
eKYC fails to help Farmer : सप्टेंबरमध्ये मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपले. अतिवृष्टीने होत्याचे नव्हते झाले. शेती खरडून गेली. महापूराने शेती वाहून गेली. अनेक शेताना तळ्याचे स्वरुप आले. उभी पिकं आडवी झाली. राज्य शासन बांधावर आले. त्यांनी या गंभीर परिस्थितीचा आढावा घेतला. लागलीच शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची घोषणा झाली. पण अस्मानी संकटानंतर लाल फितशाहीचा फटका शेतकऱ्यांना बसल्याचे दिसून येत आहे. मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांना ई-केवायसी केली नसल्याने भरपाईची रक्कमच मिळाली नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यामुळे आता संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावेळी तर सरकार ई-केवायसीचा अडथळा दूर करेल आणि अधिकाऱ्यांची दंडेलशाही मोडीत काढेल अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहे.
ई-केवायसी नसल्याने मदत नाही
अतिवृष्टीने यंदा शेतकऱ्यांचा खरीप हंगाम गेला. पीकं नष्ट झाली. शेतात तळं साचलं. पीकं हातची गेली. तातडीची मदत म्हणून राज्य सरकारने 1418 कोटी रुपयांचा मदत जाहीर केली. त्यातील 82 कोटी 22 लाख रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. अतिवृष्टीमुळे कोणत्याही शेतकऱ्याला ईकेवायसीची गरज नसल्याचे सरकारने जाहीर केले आहे. पण मराठवाड्यात केवायसीची पूर्तता न केल्याने 746 कोटी रुपये बँकेत पडून असल्याची माहिती समोर येत आहे.
आधार कार्ड, पॅनकार्ड, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक, बायोमॅट्रिक व्हेरिफिकेशन,फिंगरप्रिंट हे नसल्याने ईकेवायसी होऊ शकली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना देण्यात आलेला मदतनिधी बँक खात्यातच अडकून आहे. प्रत्यक्ष ही मदत शेतकऱ्यांच्या हातात पडलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी दिवाळी कशी साजरी करायची असा सवाल विचारण्यात येत आहे. दुसरीकडे शेतकरी आत्महत्येचा टक्काही वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. राज्य सरकारने केवळ मदतनिधी देऊन मोकळे होऊ नये, तर शेतकऱ्यांना भावनिक आणि मानसिक आधार देण्याची मागणीही सुद्धा करण्यात येत आहे.
शिवसेनेकडून नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत
पमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरग्रस्त भागात मदत पाठवली आहे. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांकडे पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी ट्रक रवाना केल्यानंतर काल नांदेड जिल्ह्यातील पुरग्रस्त भागांसाठी पक्षाकडून मदत पाठविण्यात आली. या मदत ताफ्यामध्ये एकूण 22 गाड्या असून त्यामध्ये जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, शालेय साहित्य तसेच अन्य आवश्यक साहित्य यांचा समावेश आहे. ही मदत नांदेड जिल्ह्याकडे रवाना करण्यात आली असून, तेथील स्थानिक आमदार बालाजी कल्याणकर, आनंद बोंढारकर आणि बाबुराव पाटील कोहळीकर यांच्या मार्फत ही मदत नांदेड येथील पुरग्रस्त नागरिकांना वितरित करण्यात येणार आहे.