गणपती बाप्पा पावला! मध्य रेल्वेने भाविकांसाठी घेतला मोठा निर्णय
मुंबईतील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे लाखो गणेश भक्तांना लोकलने सहज प्रवास करता येणार आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे गणेशोत्सवाचा उत्साह अधिक वाढला आहे.

महाराष्ट्रात सध्या गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. त्यातच आता मुंबईसह आजूबाजूला राहणाऱ्या गणेशभक्तांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. दरवर्षी लालबागच्या राजासह इतर प्रसिद्ध गणेश मंडळांच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. या भाविकांची सोय लक्षात घेऊन मध्य रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. उद्या रविवार, ३१ ऑगस्ट रोजी होणारा नियोजित मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. यामुळे गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच या निर्णयामुळे भक्तांना कोणत्याही अडथळ्याशिवाय लोकलने प्रवास करणं शक्य होणार आहे.
नेमका निर्णय काय?
मुंबईत दर रविवारी रेल्वे मार्गांच्या देखभाल दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक घेतला जातो. यामुळे लोकल सेवा अनिश्चित काळासाठी विस्कळीत होते. यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, गणेशोत्सवाच्या काळात लाखो भाविक लांबून लालबागचा राजा, गणेशगल्लीचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, आणि इतर मंडळांच्या दर्शनासाठी मुंबई आणि उपनगरात येत असतात. यावेळी मुंबई शहरातील रस्त्यांवर भक्तांची मांदियाळी पाहायला मिळते. ही गर्दी लक्षात घेऊन आणि गणेशभक्तांच्या सोयीला प्राधान्य देत रेल्वे प्रशासनाने हा सकारात्मक निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वेचा निर्णय काय
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, उद्या रेल्वेच्या तिन्हीही मार्गांवर कोणताही मेगाब्लॉक नसेल. हा मेगाब्लॉक रद्द केल्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक नेहमीप्रमाणे सुरू राहील. याचा थेट फायदा गणेशभक्तांना होणार आहे. त्यांना आरामात आणि वेळेत आपल्या आवडत्या गणपतीचे दर्शन घेता येणार आहे. रेल्वेच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून प्रशासनाने घेतलेल्या या भूमिकेमुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
दरम्यान गणेशोत्सव काळात रेल्वेने उचललेले हे पाऊल खरोखरच प्रशंसनीय आहे. यामुळे भाविकांचा प्रवासच सोयीस्कर होणार आहे. तसेच लोकल आणि त्याच्या वेळेची चिंता न करता, आरामात बसून प्रवास करून बाप्पाचा आशीर्वाद घेता येणार आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे यंदाचा गणेशोत्सव अधिक सुखकर आणि निर्विघ्न ठरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
