Lalbagcha Raja Visarjan 2025 : निसर्ग आपल्यासाठी…; लालबागचा राजाच्या विसर्जनाला उशीर, दा.कृ.सोमण स्पष्टच बोलले
लालबागच्या राजाच्या विसर्जनात मोठा विलंब झाला आहे. नवीन तराफ्यामुळे आणि भरतीमुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण यांनी भरतीच्या वेळेचे स्पष्टीकरण दिले आहे आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

मुंबईतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाच्या विसर्जनाला यंदा मोठा विलंब झाला आहे. गेल्या ६ तासांपासून लालबागचा राजा हा गिरगावच्या समुद्रात विराजमान झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे लालबाग राजाचे विसर्जन कधी होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यातच आता लालबागच्या राजाच्या विसर्जनाला भरतीमुळे विलंब झाला, असे म्हटले जात आहे. आता यावर खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण काय म्हणाले?
खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. यावेळी सोमण यांनी लालबागचा राजा गणपती विसर्जनाच्या विलंबाबद्दल त्यांचे मत व्यक्त केले. अनंत चतुर्दशीच्या दिवशी समुद्रात भरतीच्या वेळेस विसर्जन करणे अधिक सोपे होते. रविवारी सकाळी ११:४४ आणि रात्री ११:५५ वाजता समुद्राल भरती असणार आहे. तर पहाटे ५:१६ मिनिटांनी आणि संध्याकाळी ५:५२ वाजता ओहोटीची वेळ आहे, असे दा. कृ. सोमण म्हणाले.
नवीन तराफा अत्याधुनिक पद्धतीने आणला आहे. त्याचा वापर करण्याच्या अगोदर त्याचे प्रशिक्षण घेतले पाहिजे होते. कारण निसर्ग आपल्यासाठी थांबत नाही. त्या वेळेतच तराफा तिथपर्यंत जायला पाहिजे. निसर्गाच्या भरतीची वेळ ती काही बदलत नाही. त्यावेळेनुसार ती भरती येत असते. पर्यावरणाची काळजी राखली पाहिजे. पीओपीच्या मूर्तीच्या जागी मातीच्या मूर्तीचे विसर्जन केले पाहिजे. निसर्गाला आपण जपलो तर निसर्ग आपल्याला जपणार आहे. निसर्गाला धोका निर्माण होणार नाही अशी काळजी घेतली पाहिजे. पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करा, असे दा.कृ. सोमण यांनी म्हटले.
लालबाग राजासाठी खास तराफ्यामुळे मोठी अडचण
दरम्यान नवसाला पावणारा राजा अशी ख्याती असलेला लालबागचा राजा हा सकाळी गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. पण लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या वेळी एक मोठा अडथळा निर्माण झाला आहे. एकीकडे विसर्जनाची तयारी पूर्ण झाली असतानाही दुसरीकडे लालबागचा राजाची मूर्ती अत्याधुनिक तराफ्यावर चढवताना अनेक अडचणी निर्माण झाल्या. यंदा लालबाग राजासाठी खास तराफा करण्यात आला आहे. पण समुद्राला भरती आल्यामुळे तो खूप हलू लागला. यामुळे गणपतीची मूर्ती त्या तराफ्यावर ठेवता आली नाही. यानंतर मूर्तीला तराफ्यावर चढवण्याचा प्रयत्न पुन्हा केला गेला. यावेळी मूर्तीवरील दागिने काढून टाकण्यात आले, पण ज्या ट्रॉलीवर मूर्ती होती, ती ट्रॉली पाण्यात अडकली. यामुळे मूर्तीला तराफ्यावर चढवता आले नाही. त्यामुळे लालबाग राजाच्या विसर्जनला मोठा उशीर झाल्याचे पाहायला मिळत आहे.
