वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्या बदलीसाठी संभाजी ब्रिगेडकडून धरणे आंदोलन
वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांची वाशिम मधून त्वरित बदली करावी या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडकडून आज धरणे आंदोलन करण्यात आलं तर पूजा खेडकर यांना विनाकारण त्रास दिला जात असून त्यांना संरक्षण देण्यात यावं यासाठी ओबीसी संघटनांकडून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं.

संभाजी ब्रिगेड कालपासूनच आक्रमक झाली असून पूजा खेडकर यांच्या सर्व प्रमाणपत्रांची सखोल चौकशी करावी. त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करावी या मागणीसाठी त्यांनी आज धरणे आंदोलन केलं. तर पुढील काळात राज्यभरात संभाजी ब्रिगेड आणखी तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा संभाजी ब्रिगेड विभागीय अध्यक्ष गजानन भोयर यांनी दिला.
दुसरीकडे ओबीसी संघटना ही आता पूजा खेडेकर यांच्या समर्थनार्थ उतरल्या असून त्यांची विनाकारण बदनामी केली जात आहे. त्या चौकशी समिती समोर आपली बाजू मांडणारच आहेत तेव्हा खरं खोटं काय आहे ते चौकशीमध्ये सिद्ध होईल. मात्र राज्यात मराठा आणि ओबीसी समाजामध्ये जे ते निर्माण करण्याचं वातावरण होत आहे त्यातूनच पूजा खेडकर यांना सुद्धा त्रास दिला जात असल्याचा आरोप ओबीसी संघटनांकडून केला गेला आहे .
वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरच्या आईवर शेतकऱ्यांला धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पुण्यातील घराला कुलूप लावून घरातील सगळे सदस्य बाहेर गेले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून त्यांचा घरातील पालिकेच्या पाण्याचा नळ सुरु असल्याचे सांगितले जातेय. पालिकेच्या नळाला पाणी आल्यानंतर सलग 4 ते 5 तास हा नळ चालू असतो. त्यामुळे गेल्या 2 दिवसात हजारो लीटर पाणी यातून वाया गेले आहे. त्यामुळे आता खेडकरांच्या घराबाहेरील गेटचे कुलूप उघडून महापलिका हा नळ बंद करणार का? हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाया गेल्यामुळे आता महापालिका खेडकरांवर काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, सोमवारी रात्री पूजा खेडकर यांच्या शासकीय विश्रामगृहात पोलीस गेले होते. रात्री 11 वाजताच्या दरम्यान तीन महिला पोलीस सिव्हिल ड्रेसमध्ये गेल्या होत्या त्यावेळी आतमध्ये नेमकी कोणती चौकशी केली की विश्रामगृहाची झडती घेतली याबद्दल कोणतीही माहिती समजू शकलेली नाही.
