद्देश अदानी समूहाकडून सुरू असलेल्या सर्वेक्षणातील त्रुटींवर आवाज उठवणे हा आहे. पुनर्विकासाच्या नावाखाली सर्वेक्षणात अनेक जुन्या आणि पात्र रहिवाशांना डावलले जात आहे, असा आरोप या समितीकडून केला जात आहे. ज्यामुळे त्यांचे हक्काचे घर गमावण्याची भीती निर्माण झाली आहे. या अन्यायाविरोधात सर्वपक्षीय नेत्यांना एका व्यासपीठावर आणून धारावीच्या स्थानिकांचे म्हणणे थेट सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच या प्रकल्पात पारदर्शकता आणावी यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली आहे.
या सभेत संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.धारावी बचाव समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत आदित्य ठाकरे यांनी या सभेत सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे. याशिवाय धारावी बचाव समितीने लवकरच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट घेणार आहे. राज ठाकरे यांनी यापूर्वीही अदानी समूहावर टीका केली आहे. त्यामुळे जर ते सभेला पाठिंबा देण्यासाठी उतरले तर धारावी प्रकल्पाविरोधात दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे सरकार आणि अदानी समूहापुढे मोठे राजकीय आव्हान निर्माण होणार आहे. त्यामुळे धारावीचा मुद्दा मुंबईतील राजकारणाच्या केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे.
धारावी प्रकल्प नेमका काय?
मुंबईच्या मध्यभागी असलेल्या ६०० एकर जागेवरील धारावीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या ठिकाणी रहिवाशांना चांगली घरे आणि सोयीसुविधा देण्याचा शासनाचा दावा आहे. हा संपूर्ण पुनर्विकास करण्याचे कंत्राट अदानी समूहाच्या कंपनीला मिळाले आहे. यात पात्र झोपडीधारकांना ४०५ चौरस फुटांचे मोफत घर देण्याची सध्याची योजना आहे.
विरोध होण्यामागची कारण काय?
१. टीडीआर (TDR) घोटाळ्याचा आरोप: हा प्रकल्प अदानी समूहाला प्रचंड मोठा आर्थिक फायदा व्हावा यासाठी सरकारने नियम बदलून दिला आहे. हा जगातील सर्वात मोठा TDR घोटाळा असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
२. घराचा आकार : धारावीकरांना ४०५ ऐवजी किमान ५०० चौरस फुटांचे घर मोफत मिळावे, अशी प्रमुख मागणी आहे. तसेच, हा प्रकल्प मुंबईतील मूळ मराठी माणूस आणि येथील लघु-उद्योजकांना विस्थापित करणारा आहे, असा गंभीर आरोपही विरोधकांकडून केला जात आहे.
३. सर्वेक्षणातून डावलणे: पुनर्वसनासाठी सध्या सुरु असलेल्या सर्वेक्षणात अनेक पात्र आणि जुन्या रहिवाशांना जाणूनबुजून डावलले जात असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.
