Kolhapur: “भ्रष्टाचार करणार नाही, पक्षही सोडणार नाही”,अनोख्या जाहीरनाम्याची राज्यात चर्चा, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी कोल्हापूर पॅटर्नची हवा

Kolhapur Municipal Corporation Election 2026: कोल्हापूर महापालिका निवडणुकीत राजर्षी शाहू आघाडीची चर्चा होत असतानाच आता निवडून आल्यावर आम्ही भ्रष्टाचार करणार नाही, पक्ष सोडणार नाही, असं उमेदवारांनी थेट स्टॅम्पवरचं लिहून दिलं आहे. त्याची राज्यभर चर्चा सुरू आहे.

Kolhapur: भ्रष्टाचार करणार नाही, पक्षही सोडणार नाही,अनोख्या जाहीरनाम्याची राज्यात चर्चा, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी कोल्हापूर पॅटर्नची हवा
कोल्हापूर महापालिका निवडणूक आप
Image Credit source: गुगल
| Updated on: Jan 10, 2026 | 11:48 AM

Aam Admi Party Unique Manifesto : राज्यभरातील महापालिका निवडणुकांची लगीनघाईन आता जवळ आली आहे. सध्या प्रचाराचा धुराळा उडाला आहे. तर निवडणुकीपूर्वी आश्वासनांची खैरात करत जाहिरनामा प्रसिद्ध करण्यात येत आहे. कोल्हापुरात राजर्षी शाहू आघाडी कुणा-कुणाची विकेट पाडणार याकडे लक्ष असतानाच आम आदमी पक्षाचा अनोखा जाहिरनामा चर्चेत आला आहे. भ्रष्टाचार करणार नाही. पक्षही सोडणार नाही आणि मतदारांसाटी 24 तास उपलब्ध असू असं आपच्या उमेदवारांनी 500 रुपयांच्या स्टॅम्पवर लिहून दिलं आहे. मतदारांचा विश्वास जिंकण्यासाठीचं हे प्रतिज्ञापत्र राज्यात चर्चेचाच नाही तर कौतुकाचा विषय ठरला आहे.

प्रतिज्ञापत्रावर ठोस आश्वासन

कोल्हापूर महानगरपालिकेला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. कंत्राटदारांनी अधिकारी किती पैसे घेतात याचाच पाढा वाचला आहे. पण कोणतीच कारवाई होत नाही. त्यामुळे आम आदमी पक्षानं भ्रष्टाचार मुक्त कारभार करण्याचे वचन मतदारांना दिल्याचं आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. प्रभागात हे प्रतिज्ञापत्र पोहचवणार असल्याचे या उमेदवारांनी ठरवलं आहे. कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत निवडून आल्यावर भ्रष्टाचार करणार नाही, पक्ष सोडणार नाही अशी ग्वाही आपच्या उमेदवारांनी दिली आहे. तर निकालानंतर तडजोडीच्या राजकारणात पडणार नसल्याचे आपने या प्रतिज्ञापत्राद्वारे जाहीर केलं आहे.

आपचे 14 उमेदवार मैदानात

महानगरपालिका निवडणुकीसाठी कोल्हापुरात राजर्षी शाहू आघाडी मैदानात उतरली आहे. या आघाडीत आम आदमी पक्ष, शरद पवार यांची राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी हे पक्ष आहेत. या आघाडीत आम आदमी पक्षाचे 14 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादीचे 23 तर वंचित बहुजन आगाडीचे 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कोल्हापुरात इंडिया आघाडीत राष्ट्रवादीला डावलण्यात आल्याने हा तिसऱ्या आघाडीचा प्रयोग होत आहे. इंडिया आघाडी आणि महायुतीला राजर्षी शाहू आघाडीने आव्हान उभं केलं आहे. तर आता थेट स्टॅम्प पेपरवर भ्रष्टाचार न करण्याची आणि पक्ष न सोडण्याची तसेच भ्रष्टाचार उघड करण्याची हमी या उमेदवारांनी दिली आहे. त्याची राज्यभर चर्चा सुरू आहे.