बॉम्बे इज नॉट महाराष्ट्र सिटी! अण्णामलाई यांच्या वक्तव्याने भाजप अडचणीत, विरोधकांच्या हाती आयतं कोलीत
Bombay is not Maharashtra City: मुंबई महापालिका निवडणुकीत मराठी भाषा, मराठी संस्कृती यावरून वातावरण तापलेले असतानाच आता अण्णामलाई यांनी भाजपलाच चांगलंच अडचणीत आणलं आहे. अण्णामलाई यांनी विरोधकांच्या हाती आयतं कोलती दिल्याने राजकीय शिमगा पाहायला मिळणार आहे.

Tamil Nadu BJP Leader Annamalai statement: मुंबई महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न होत असल्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले. तर आता बीएमसी निवडणुकीत भाजपने विविध भाषिक उमेदवारांना जवळ करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. उत्तर प्रदेश, बिहारमधील भाजपचे नेते आणि स्टार या निवडणुकीत भाजपचा प्रचार करणार आहेत. तर दक्षिण भारतातील भाषिकांसाठी तामिळनाडूतील भाजपचे नेते के अण्णामलाई हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले. प्रभाक क्रमांक 47 मध्ये त्यांनी प्रचार केला. त्याचवेळी त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. एका मुलाखतीत त्यांनी मुंबईचा उल्लेख बॉम्बे असा केला. तर त्यावर कडी म्हणजे बॉम्बे इज नॉट महाराष्ट्र सिटी असे अकलेचे तारेही तोडले. त्यांच्या या वक्तव्याने विरोधकांच्या हाती आयत कोलीत दिलं आहे. त्यामुळे मुंबईत राजकीय शिमगा रंगणार यात शंका नाही.
मुंबई महाराष्ट्राचं नाही तर आंतरराष्ट्रीय शहर
भाजप नेते के अण्णामलाई यांनी मुंबईत ट्रिपल इंजिन सरकारची वकिली केली. मुंबईतल्या लोकांना ट्रिपल इंजिन सरकार हवे असल्याचा दावा त्यांनी केला. चेन्नईत डिएमके आहे. तर केंद्रात भाजप आहे. बंगळुरूमध्ये काँग्रेस, केंद्रात भाजप, हैदराबाद येथे काँग्रेस आणि केंद्रात भाजप असं समीकरण आहे. पण मुंबई हे देशातील एकमेव असं शहर आहे, जिथं ट्रिपल इंजिन सरकार शक्य असल्याचा दावा अण्णामलाई यांनी केला आहे. केंद्रात मोदी, राज्यात फडणवीस आणि मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर पाहिजे असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना बॉम्बे हे महाराष्ट्राचं शहर नाही तर ते आंतरराष्ट्रीय शहर असल्याचा कांगावाही के. अण्णामलाई यांनी केला. या शहराचं बजेट 75 हजार कोटींच्या घरात आहे. ही काही लहानसहान रक्कम नाही. चेन्नईचं बजेट 8 हजार कोटी रुपये आहे. तर बंगळुरू या शहराचं बजेट 19 हजार कोटी रुपये असल्याची पुश्ती त्यांनी जोडली. त्यामुळे इथं ट्रिपल इंजिन सरकार हवे असा दावा अण्णामलाई यांनी केला.
बॉम्बेचा फलक तोडला
दरम्यान या वादाला तोंड फुटण्यापूर्वी एक मोठी घडामोड घडली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गुरुवारी कल्याण येथून प्रचार संपवून परतत होते. ते भिवंडी मार्गे ठाण्यात जात होते. त्यावेळी त्यांचे लक्ष ठाणे-भिवंडी सीमेवरील खारीगाव पुलावरील बॉम्बे ढाबा या बोर्डावर पडली. राज ठाकरे यांनी याविषयी नाराजी व्यक्त करताच मनसे कार्यकर्त्यांनी बॉम्बे ढाबा हे नाव असलेला फलक तोडला. त्यामुळे आता के अण्णामलाई यांच्या वक्तव्याने मोठा वाद पेटण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. अखेर भाजपच्या जे पोटात होते ते ओढावर आल्याचा टोला त्यांनी लगावला.
